पूर्व युरोप भाग २ - बुडापेस्ट

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

भाग पहिला www.maayboli.com/node/50524

आम्ही डीनर क्रूझवर फक्त क्रूझचाच पर्याय घेतला होता. बोटीवरून बुडापेस्टचा रात्रीचा नजारा मस्तच होता.

चेन ब्रिज आणि बुडामधला राजप्रासाद

हंगेरीयन संसद

बुडा किल्ला आणि तिथले चर्च

क्रूझ संपल्यावर तिथल्या मुख्य शॉपिंग स्ट्रीटवर थोडा वेळ भटकलो आणि तिथल्याच एका इटालियन रेस्तराँमधे जेवून हॉटेलवर परतलो.
दुसर्‍या दिवशी सकाळी पेस्टमधले ज्यूइश सायनागॉग बघायला गेलो. हे युरोपमधले सगळ्यात मोठे सायनागॉग आहे. तिथे खूप मोठी रांग असल्यानं आम्ही आत काही गेलो नाही. तिथून आम्ही मुख्य शॉपिंग स्ट्रीटवरच्या अंडरग्राउंड गिफ्ट मार्केटमधे जाउन बुडापेस्टची आठवण म्हणून फ्रीज मॅग्नेट घेतलं (आम्ही बघितलेल्या प्रत्येक शहर/देशाचे फ्रीज मॅग्नेट घेतले आहे). तिथून बाहेर पडल्यावर ही युवती पारंपारिक हंगेरियन (हंगेरियन संस्कृतीला मॉज्यॉर असे पण नाव आहे) वेषात उभी होती. (फोटो तिच्या परवानगीनं घेतलाय).

तिथून मग आम्ही "शूज ऑन द डॅन्यूब" बघायला गेलो.

हा एक वेगळाच अनुभव होता. हे दुसर्‍या महायुद्धावेळी "अ‍ॅरो क्रॉस" नावाच्या फॅसिस्ट संघटनेनं डॅन्यूब नदीच्या तीरावर मारलेल्या ज्यू लोकांचं स्मारक आहे. ज्यूंना नदीच्या तीरावर उभे करून मारायच्या आधी त्यांचे शूज काढायला लावत. गोळ्या मारल्यावर ते लोक आपोआपच नदीत पडत आणि वाहून जात. त्यातल्या ६० शूजच्या लोखंडी रिप्लिकांनी हे स्मारक बनलंय. चित्रपट दिग्दर्शक कान टोगे आणि शिल्पविशारद ग्युला पॉअर या दोघांनी मिळून २००५ मधे हे स्मारक उभारलंय.

तिथून आम्ही जवळच्याच गोविंदा नावाच्या इस्कॉनवाल्यांनी चालवलेल्या व्हेज रेस्तराँमधे जेवून 'हिरोज स्क्वेअर"ला (Hősök ter) गेलो. हंगेरीचे सात राजे आणि इतर महत्त्वाचे नेते, ज्यांनी हंगेरीच्या इतिहासात मोलाची कामगिरी केली त्यांचे हे स्मारक.

याच्या मागेच स्झेशेन्यि (Szechenyi) थर्मल बाथ आहे. बुडापेस्ट नैसर्गिक गरम पाण्याच्या झर्‍यांसाठीपण प्रसिद्ध आहे. या झर्‍यांवर सार्वजनिक हमामखाने(बाथ) आहेत. Szechenyi हा त्यातला सगळ्यात मोठा.

हंगेरीत जवळजवळ १५० स्पा/बाथ आहेत. या बाथवरती एखाद्या स्विमिंग पूलसारख्या सर्व सोइ असतात. टॉवेल्स आणी पोहायचे कपडे भाड्यानेही मिळतात. इथे जाताना हंगेरियन चलनात (फ्लोरेंट्स) मधे रोख रक्कम घेउन जाणं जास्त चांगलं कारण भाडं आणि डिपॉझिट दोन्ही रोखच द्यावं लागतं. मुलीबरोबर इथं १-२ तास घालवून आम्ही हॉटेलवर परत गेलो. जाताना आम्हाला १ क्रमांकाची मेट्रो घ्यायची होती. ही काँटिनेंटल युरोपातली पहिली मेट्रो लाइन. याच्या आधी फक्त लंडनची ट्यूब चालू झाली होती (इंग्लंडला काँटिनेंटल युरोपचा भाग समजत नाहित Happy )

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरची व्हिएन्नाची रेलजेट पकडायची होती.

हंगेरीची काही माहिती -

राजधानी - बुडापेस्ट
भाषा - मॉज्यॉर
चलन - फ्लोरिंट. इथं चलनाचं अवमूल्यन इतकं आहे की साध्या ब्रेडची किंमत सुद्धा ३०० फ्लोरिंट वगैरे असते. शिवाय चलनाची कमीतकमी किंमत १ फ्लोरिंटच आहे (१ रूपयाचे जसे १०० पैसे असतात तसं फ्लोरिंटचं नाहिये). त्यामुळे इथं दुकानात गेलं की १००० फ्लोरिंटवगैरे सहज बील होतं. लाखांमधे कमवायचं आणि लाखामधेच खर्च करायचा Wink

रूबिक क्यूबचा निर्माता एर्नो रूबिक हा हंगेरियन होता.

