खेळ - अंतीम भाग

Submitted by विशाल कुलकर्णी on 3 January, 2009 - 03:25

खेळ-भाग १ : http://www.maayboli.com/node/4993

खेळ- भाग २ : http://www.maayboli.com/node/5010

निंबाळकर साहेब कितीतरी वेळ त्या डेड झालेल्या फोनकडे बघत उभे होते.
"आणखी एक कोडं ! मला पुन्हा लहान झाल्यासारखे वाटतेय सर, " भोसले उदगारले.
"मलापण तसेच वाटतेय, भोसले....फ़क्त ही कोडी लहान मुलांना सोडवता येण्यासारखी नाहीत...असं त्याला वाटतंय म्हणुन तो आपल्याला वेठीला धरतोय." निंबाळकर साहेब स्वत:शीच हसले.

"पण मी त्याला माझ्यावर मात करु देणार नाही..."

"सर, पण हे नवीन कोडं म्हणजे....मी तर जाम गोंधळलो आहे....!" भोसलेच्या चेहयावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं.

"काय म्हणाला होता, पुन्हा एकदा ऐकव बरं.........."

भोसलेंनी टेप सुरु केली...

"नंतर, नंतर आधी माझा क्लु तर ऐका, एक माणुस मरण पावला. मेल्यानंतर तो यमपुरीच्या दरवाज्यापाशी जावुन उभा राहिला. पाहतो तर तिथे दोन दरवाजे होते. प्रत्येक दरवाजापाशी एक रखवालदार होता. हा विचारात पडला किं आता कुठल्या दाराने आत शिरु ? तेवढ्यात आकाशवाणी झाली. या दोन्ही दरवाजांपैकी एक स्वर्गाचा आणि एक नरकाचा आहे. तुला स्वर्गाचा दरवाजा हवा आहे. कुठला स्वर्गाचा आणि कुठला नरकाचा हे त्या रखवालदारांना पक्के माहित आहे. फ़क्त इथे एक गोम आहे..या दोघांपैकी एकजण कायम खरे बोलतो तर दुसरा अट्टल खोटारडा आहे. आता कोण खरा आहे आणि कोण खोटारडा...देवच जाणे. तुम्ही त्या दोघांपैकी फ़क्त एकालाच आणि फ़क्त एकच प्रश्न विचारु शकता.माइंड यु, फ़क्त एकालाच आणि फ़क्त एकच प्रश्न विचारु शकता. आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही या पैकी कुणाला , काय प्रश्न विचाराल कि जेणेकरुन तुम्हाला योग्य उत्तर मिळेल...!"

निंबाळकर साहेब बराच वेळ हातातल्या पेपरवेटशी चाळा करत होते. अचानक त्यांचा चेहरा आनंदाने फ़ुलला आणि टण्ण......!

" राजन, आता येवु दे त्याचा फ़ोन, मी तयार आहे...त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला..!"

"म्हणजे साहेब, तुम्हाला सापडला तो प्रश्न ?", भोसलेचा चेहरा एकदम उजळला.

"असं बघ, राजन..हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. म्हणजे बघ प्रश्न तर एकच विचारायची परवानगी आहे. पण उत्तर देणारे दोन आहेत, पुन्हा त्यापैकी फ़क्त एक जण कोणीतरी खरं बोलणारा आहे. तो कोण हे ही आपल्याला माहीत नाही. "

"म्हणजे आपल्याला प्रश्न असा निवडावा लागणार आहे कि दोघांपैकी कोणालाही विचारला तर त्याचे आपल्याला हवे असलेले उत्तरच यायला हवे. किंवा त्याच्यापैकी कोणीही दिलेले उत्तर योग्य आहे कि अयोग्य हे ठरवण्यासाठी आपल्याला एखादी कसोटी ठरवुन द्यावी लागेल."

"राजन, नीट ऐक उत्तर....त्यापैकी कुठल्याही एका रखवालदाराकडे जावुन त्याला प्रश्न करायचा की "मी जर त्या दुसर्‍या रखवालदाराला विचारले की स्वर्गाचे दार कोणते आहे, तर तो दुसरा रखवालदार याचे काय उत्तर देइल."

आणि या प्रश्नाला पहिला रखवालदार , म्हणजे ज्याला आपण हा प्रश्न विचारणार आहोत तो, जे काय उत्तर देइल त्याची योग्यता ठरवण्यासाठी जी कसोटी आपण ठरवणार आहोत ती म्हणजे या प्रश्नाला पहिला रखवालदार जे उत्तर देइल त्याच्या अगदी उलट पर्याय हे आपले सही उत्तर असेल."

निंबाळकरांनी विजयी मुद्रेने भोसलेकडे पाहिले. राजन भंजाळल्यासारखा त्यांच्याकडे पाहात होता. "साहेब, तुम्ही जे काही सांगितलंत ते माझ्या डोक्यावरुन गेलंय ! जरा समजावुन सांगाल काय ? माझा लहानसा मेंदु खुप थकलाय हो.....!"

"असं बघ, दोघापैकी कुणालाही हा प्रश्न विचारलास तर ते आपापल्या स्वभावाप्रमाणे खरे उत्तर देणार. पण ज्याला तु विचारणार आहेस तो जर खरे बोलणारा असेल तर तो अगदी खरेपणाने दुसरा काय उत्तर देइल ते सांगेल...पण दुसरा खोटारडाच असल्याने ते उत्तर अर्थातच चुकीचे असेल म्हणजे त्याने सांगीतलेल्या दरवाज्याचा विरुद्ध दरवाजा स्वर्गाचा असेल. तसेच जर खोटारड्याला हा प्रश्न विचारला तर तो त्याच्या स्वभावाप्रमाणे खोटेच उत्तर देणार..म्हणजे खरे बोलणारा राखणदार जे उत्तर देइल त्याच्या अगदी विरुद्ध..तेव्हा तो जे सांगेल त्याच्या अगदी विरुद्ध उत्तर हे आपले खरेखुरे उत्तर असेल."

राजनच्या चेहर्‍यावर अजुनही प्रश्नचिन्ह होते. पण निंबाळकर आपल्याच तंद्रीत बोलत होते...

"पण खरं सांगु राजन, हा माणुस का कोण जाणे पण मला ओळखीचा वाटतोय. त्याचा आवाज, त्याची बोलण्याची ढब.....आणि मी जर चुकत नसेन ना राजन, तर तो फ़क्त वेळ काढतोय. तो कशाची तरी वाट पाहतोय. पण कशाची ? असो...त्याचा फ़ोन येइलच तेव्हा कळेल."

"व्वा ! निंबाळकरसाहेब..अगदी बरोबर ओळाखलंत उत्तर..अर्थात हे अगदीच सोप्पं होतं म्हणा. असो , तुमच्या मनात असलेल्या मुळ प्रश्नाचे उत्तर देखील याच कोड्याशी निगडीत आहे.....",

त्या अनामिकाचा आवाज थोडा थकल्यासारखा वाटत होता. जणु तो वर्षानुवर्षे आजारी असावा.

"साहेब, थोडी घाई करा..माझ्याकडे वेळ फ़ार कमी आहे. एकदा की मी इथुन सटकलो की मग तुम्हाला क्लु नाही देवु शकणार. आता शेवटचाच क्लु. नाही, आता कोडी संपली...आता थोडं गंभीर होवु या. गंमत खुप झाली. आता त्या दोन रखवालदारांपैकी एकाला गाठा...तुम्ही योग्य व्यक्तीला गाठले की मला कळेलच, मग मी पुढचा दुवा देइन....!"

निंबाळकर पुन्हा विचारात पडले..आता हे दोन रखवालदार कुठे शोधायचे ?

"सर, आपण पुन्हा एकदा जर बॆंकेला भेट दिली तर."

रस्तोगी आपल्या म्हणण्यावर ठाम होते.

" अजिबात नाही इन्स्पेक्टर साहेब, आमचे सर्व गार्ड अतिषय विश्वासु आणि पारखुन घेतलेले आहेत. तरीही तुम्ही त्यांना भेटु शकता, पण त्यातुन काही सापडेल असे मला तरी वाटत नाही.कारण ते फ़क्त व्हॉल्टच्या बाहेरची सुरक्षा पाहतात, त्यांच्या पैकी कुणालाच आत जाणे किंवा आतली काही माहिती असणे शक्य नाही ." बँक मॅनेजर रस्तोगींनी अगदी ठामपणे ग्वाही दिली.

भोसले आणि निंबाळकरांनी सर्व गार्डसची अगदी कडक उलटतपासणी केली पण त्यातुन काहीही निष्पन्न झाले नाही...

"असं, कसं होइल, आत्तापर्यंत त्याने एकही क्लु चुकीचा किंवा खोटा दिलेला नाही, मग याच वेळेस तो खोटं का बोलतोय ?", निंबाळकर विचारात पडले.

