चकवा

Submitted by अज्ञात on 23 August, 2014 - 08:25

कठीण आणि कमाल बोलतेस तू कधी कधी ….
तुला उमजलंय हे मला समजलंय …
तुझ्या शुभ्रतेतली मोरपिसं पाहिली आहेत मी ….
माहिती आहे मला; तू एक चकवा आहेस …. !!

भरकटतो मी वाट नेहमीच … तुझ्यामुळे … !

सापडतेस तू मला धुक्यात कधीतरी दंवासारखी …
साकळतेस विरघळतेस ओघळतेस ……
… मागे कुठलाही प्राकृतिक पाश न ठेवता
…. अस्पर्श !!

पण स्पर्शच असतो तो झुळुकेसारखा …।
हवा हवासा ….
आशेला चाळवणारा …!!

जाणिवेच्या हळव्या कळा बेमालूम कळतात तुला
काळजाची भाषा जन्मजात अवगत आहे तुझ्या शब्दांना
आंसु आणि हसू यांचं सुंदर मिश्रण आहे त्यांच्या संयुगात
म्हणूनच तेवत असते समई त्यांच्यासाठी मुक्याने
माझ्याही माजघरात ….
निर्लिप्त …!!

……………अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users