वालाचे बिरडे (सीकेपी पद्धत)

Submitted by अवल on 9 August, 2014 - 13:38
walache birade
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भिजवून मोड आलेले वाल सोलून एक वाटी

ओले खोबरे अर्धा वाटी

लसूण 7-8पाकळ्या

हिरवी मिरची एक

1कांदा बारीक चिरून

गूळ आवडीनुसार

2 अमसुलं

जिरेधणे पूड

हिंग, कढिपत्ता, हळद, तिखट, मीठ, तेल, मीठ, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

प्रथम ओलं खोबरं, मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यावे.
पसरट भांडयात तेल तापवत ठेवावे, त्यात हिंग, कढिपत्ता टाकावा. लगेच चिरलेला कांदा टाकावा, लगेच वाल टाकावेत. त्यावर हळद, तिखट टाकून पाच सात मिनिटं सगळे परतावे. मग जिरेधणे पूड टाकून पुन्हा परतावे. आता त्यात वाल भिजतील इतके पाणी टाकून छान उकळू दयावे. आता आच बारीक करून झाकण ठेवावे. वाल शिजले की त्यात वाटण, अमसुलं, गुळ, मीठ, कोथिंबीर टाकावी. छान उकळी आली की झाकण ठेउन मंद आचेवर पाच मिनिटं ठेवावे. नंतर आच बंद करावी.

IMG_20140809_225518.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरावे
अधिक टिपा: 

रंगासाठी फोडणीत थोडे तिखट घालावे. गुळ घातल्यावर वाल थोडे आक्रसतात. तेव्हा वाल नीट शिजल्यानंतरच गूळ, मीठ घालावे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच... फोटो पण मस्तच !
लहानपणी शेजारच्या गुप्तेकाकूंनी भरपूर लाड केलेत माझे. सगळे पदार्थ चवीसकट लक्षात आहेत.

वालाचे बीर्डे + उडदाचा पापड+ अंबा लोणचं + गरमा गरम वाफाळता भात अप्रतिम

हे दुसऱ्या दिवशी खायला अजून चविष्ठ लागत Happy

कुठे होतीस काल? मी एकटीच लढले बिरडयाचा किल्ला >>बिरडं एव्हढं ऑसम दिसतंय ते एकटच पुरुन उरलंय, किल्ला न लढवताच जिंकलास तु.

काल घरी बरेच पाहुणे होते, राखीसाठी, म्हणून इथे फिरकायलाच नाही मिळालं.

मी_केदार -वालाचे बीर्डे + उडदाचा पापड+ अंबा लोणचं + गरमा गरम वाफाळता भात>> अगदी अगदी
या यादीत भर घालते:-
सीकेप्यांच्या तेलपोळ्या
चुलीवर शिजवलेले मटण/चिकन

सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत हा बाफ दिसणार नाही अशी सोय करायला वेमांना सांगायला हवे. कसले अत्याचार होतात जिभेवर! आता डब्यातली भाजी कशी उतरावी घशाखाली?

फोटो ल य भा री - अगदी त्या आमसुलासकट!

वालाचे बीर्डे + उडदाचा पापड+ अंबा लोणचं + गरमा गरम वाफाळता भात अप्रतिम >>>>> +१००

फोटो जबरी, आज संध्याकाळीच वालाचं बिरड खाणार. तोपर्यंत तळमळ.. तळमळ....:)

गूळ आवडीनुसार >> हे सगळ्यात जास्त आवडलं. नाहीतर तिकडं मूगाच्या बिरड्यात चिंचेच्या निम्माच गुळ? Uhoh चुकून दुप्पट ऐवजी निम्मा लिहिलंस काय? Proud

बाकी खायला कधी येऊ ते सांग पटकन Happy

अवल, झक्कास पाकृ आणि फोटो पण Happy छानच लागत असेल. पहिल्या वाफेच्या जीरेसाळ भातासोबत वरून तुपाच्या धारेखाली अ हा हा लागेल !

आम्हीपण डाळिंब्याच म्हणतो. मी ओलं खोबरं न वाटता तसंच घालते.. नो लसूण, नो कांदा. बामणी पद्धतीनं. गोडा मसाला हव्वाच Happy
पूर्वी सदाशिव पेठेतल्या 'लज्जत'मधे पुरी-डाळिंब्यांची उसळ मिळायची. मस्त असायची. आता मिळते की नाही माहिती नाही.

जबरी फोटो... एकदम तोंपासु... मला फार म्हणजे फारच आवडते Happy

माझ्या साबा मस्त करतात हे बिरडे...

वालाचे भटी बिरडे विथ गोडा मसाला पण आवडतेच Happy

वॉव काय फोटो आहे!!
मी कांदा लसूण न घालता करते. आता असं करून बघते एकदा. घरून आणलेले कडवे वाल संपलेत नेमके. इथे कडवे वाल मिळत नाहीत. जे वाल मिळतात ते लहानसे, लवकर शिजणारे आणि चवीलाही वेगळे असतात. तरी करून पाहीन.

मस्त! फोटो झकास.
एक नोव्हीस शंका: वाटण शेवटी शेवटी टाकायचंय, त्यात लसूण आहे, ते कच्चंच चांगलं लागतं?

यस
तसही सीकेप्यांना लसूण भयंकर प्रिय Wink
जोक्स अपार्ट वालाचा हरवसपणा (स्ट्रॉंग वास) लसणाने मारला जातो. शिवाय एक उकळी काढायचीय वाटण टाकल्यावर

Pages