आरसा दावावयाची

Submitted by निशिकांत on 5 September, 2014 - 02:08

चेहरा बघुनी, म्हणे तो, जाण येते अंतराची
वेळ आली आरशाला आरसा दावावयाची

मामुली असते अपेक्षा, वाचकांनो! शायराची
वाहवा, इर्शाद, टाळ्या, दाद द्यावी कौतुकाची

अंध असुनी चालताना साथ रात्री कंदिलाची
डोळसांना "मी इथे" ही रीत माझी सांगण्याची

राहिले एकत्र मादी, नर कराराला धरोनी
जीवनी दोघास नव्हती काळजी निभवावयाची

मौलवी, साधू जनांनो थांबवा तुमची दुकाने
योजना बनवा नव्याने माणसांना सांधण्याची

आर्घ्य सूर्याला त्रिकाळी वाहणे मी बंद केले
राज्य अंधारा! तुझे तर आस का उगवावयाची?

आरशा! बघतोस का तू बेगडांच्या मुखवट्यांना?
वेळ आली पारदर्शी माणसांना शोधण्याची

आश्रमीच्या लंपटांची वाचुनी कामांध लफडी
काळजी वाटे मनाला माणसे भक्ताळण्याची

का अशा "निशिकांत" झाल्या पापण्या ओल्या अवेळी?
हास्य, लेवुन आत असते वेदना लपवावयाची

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान