हाव नाही

Submitted by रोहितकुलकर्णी on 9 August, 2014 - 12:28

घनांच्या कलानी किती पायवाटा,
फिरुनी फिरुनी धुळीला मिळाल्या
'जरा थांब'. आभाळ सांगून गेले,
पुढे चालण्याला अता वाव नाही

सखे रक्तवर्णी पुराच्या प्रवाही,
किती ढाळली आसवे काय सांगू?
किनाऱ्यास जाऊन मी थांबलेलो,
इथे बांधलेली कुणी नाव नाही

तुला वेस नाही तुला गाव नाही,
तुझ्या पावलांचा मला ठाव नाही
तुला जायचे जा तिथे तू निघोनी,
तुला भेटण्याची मला हाव नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला भेटण्याची मला हाव नाही<<<

ह्या शेवटच्या ओळीला कडक व वैयक्तीक आयुष्यातून आलेला सलाम!

कविता आवडलीच. अधिक आवडलेल्या ओळी:

सखे रक्तवर्णी पुराच्या प्रवाही,

तुला वेस नाही तुला गाव नाही

तुझ्या पावलांचा मला ठाव नाही

धन्यवाद… सखी / प्रेयासीस उद्देशून लिहिलेली कविता वाटते पण मी लिहिताना कवितेस उद्देशून लिहिली आहे. खूप दिवसांनी कविता लिहिली गेली… त्याचा उद्वेग म्हणता येईल