किती हा चांगला रस्ता मिळाला चालण्यासाठी

Submitted by सुशांत खुरसाले on 10 August, 2014 - 08:56

किती हा चांगला रस्ता मिळाला चालण्यासाठी
तुझे घर पाहिजे होते इथे रेंगाळण्यासाठी

नकाशा काढला नाही मनाचा आमच्या कोणी
किती चालायचे नक्की सिमांना शोधण्यासाठी ?

जगाचे कायदे विक्षिप्तसे समजून घे वेड्या
तुला स्वीकारले आहे पुन्हा धिक्कारण्यासाठी

तुझे हे सावरुन जगणे मनाला त्रास का देते ?
करत जा हट्ट तू केव्हातरी या चांदण्यासाठी

कवडशांच्या दुकानांवर उन्हाचा लाभला पत्ता
उन्हाला लाच द्यावी का धरा ओलावण्यासाठी ?

मला वाचायचे होते पुन्हा माझ्याच ओळींना
तुला बोलावले नव्हतेच नुसते लाजण्यासाठी

--सुशांत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती हा चांगला रस्ता मिळाला चालण्यासाठी
तुझे घर पाहिजे होते इथे रेंगाळण्यासाठी

जगाचे कायदे विक्षिप्तसे समजून घे वेड्या
तुला स्वीकारले आहे पुन्हा धिक्कारण्यासाठी

हे दोन शेर आवडले.

जगाचे कायदे विक्षिप्तसे समजून घे वेड्या
तुला स्वीकारले आहे पुन्हा धिक्कारण्यासाठी

मला वाचायचे होते पुन्हा माझ्याच ओळींना
तुला बोलावले नव्हतेच नुसते लाजण्यासाठी

व्वा…

रेंगाळण्यासाठी आणि धिक्कारण्यासाठी हे दोन जास्त आवडले
धिक्कारण्यासाठी ह्या एका शेरावरून माझे दोन शेर आठवले त्यांची जमीनही जवळजवळ अशीच होती

सर्वांचा आभारी आहे .

बेफिजी,
>> धिक्कारणे आणि स्वीकारणे ह्यांची अदलाबदल
केली तर एक वेगळा अर्थ मिळत आहे.<<
हो . जणू काही एक वर्तुळच आहे ते धिक्कार आणि स्विकाराचं . मला सुचताना असंच सुचलं डायरेक्ट .
But thanx for the observation . Happy

वैवकु ,इर्षाद ....:)

मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्‍यासाठी

मला जाणीव आहे विठ्ठला तू स्तुत्य असल्याची
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी

धन्यवाद Happy

जगाचे कायदे विक्षिप्तसे समजून घे वेड्या
तुला स्वीकारले आहे पुन्हा धिक्कारण्यासाठी >>> सर्वात छान.

नकाशा काढला नाही मनाचा आमच्या कोणी
किती चालायचे नक्की सिमांना शोधण्यासाठी ? >>> हादेखील चांगला आहे.
पण 'सिमांना' ही तडजोड खटकली.
(इथे कदाचित 'दिशांना'/'निवारा' शोधण्यासाठी असंही चाललं असतं
असा विचार मनात आला. वैम. कृगैन.)

मतला आवडला फार.... रेंगाळतोय मनात..

तुला स्वीकारले आहे पुन्हा धिक्कारण्यासाठी
>> खूप छान... पहिली ओळ त्यामानाने कमी वाटली..

धन्यवाद Happy