"साहेब, त्याने रखवालदाराने असा शब्द वापरला होता. आपण तो शब्दश: घेतोय. रखवालदार म्हणजे राखण करणारा. इथे फ़क्त सिक्युरिटी गार्ड असा अर्थ न घेता थोडा वेगळा विचार केला तर. म्हणजे असं बघा...व्हॉल्टच्या तिजोरीचे दरवाजे उघडण्यासाठी एक कोड ग्राहकाकडे असतो तर त्याचा दुसरा भाग...म्हणजे तिजोरी उघडण्यासाठी ग्राहकाच्या कोड बरोबर मॅनेजर रस्तोगीला देखील काही कोड वापरावे लागतात. एका अर्थाने तो देखील या तिजोरीचा रखवालदारच झाला.",
...आता भोसलेंचेही डोके काम करायला लागले होते.

"येस, राजन ...उचल त्याला...मला वाटतं आता हे पाउल उचलावंच लागेल. आत्तापर्यंत आपण सॉफ़्टली तपास करत होतो. आता वेळ थोडा आहे...आता त्याला उचलच तु, पुढची जबाबदारी मी घेतो...!" निंबाळकर साहेब झटकन उठले.

"तुम्ही कधी ना कधी माझ्यापर्यंत पोचणार हे मला माहित होतं निंबाळकर साहेब. सगळं काही त्याने ठरवुन दिल्यासारखंच घडतंय."..रस्तोगी प्रसन्नपणे हसले.

हा मात्र निंबाळकरांना फ़ार मोठा धक्का होता. सगळे काही त्याने ठरवुन दिल्याप्रमाणे म्हणजे....

"अहं, साहेब मला जेवढं माहीत आहे तेवढंच किंवा माझा सहभाग जेवढा आहे तेवढंच मी सांगेन...!"

"रस्तोगी तुम्ही गुन्ह्याची कबुली देताय, यासाठी तुम्हाला अटक होवु शकते हे लक्षात ठेवा." निंबाळकर आता चेष्टेच्या मुडमध्ये अजिबात नव्हते.

"निंबाळकर साहेब, त्याने मला शब्द दिलाय की हे प्रकरण कोर्टापर्यंत जाणारच नाही म्हणुन. आणि गेलंच तर जे होइल ते माझे वकील पाहतीलच...!", रस्तोगी अगदी निर्धास्त होते.

"तो कोण आहे, रस्तोगी...?"

"ते मात्र मला माहीत नाही, एवढं नक्की के तो कुणी हिस्ट्री शिटर नाही. ऐकायची इच्छा असेल तर मला माहित असलेली माहिती देतो, नाहीतर तुम्हाला हवे ते करायला तुम्ही मोकळे आहात. आणि हा जबाब रेकॊर्ड करुन घेणार असाल तर मी माझा वकील आल्यावरच बोलीन.ठरवा काय ते !"

भोसले रागा रागाने रस्तोगीच्या अंगावर धावुनच गेले ," साला ब्लॅकमेल करतो !"

"राजन, कुल डाउन ! सद्ध्या पत्ते त्यांच्या हातात आहेत, बोलु दे त्यांना..!" निंबाळकरांनी संयम कायम ठेवलेला होता.

"ठिक आहे साहेब, मी तुम्हाला थोडीशी बँकेची अंतर्गत रचना सांगतो. बँकेला एकच मजला आहे.. अगदी बेसमेंटही नाही. इमारतीच्या मधल्या भागातच स्ट्राँगरुम आहे. तिच्या चारही बाजुनी एक पोकळ पण मजबुत अशी भिंत आहे. लिफ़्ट सुरु केली की आधी थोडीशी मागे जाते, साधारणत: अडीच मिटर.आणी या भिंतीत शिरते...मग या पोकळ भिंतीतुन एक पुर्ण वळसा तिजोरीला घालुन मग तिजोरीसमोर येवुन उभी राह्ते . पुर्णपणे साऊंडप्रुफ़ असल्याने आतल्या व्यक्तीला तो वर चाललाय की खाली की मागे की पुढे काहीच कळत नाही. एका जागी थांबल्यावर लिफ़्ट जागच्या जागी १८० अंशात वळते या वेळी आपोआपच तीचे तोंड तिजोरीच्या समोर आलेले असते, त्यामुळे दार उघडताच समोर तिजोरी दिसते."

" मला थोडेसे पाणी मिळेल का साहेब ?, म्हातारा झालोय ना आता, लवकर कोरड पडते घशाला....."

