संशोधन - काळाची गरज

Submitted by सुमुक्ता on 12 August, 2014 - 05:57

मध्यंतरी आमच्या ओळखीच्या एक गृहस्थांकडे जाणे झाले त्यांचा मुलगा बारावी मध्ये आहे. साहजिकच तो पुढे काय करणार ह्या विषयावर त्याच्या आई-वडिलांनी बोलणे सुरु केले. त्याला भौतिकशास्त्र (Physics) या विषयात पुढील शिक्षण घ्यायची इच्छा आहे. अर्थातच त्याचा हा बेत त्याचे आई-वडील हाणून पाडणार आहेत. आजकाल ज्या घरामध्ये दहावी-बारावीतील मुले/मुली आहेत त्या घरात एकाच संवाद असतो -- "अभ्यास कर इंजिनियरिंग (मेडिकलला) प्रवेश मिळवायचा आहे". इंजिनियरिंग आणि मेडिकल ह्यापलीकडे दुसरे क्षेत्र अस्तित्वात नाही आणि आपले मुल इंजिनियर अथवा डॉक्टर झाले नाही तर फार मोठे आभाळ कोसळणार आहे अशी वृत्ती सर्रास दिसून येते.

डॉक्टर किंवा इंजिनियर झाल्यावर पुढे काय करणार? नोकरी नाहीतर प्रॅक्टीस करणार अथवा सॉफ्टवेयर मध्ये जाणार.…. मला संशोधक व्हायचे आहे असं सांगणारे फार थोडे तरुण आढळतील. त्यांना "असल्या" विचारांपासून परावृत्त करण्यासाठी समाजातील अनेक घटक कारणीभूत ठरतात. स्पर्धा हा त्यातील एक प्रमुख घटक. आवड म्हणून एखाद्या विषयाचे शिक्षण घेऊन आणि त्यात सरस कामगिरी करून दाखविण्यापेक्षा, दुसऱ्यापेक्षा मी जास्त यशस्वी आहे हे दाखविण्यातच भूषण मानले जात आहे. आज यश पैशांच्या फूटपट्टी वर मोजले जाते आहे. आणि त्या फूटपट्टीवर संशोधक सदैव अयशस्वीच राहतील. संशोधक मुलगा(गी) आणि लठ्ठ पगाराची नोकरी करणारा(री) मुलगा(गी) ह्यामध्ये लठ्ठ पगारचं बाजी मारतो. हे दुखः दायक असले तरी सत्य आहे. भरपूर पैसा ज्या क्षेत्रामध्ये आहे तिथेच कारकीर्द घडविण्याचा विचार करण्यात खरतरं चूक काहीच नाही. मीही १५ वर्ष पूर्वी तोच विचार केला होता. परंतु भरपूर पैसा मिळवण्याच्या नादात आमची पिढी बाकी कसलाच विचार करताना दिसत नाही.

आज भारतामध्ये हुशार संशोधकांची गरज आहे. नवीन संशोधनासाठी आजही आपण पुष्कळशा प्रमाणावर पाश्चात्य देशांवर अवलंबून आहोत. आपल्याकडे संशोधन होतच नाही असं नाही परंतु लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जेवढे संशोधक निर्माण व्हायला हवेत तेवढे निश्चितच होत नाहीत. भारतीय मुले/मुली हुशार आहेत; परंतु आज आजचा भारतीय तरुण फक्त धावतो आहे पैसा, प्रमोशन, डेडलाईन, अप्रेजल फक्त ह्याच्याच मागे. अनेक हुशार पण असमाधानी अभियंते ह्याच रहाटगाडग्याला जुंपलेले आहेत आणि आय. आय. टी. सारख्या विद्यापीठांमध्ये संशोधकांच्या अनेक जागा रिकाम्या आहेत हे विदारक सत्य आहे. संशोधन क्षेत्राकडे असणारा आपला उदासीन दृष्टीकोन ह्यास कारण कारणीभूत आहे. त्याचबरोबर स्पर्धात्मक युगातील यशाची मोजमापे आपल्याला मेंढरू प्रवृत्तीचे अनुसरण करण्यास भाग पाडत आहे. असली विचारसरणी आपली सर्जनशीलता मारून टाकत आहे असे वाटते.

पाश्चात्य देशांमध्ये संशोधन क्षेत्रात प्रगती होण्याची दोन प्रमुख करणे आहेत. एक म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर आलेली आर्थिक सुबत्ता. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याचे असलेले स्वातंत्र्य, आणि हवे ते शिक्षण घेतल्यानंतरही पोटापाण्याच्या व्यवसायाची उपलब्धता. भारतामध्येही आता सुबत्ता येते आहे. तेव्हा आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये बदल घडविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत ह्याकडे सुद्धा बारीक लक्ष पुरविले गेले पाहिजे. लहानपणापासून मुलांच्या सर्जनशीलतेला आणि जिज्ञासू प्रवृत्तीला खतपाणी घातले तरच अधिकाधिक तरुण संशोधन क्षेत्राकडे वळतील. जे संशोधक होणार नाहीत ते आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये निश्चितच सरस कामगिरी करून दाखवतील.

परंतु सर्वप्रथम आपण आपल्या विचारसरणी मध्ये अमुलाग्र बदल घडविणे आवश्यक आहे. साचेबद्ध यशाच्या संकल्पना मोडून काढायला हव्यात ज्यायोगे आपण एकमेकांशी स्पर्धा करणे टाळू शकतो. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईननी म्हटले आहे "प्रत्येक जणच हुशार असतो पण जर तुम्ही माशाची पात्रता झाडावर चढण्याच्या क्षमतेनुसार ठरवाल तर तो मासा स्वतःला मुर्ख समजण्यातच आयुष्य व्यतीत करेल" ( Everybody is a genius. But if you judge a fish by its ability to climb a tree, it will live its whole life believing that it is stupid). आपली पुढची पिढी अशा पारंपारिक रहाटगाडग्याला जुंपली जाणार नाही हे जर आपण सुनिश्चित करू शकलो तर भारत महासत्ता होण्याच्या दिशेने एक मोठे पाउल टाकेल ह्यात शंकाच नाही.

==

*ह्या लेखामध्ये माझे फक्त निरीक्षण नोंदविले आहे.विभिन्न मतप्रवाह असू शकतात ह्याची जाणीव मला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users