क्रमशः

टण्यानं सांगितलेल्या दुरुस्त्या आणि अधिक माहिती-

टण्या | 28 August, 2014 - 05:18नवीन

काही सुधारणा वा अधिक तपशीलः हंगेरी वा हंगेरीअन हे इंग्लिश नाव आहे (जसे भारत - इंडिया, ड्यॉइशलँड - जर्मनी). हंगेरिअन स्वतःला मॉज्यॉर म्हणवतात (म्हणजे हंगेरिअन), देशाला मॉज्यॉरोर्शाग म्हणतात. हंगेरिअन भाषेला मॉज्यॉर वा मॉज्यॉरन्येव म्हणतात. हंगेरिअन वंशाच्या लोकांना (रोमा जिप्सी सोडून) देखील मॉज्यॉर म्हणतात.

हंगेरीत सर्वसाधारणपणे प्रवासी बुडापेस्टच बघतात. मात्र तुम्हाला अधिक वेळ असेल तर बुडापेस्टबरोबरच पेच केच्केमेत, सेगेड ही साधारण मध्य-दक्षिणेकडची छोटी शहरे आणि थोडे उत्तरेकडचे एगेर (त्याच्याच जवळ सिल्वाशवाराद हे हिल स्टेशनसारखे एक गाव) व वाइनसाठी प्रसिद्ध असलेले तोकाई ही गावेही बघू शकता. हंगेरिअन समुद्र म्हणुन प्रसिद्ध असलेल्या बालाटोन तळ्याभोवताली प्रत्येक गावात राहण्यासाठी उत्तम सोयी आहेत, बालाटोनच्या काठाला वाइन वा बीअर पीत दिवस घालवणे या पेक्षा सुखी गोष्ट विरळच.

भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/51991

हे पण मस्त. तो पूल हम दिल दे चुके वाला आहे का? Happy तो मुलीचा पारंपारिक ड्रेस पण सुरेख आहे. फ्रिज मॅग्नेट चा सिलेक्षनचा असा एक फोटो कधीतरी टाका.

मस्त ओळख रे मनिष.

काही सुधारणा वा अधिक तपशीलः हंगेरी वा हंगेरीअन हे इंग्लिश नाव आहे (जसे भारत - इंडिया, ड्यॉइशलँड - जर्मनी). हंगेरिअन स्वतःला मॉज्यॉर म्हणवतात (म्हणजे हंगेरिअन), देशाला मॉज्यॉरोर्शाग म्हणतात. हंगेरिअन भाषेला मॉज्यॉर वा मॉज्यॉरन्येव म्हणतात. हंगेरिअन वंशाच्या लोकांना (रोमा जिप्सी सोडून) देखील मॉज्यॉर म्हणतात.

हंगेरीत सर्वसाधारणपणे प्रवासी बुडापेस्टच बघतात. मात्र तुम्हाला अधिक वेळ असेल तर बुडापेस्टबरोबरच पेच केच्केमेत, सेगेड ही साधारण मध्य-दक्षिणेकडची छोटी शहरे आणि थोडे उत्तरेकडचे एगेर (त्याच्याच जवळ सिल्वाशवाराद हे हिल स्टेशनसारखे एक गाव) व वाइनसाठी प्रसिद्ध असलेले तोकाई ही गावेही बघू शकता. हंगेरिअन समुद्र म्हणुन प्रसिद्ध असलेल्या बालाटोन तळ्याभोवताली प्रत्येक गावात राहण्यासाठी उत्तम सोयी आहेत, बालाटोनच्या काठाला वाइन वा बीअर पीत दिवस घालवणे या पेक्षा सुखी गोष्ट विरळच.

मस्त वर्णन, सुंदर फोटो.. त्या बूटांसारखेच ज्यू लोकांच्या बॅगांचे पण स्मारक आहे ना ? कुठेतरी फोटो बघितल्यासारखा वाटतोय.

धन्यवाद मंडळी Happy

दुरूस्तीसाठी धन्यवाद टण्या. तू तिथं बरेच दिवस होतास त्यामुळं तुला उच्चार जास्त चांगले माहिती असतील Happy अजून काही दुरुस्ती असेल तर नक्की सांग. वरती योग्य तिथे बदल केलेत. तुझी माहितीपण टाकली आहे.
हंगेरीची वाइनपण हळूहळू प्रसिद्ध होत आहे. मी तिथलं स्थानिक पेय 'पालिंका' घेउन आलो बेल्जियमला. पण ते माझ्या आवाक्याबाहेरचं आहे असं पहिल्याच घोटात लक्षात आलं (४५% अल्कोहोल) Wink

फ्रिज मॅग्नेट चा सिलेक्षनचा असा एक फोटो कधीतरी टाका. >> येस अमा. सध्या बहुतेक सगळे मॅग्नेटस पुण्यात आहेत. देशात परत गेलो की टाकीन. तोपर्यंत अजून थोडे गोळा करायचा प्लॅन आहे Wink

हंगेरिअन वंशाच्या लोकांना (रोमा जिप्सी सोडून) देखील मॉज्यॉर म्हणतात. >>>> मायबोलीकर रोमा, जिप्सींचं काय मध्येच असं वाटून बराच काळ अडखळले इथे. मग उलगडा झाला. Happy