"हवालदार, यांना पाणी आणुन द्या !"

रस्तोगी पुढे बोलु लागले...

"साहेब, प्रत्येक अभेद्य किल्ल्याला आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी एक गुप्त मार्ग असतो. दुर्दैवाने या किल्ल्यालाही आहे. बँकेच्या लॅटरीनमध्ये एका शेजारी एक असे तीन आरसे लावलेले आहेत. त्यातला मधला आरसा ३६० अंशामध्ये फ़िरतो. तेथुन थेट तिजोरीच्या आत जाण्याचा गुप्त दरवाजा आहे. तो फ़क्त मला आणि व्हॉल्टच्या मालकांना माहीत आहे. हा दरवाजा फक्त आणीबाणीच्या वेळीच वापरण्यासाठी आहे. आजपर्यंत एकदाही तो उघडाण्याची गरज पडलेली नाही. तो उघडण्याची कळ तिथेच आहे . ती जाणुन घेण्यासाठी, त्याने माझ्या नातीला काही काळाकरीता गायब केले होते...त्याच्या बदल्यात मी त्याला फ़क्त त्या कळीची माहिती आणि पेठेंच्या तिजोरीचा पुढचा कोड पुरवायचा होता. आधीचा कोड त्याने कोठुन मिळवला ते मात्र तोच सांगु शकेल ! "

"राजन, त्यांना जावु दे..आत्ताच आपण त्यांच्यावर कुठलही आरोप ठेवणार नाही आहोत..!"

आभार मानुन रस्तोगी बाहेर पडले.

"साहेब, तुम्ही त्याला जावु का दिलेत. त्याचा जबाब आपल्याकडे रेकॉर्ड आहे. आपण त्याला अडकवु शकतो."

"नाही राजन, त्याला जावु दे, पण त्याच्यावर नजर ठेव. 'तो' कदाचित रस्तोगीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल."

"हे सगळं फ़ार कठीण होत चाललंय, राजन...!"

निंबाळकर आता मात्र हताश होवु लागले होते.

"तुझ्या लक्षात येतंय का आपण कठपुतळीसारखे त्याच्या तालावर नाचतोय. आणि गंमत म्हणजे त्याला पुर्ण विश्वास आहे की हि केस कोर्टात उभी राहणार नाही...नाही राजन, केवळ हिर्‍यांची चोरी एवढाच त्याचा हेतु नाहीये. हे वाटते तेवढे सोपे नाहीये राजा...कुठेतरी पाणी मुरतंय!"

ट्रिघ..ट्रिंग.....ट्रिंग ..ट्रिंग....निंबाळकर फ़ोनकडे धावले.

"राजन फ़ोन टॆप कर त्याचाच असेल."

"प्रतापराव , आम्ही हंबीरराव बोलतोय," फोन निंबाळकरांच्या पिताजींचा होता. " आयला, आता सरदारसाहेबांचं लेक्चर ऐकावं लागणार.....!"

"प्रतापराव, तुमचं एक पत्र आलंय इकडे...कुणा जुन्या मित्राचं आहे बहुतेक.एका कोपर्‍यात ' फ़क्त कॅसानोव्हासाठी' असं लिहलय इथे."

"कॅसानोव्हा ....वेडा मुक्या, भारतात परतला की काय ? च्यायला कुठली वेळ साधलीस रे..मी इथे अडकलोय आणि...!"

"पाकिटावर, अर्जंट असं लिहलय, प्रतापराव. आम्ही गोविंदाला पाकिट घेवुन मूंबईला रवाना केलंय अर्ध्या तासापुर्वीच, तो पोचला की कळवा आम्हाला. आणि तुमचं हे प्रकरण संपलं की सुनबाईला घेवुन या सातारला. आम्ही वाट पाहतोय."
फ़ोन ठेवला गेला आणि निंबाळकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

त्यांना मुक्या आठवला, लहान सहान गोष्टीवरुन वाद घालणारा..हुशार , मिस्किल....त्यांच्या भोवती कायम घोंघावणार्‍या कन्यका बघुन त्यांना कॅसानोव्हा म्हणुन चिडवणारा...बापाच्या अमर्याद श्रीमंतीला कंटाळलेला, नेहेमी काहीतरी थ्रिल हवं असणारा...आणि सारखा कसली - कसली कोडी घाल.......!"

"पण हे कसं शक्य आहे? नाही असुही शकेल..! पण मुक्या हे कशाला करेल? पण करणारच नाही कशावरुन? नाहीतरी भलते सलते अंगावर येणारे खेळ खेळायची त्याची सवयच आहे..."

