सोहळा

Submitted by अमेय२८०८०७ on 10 August, 2014 - 01:42

साधाच वाटला डाव सुखाची हाव रोजची होती
देहात पेटती भूक भावना मूक मागणी कोती

बेभान दिशांशी संग लागला रंग जगाचा भाळी
संवेग रानटी लाल थांबली चाल ऐकता हाळी

संवाद दोन हृदयांत, नसे गात्रांत, कधी ना कळले
कोरडी आग सगळ्यात वासनेसाथ उभे जे जळले

आलीस वाहती खोल धरेची ओल नांदती नेत्री
सत्त्वात तुझ्या नाहता जणू शुद्धता भासल्या रात्री

नाहीत जाणिवा व्यर्थ मीलना अर्थ निराळा आला
त्यागला जिथे अंगार तिथे शृंगार सोहळा झाला

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेयदा मस्त... श्रुंगाराचा खरा अर्थ उलगडून दाखवते कविता शेवटी शेवटी..
फक्त तिसर्‍या कडव्याप्रमाणे स्वल्पविराम जागोजागी हवे होते... Happy

प्रतिसादकांचे आभार.

निपो, तुमच्या दुर्मिळ प्रतिक्रियेबद्दल विशेष धन्यवाद. Happy
मधली दोन यमके लक्षात आली की यतिसाठी स्वल्पविरामांची गरज नसावी बहुतेक. त्या एका ओळीत केवळ दोन नकार असल्याने वाचनसुलभतेसाठी स्वल्पविराम द्यावेसे वाटले.