एवढी तक्रार आहे

Submitted by निशिकांत on 27 August, 2014 - 10:30

वाहणार्‍या आसवांची एवढी तक्रार आहे
आपुल्यांनी वार केले, मूक का चित्कार आहे?

बंद का संवाद झाला? शांत ही वस्ती मुक्यांची
सांगतो गोष्टी स्वतःला, देत मी हुंकार आहे

बेसहारा बालकांच्या आश्रमाचे बिंग फुटले
रोज माळ्याचा कळ्यांशी चालतो व्यभिचार आहे

देश लुटला मुक्त हस्ते, कोणते सत्कार्य केले?
का तरी तिस्मारखाँचा, योजिला सत्कार आहे

वेस गेली, पार गेला, का तुम्ही शहरतल्यांनो
गाव गिळले, संस्कृतीचा करविला संहार आहे?

पोलिसांनी नोंद केली तत्क्षणी जर का गुन्ह्याची
निश्चये ठाण्यात झाला, त्या अधी व्यवहार आहे

छेडता पोरींस का रस्त्यावरी रे डँबिसांनो?
ज्येष्ठ करता हेच लपुनी, सभ्य शिष्टाचार आहे

जानवे हरवून गेले, बाप संध्याही विसरला
सोहळा व्रतबंध झाला एक सोपस्कार आहे

संकटे घोंघावती पण घोर "निशिकांता"स नाही
वादळांना तोंड देणे, जीवनाचे सार आहे

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जानवे हरवून गेले, बाप संध्याही विसरला
सोहळा व्रतबंध झाला एक सोपस्कार आहे

मस्त ..