निंबाळकर साहेब स्वत:शीच बडबडत होते.

"आयला आमच्या साहेबाला वेड लागलं बहुतेक", भोसले चांगलेच वैतागले.

थोड्या वेळाने गोविंदा आला. निंबाळकर साहेबांनी त्याच्या हातातल्या पाकिटावर झडपच घातली. आतल्या पत्रावर फ़क्त एकच ओळ होती....

"आप्पा, लगोलग टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला ये..चौथा मजला. रुम नं. ४३३.
तुझाच मुक्या."

"मुक्या, आणि टाटाला......" निंबाळकर हादरले...

"राजन, गाडी काढ, मला वाटतं आपण या केसच्या अंतापाशी पोहोचलो आहोत. आता जर उशीर केला तर तो पुन्हा एकदा जिंकेल आणि मग आयुष्यभर मला चिडवत राहील."

"दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा निंबाळकर आणि मुक्याचा कॉमन मित्र विक्रम त्यांची वाटच पाहात होता. नेहेमीप्रमाणेच उशीर केलास आप्पा, मुक्या पुन्हा एकदा जिंकलाय. पण आता तो तुला चिडवायच्या पार पलिकडे निघुन चाललाय रे", विक्रमला रडु आवरत नव्हते.

"विक्या, हा काय प्रकार आहे? मला जरा सांगशील का....?"

"आप्पा, मुक्याला रक्ताचा कॅन्सर झाला आहे. शेवटचे काही क्षण बाकी आहेत. सहा महिन्यापुर्वी अमेरिकेतुन आल्यावर मला भेटला तेव्हा तसा चालत फ़िरत होता. माझ्याकडे आला तेव्हा पहिल्यांदा तुझी चौकशी केली. तु पोलीसात भरती झाला आहेस हे कळाल्यावर म्हणाला. चल जायच्या आधी आप्पाला आणखी एकदा पराभवाचा धक्का देवुन जाइन. त्यामुळेच त्याने तुझ्याशी संपर्क साधला नाही. आता डॊक्टरांनी जेव्हा अल्टिमेटम दिला तेव्हा तुला भेटायला बोलवलं त्याने. जा आप्पा, भेट त्याला , नाहीतर .........., खुप उशीर होइल रे...!

'मुक्याकडे पाहवत नव्हते, नाका तोंडात नळ्या घातलेल्या, हाडांचा सापळा झालेला. निंबाळकरांना विश्वासच बसेना. समोर बेडवर पहुडलेला माणुस आपला तोच हसतमुख, देखणा मित्र मुकेश कोठाडियाच आहे..?

"मुक्या काय करुन घेतलंस रे हे? आणि आधी का नाही कळवलंस.........".निंबाळकर साहेबांचे डोळे पाणावले होते.

"मुक्याने कष्टाने मान वळवली. त्याच्या डोळ्यात मात्र तोच मिष्किल खोडकरपणा अजुनही होता. आप्पा, ये रे..पण उशीर केलास माठा, थोडी लवकर सोडवली असतीस केस तर आपली भेट आधीच नसती का झाली. पण साल्या तु माठ्या तो माठ्याच राहिलास. सगळं मलाच उलगडुन सांगावं लागलं.....त्याला हसताना देखील खुप कष्ट होत होते."

"बरं बाबा, मान्य तु जिंकलास...!" निंबाळकरांना त्याची अवस्था पाहुन भरुन आलं होतं. पण लगेचच त्यांच्यातला पोलीस अधिकारी जागा झाला.

"मुक्या सगळं कळलं..फ़क्त काही प्रश्न.... या अवस्थेत तु हे सगळं कसं काय घडवुन आणलंस ?... गुप्त दरवाजाबद्दलची माहीती कुठुन मिळवलीस, आणि रस्तोगीच्या नातीला गायब केलंच होतंस तर मुळात गुप्त दरवाजाची गरजच का पडली ?
पेठेंचा कोड तुला कसा मिळाला. आता ते हिरे कुठे आहेत...सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सगळं कशासाठी ? कसलं समाधान मिळवलंस यातुन?"

"अरे, हळु यार शेवटच्या प्रवासाला निघालोय आता मी. एक एक प्रश्न विचार ना. ....
तुला आठवतं आप्पा, मी नेहेमी म्हणायचो तुला , या बसुन खाण्याचा कंटाळा आलाय आता. विक्या चेष्टेत म्हणाला चला कुठेतरी दरोडा घालु. तर तु म्हणालास ..विचारही करु नका...मी पोलीसात भरती होणार आहे...गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. तेव्हाच ठरवलं होतं की एकदा का होइना तुला धक्का द्यायचा. आणि जेव्हा कळालं की आपलं तिकीट कटलंय म्हणुन, तेव्हा ठरवलं की आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. असो.. आता तुझ्या प्रश्नांची उत्तरे...

"मी हे कसं घडवुन आणलं..तर मी फ़क्त प्लान आखला. अंमलात आणणारे हात वेगळे होते. नाही, त्यांचा विचारही करु नकोस. ते कधीच भारताबाहेर पोहोचलेत..त्यानंतरच मी तुला इकडे बोलावुन घेतलं.

गुप्त दरवाजा, इथे पण तु कमी पडलास आप्पा, थोडी खोलात जावुन माहीती काढली असतीस तर कळालं असतं तुला की जेफ़रसन बँकेच्या आराखड्यापासुन बांधकामापर्यंत सारं कंत्राट कोठाडिया ग्रुप कडेच होतं. पण तु माझी कोडी सोडवण्यातच अडकुन पडला होतास. काही म्हण आप्पा, पण तुला भलतीकडेच गुंतवुन ठेवायची माझी आयडीया मस्तच होती की नाही. आणि रस्तोगीची नात माझ्याकडे असताना गुप्त दरवाजाची गरज काय..तर मला रस्तोगी अंकलना कुठेही अडकवायचं नव्हतं. खरं सांगायचं तर रस्तोगी अंकलच्या नातीला मी पळवलंच नव्ह्तं..कारण मी काय काय करणार आहे हे त्यांना पहिल्यापासुन माहीत होतं, कोठाडिया ग्लास वर्क्स मध्ये १० वर्षे इमाने इतबारे नौकरी केलीय त्यांनी. मला माहीत होतं तुला कितीही दम दिला तरी तु त्यांचा जबाब रेकॉर्ड करणार, म्हणुन मीच त्यांना तसं सांगायला सांगितलं होतं....

एवढे बोलुनच मुक्याला धाप लागली होती. डोक्टर रागवायला लागले. तसं मुक्यानेच त्यांना अडवलं...,
" देसाइकाका..आता शेवटचे काही क्षण राहिलेत, मित्राच्या शंका मिटवतो आणि मग तुम्ही म्हणाल ते ऐकतो..."

हा तर आप्पा मी कुठे होतो..
हा तुझ्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले, आता तिसरा प्रश्न...
पेठ्यांच्या पासकोड बद्दल...! किती रे बावचळला आहेस आप्पा तु.. अरे श्री. चिंतामणी पेठ्यांचे एकुलते एक सुपुत्र श्री. त्रिविक्रम पेठे गेले सहा महिने सतत माझ्या बरोबर आहेत. पेठेकाकांचा कोड मिळणं काय अवघड होतं ?"

"आत्ता या घडीला त्यांचे हिरे त्याच बँकेत दुसया एका लॊकरमध्ये आहेत...!"

"हे करुन मी काय साधलं तर ते तुला चांगलंच माहीत आहे आप्पा....असो , केस कोर्टात उभी करायची का नाही तो तुझा आणि पेठेकाकांचा प्रश्न आहे. मला वाटतं अजुनही काकांनी एफ. आय. आर. नोंदवलेला नाही. जरी केस उभी राहीलीच तरी एकच विनंती, कृपया दुसर्‍या कुणालाही यात गुंतवु नकोस रे. त्यांनी जे काही केली ते माझ्यावरच्या प्रेमापोटीच केलेय. चल येतो रे, खुप थकलोय. .."

"डॉक्टरकाका, माझं डोकं आप्पाच्या मांडीवर ठेवता येइल. खुप त्रास दिलाय त्याला. हा शेवटचाच.."

सतत बोलुन आलेल्या अतिव थकव्याने दमुन मुक्याने आपले डोळे मिटुन घेतले.....

निंबाळकर कंठ दाटल्या अवस्थेत म्हणाले..

"मुक्या हा असला जिवघेणा खेळ कशाला खेळलास रे...!"

मध्येच निंबाळकरांना जाणवलं की त्यांच्या हातातला मुक्याचा हात गळुन पडलेला आहे. विक्रमने शांतपणे मुक्याचे हसरे डोळे मिटले..,

" आप्पा, मुक्या पुन्हा एकदा जिंकला रे...आत्ता काही तु त्याला पकडु शकणार नाहीस.....!"

निंबाळकर साहेबांना मुक्याला भेटल्यापासुन पहिल्यांदाच रडु कोसळले....त्यांचा हा खेळिया पुन्हा एकदा त्यांना हरवुन फ़ार पुढे निघुन गेला होता.

सब. इन्स्पे. राजन भोसले मात्र मुक्याच्या दुसर्‍या हातात अडकलेल्या कागदाकडे सुन्नपणे पाहात होते...हा अफ़ाट खेळीया जाता जाता आपली शेवटची खेळी खेळुन गेला होता...

कागदावर लिहीले होते.....

ωon reckol

विशाल.

गुलमोहर: 

माफ करा हं, पण आधीच्या दोन भागांनी उंचावलेली अपेक्षा ह्या भागाने पुरी केली नाही. जरा गडबडीने कथा संपवल्यासारखे वाटले. १ल्या भागात जे चार ओळीत अंकदिले होते, त्यातल्या एकाच ओळीचा खुलासा झाला. बाकीच्या ओळींचा आणि पुढील क्लुंचा संदर्भ असेल असं वाटलं होतं,
तुमच्या कथा छान असतात, पण या कथेने निराश केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही शुभेच्छा!

प्राची मोदक....
विशाल तीसरा भाग टाकायला जरा घाइ केलीत. उद्या कींवा उशीरा टाकला असता तरी जरा काही वेगळे सुचले असते....
असो पण एकुणात छान.. Happy

विशाल.. सगळे भाग एका दमात वाचुन संपवले....
पहिले दोन छ्हान होते...
माफ कर.... पण .........ईन्स्पे. निंबाळकरांचा पराभव नाही पचला..... कदाचित नेहमी हिरो जिंकण्याची सवय अस्लयाने असेल ......

लेखनात थोडया त्रुटी वाटल्या पण एकन्दरीत उत्कन्ठावर्धक कथा.

सगळे भाग एकाच दमात वाचुन काढले. कथा उत्कंठावर्धक होती यात शंकाच नाही. पण पहिल्या कोड्याचे उत्तर समाधानकारक मिळाले नाही (एकच ओळीचा खुलासा झाला). बाकी कोडी अगदी छान मांडली आहेत. दा विन्सी कोडची आठवण झाली. कथा मस्त आहे. अजुन येऊदेत अशा कथा विशाल. Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

विशाला, हिर्‍यांचं काय झालं रे?

विशाल,
कथा चांगली जमवून आणलीस. मला आवडली. Happy
कथालेखनाकरता तुला भरपूर शुभेच्छा.. Happy

पल्ली, हिरे त्याच बँकेच्या दुसर्‍या लॉकर मध्ये.
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

किरु, पल्ली, सुमेधा, प्राची, मंगेश, नितीन पीव्ही धन्यवाद.

नितीन माझ्या कथेचा हिरो माझा खेळिया होता ( स्लिपिंग पार्टनर म्हण हवे तर), निंबाळकर नव्हे.

पहिल्या कोड्यातील फक्त तिसरी ओळ महत्वाची होती. इतर ओळी केवळ दिशाभुल करण्यासाठी होत्या.

पण हिर्‍यांचं कोडं अजुन कायम आहे. ते तिथेच आहेत..पण कुठल्या लॉकरमध्ये. उत्तर कथेतच आहे? माझ्यासाठी कथा संपलीय. पण तुम्हाला अजुन शोध घ्यायचाय. ऑल दी बेस्ट. Wink ; Wink

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

विशाल,
माफ कर पण माझ्या ही अपेक्षा फार उंचावल्या होत्या, त्यामानाने ३रा आणि अंतिम भाग सो सो वाटला मला... Sad

आता सांग, कोण आहे खेळिया ! प्रामाणिक प्रतिसादासाठी सगळ्यांचे आभार. पण मला हे अपेक्षितच होते. पहिल्या दोन भागानंतर आपल्या मनात आपोआप एक कन्सेप्ट तयार होते. आणि मग अचानक काही अनपेक्षित असं समोर आलं की निराशा होते. पण माझ्या कथेचा हा शेवट आधीच ठरलेला होता. मुळात रहस्यकथा किंवा बँक रॉबरी लिहीणे हा माझा हेतु कधीच नव्हता. एक मस्त खेळ खेळणे आणि मग वाचकांच्या प्रतिक्रिया अभ्यासणे हाच यामागचा मुळ हेतु होता. तो मी खेळलो. त्यानंतर वाचकांच्या येणार्‍या विविध प्रतिक्रिया हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. काही गोष्टी वाचकांच्या मनोरंजनासाठी केल्या जातात तर काही स्वतःच्या अभ्यासासाठी. थोडा फार स्वार्थ पाहायलाच हवा, नाही?
असो...हिरे कुठल्या लॉकरमध्ये आहेत ते अजुन कोणीच सांगत नाहीय्रे !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

>>>>>...हिरे कुठल्या लॉकरमध्ये आहेत ते अजुन कोणीच सांगत नाहीय्रे !
>>>>>ωon reckol
locker no 1 का ?

असो, कथा आणखी खुलवली असती तर मजा आली असती, पण त्यातले संवाद एकदम झ्याक !
...........................................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !

लॉकर नं. ८ असेल.

पहिल्या दोन भागांत अपेक्षा उंचावल्या होत्या. आणि कथेत ओरीजिनॅलिटी हवी राव.... जेफरसन बँक, "चिंतामणी""पेठे" वगैरे नावं ढापलेली कळतात.

ωon reckol
>> locker no 10 ?
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

सगळ्यांचे आभार. अंदाज अजुनही चुकताहेत !

मंजुड....

चिंतामणी, पेठे ही नावे कुठुनही ढापलेली नाहीत तर ती महाराष्ट्रात अतिशय विख्यात अशा सराफांच्या नावावरुन घेतलेली आहेत. ठाण्यातले चिंतामणी ज्वेलर्स आणि वामन हरी पेठे तले 'पेठे' . सोने किंवा हिर्‍यांच्या व्यवसायातली ही नामांकित नावे असल्याने वापरली इतकेच. जेफर्सन बँक आपण कोठे वाचले आहे, पाहिले आहे मला माहित नाही, पण केवळ नाव सारखं आलं म्हणुन ती ढापाढापी ठरते का? की अजुनही काही साम्य आढळते आहे का ? तसे असल्यास कृपया सांगा.

असो, इतरांना अजुन एक क्लु देतोय...या शेवटच्या शब्दातलं पहिलं अक्षर एक ग्रीक / रोमन अल्फाबेट आहे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

९ ?

लॉकर नं. २.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
झुळुक आणखी एक, आणखी एक पान गळले..

जावु दे मित्रांनो, मीच कंटाळलो आता. सांगुनच टाकतो. मी एक क्लु दिला होता...
"या शेवटच्या शब्दातलं पहिलं अक्षर एक ग्रीक / रोमन अल्फाबेट आहे."

ωon reckol... यातला ' ω ' हे अक्षर याला रोमन लिपी मध्ये " ओमेगा " असे म्हणतात.
ओमेगा हे रोमन लिपीतले चोविसावे अक्षर आहे.

सो..लॉकर नं. २४ हे उत्तर आहे. खालील लिंक पाहा

http://mrad.iwate-med.ac.jp/member/makoto/greek-1a.htm

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

लॉकर न. २४ तर नव्हे.. Happy

अरे!!! मी उत्तर लिहिणार तेवढ्यात तू लिहिलस उत्तर विशाल.. Proud

पण ते अक्षर ओमेगासारखे दिसतच नाही. एक उभा आयत दिसतोय.
मंजू, सखी म्हणूनच तुम्ही आठ, सात सांगितलेत का? आणि आफताफ, आशु, प्राची तुम्ही लॉकर क्रमांक अनुक्रमे ९, १० आणि २ कसा काढलात?

कदाचित हा वेगवेगळ्या ठिकाणी इंस्टॉल केलेल्या एम एस ऑफीसचा प्रॉब्लेम असु शकेल. बर्‍याचदा ऑफीस पुर्णपणे इंस्टॉल न करता, टिपिकल इंस्टॉल केलं जातं , त्यात सगळे ऑप्शन येत नाहीत.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

विशाल,
तु डिटेक्टिव्ह बरोबरंच चांगला सर्जन ही झाला असतास... Proud

पण मित्रांनो, W हे अक्षर २४ वं नसुन २३ वं आहे....!!

तु शून्यापासून मोजत असशील योग्या.. Happy
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

योगी,
मित्रा , तु माझे स्पष्टीकरण वाचलेले दिसत नाही. तो ओमेगा आहे...डब्ल्यु नव्हे.
आणि रोमन/ग्रीक लिपीत ओमेगा हे चोविसावे अक्षर आहे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

Pages