संगीतकार कौशल इनामदार यांचा स्तुत्य उपक्रम !

Submitted by ANAND PENDHARKAR on 1 January, 2009 - 13:17

नमस्कार.

२००५ सालच्या मुंबई फेस्टिव्हल साठी ६३ मुलांना घेऊन मी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो” ही प्रार्थना सादर केली. याच प्रार्थनेने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. ही आनंदाची गोष्ट आहे. दुःखाची बाब अशी की पुढच्या ३ तासांच्या सोहळ्यामध्ये नाना पाटेकर यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण सोडले, तर मराठीचे एकही अक्षर उच्चारले गेले नाही.

ही वस्तुस्थिती आज आपल्याला सर्वत्र पाहावयास मिळते. महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे दिसत नाही. मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडियो वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. आपल्या मातृभाषेत आपल्याला भाजीपाला विकत घेता येत नाही, आपल्या मातृभाषेत एका जागेवरून दुस-या जागी जाता येत नाही. आपल्याच राजधानीत मराठीला दुय्यम स्थान मिळतं ही खेदाची गोष्ट आहे.

प्रश्न फक्त मुंबईचाही नाही. मराठी लोकांमध्ये मराठीच्या बाबतीत एक औदासिन्य आहे की काय अशी शंका येत राहते. चळवळीच्या नावाखाली काही हिंसक घडामोडी, जाळपोळ आणि भयंकर अस्थिर वातावरण एवढंच मराठीच्या वाट्याला येतं. तुमच्या आमच्यासारखी माणसं या तथाकथित चळवळींचा हिस्सा होत नाहीत आणि याची कारणं स्पष्ट आहेत. पण म्हणून मराठीची अवहेलना होण्याचं थांबत नाही.

मला प्रामाणिकपणे वाटतं की एक चळवळ जनसामान्यांमधूनच जन्मली पाहिजे. मराठीसाठी आपण मराठी भाषिकांनी एकत्र यायची आज जितकी गरज आहे तितकी यापूर्वी कधीच नव्हती. अमराठी लोकांनी मराठीचा आदर बाळगण्याचा आग्रह धरण्याआधी मराठी लोकांमध्ये मराठीचा अभिमान रुजवायची गरज अधिक आहे.

मराठीला एका अभिमानगीताची गरज आहे.

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

सुरेश भटांच्या या शब्दांना मी संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे ३०० गायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्याचा माझा मानस आहे. मराठीतल्या सर्व गायक – वादकांचा यात सहभाग असावा अशी माझी इच्छा आहे.

या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला लागणारा खर्च खरं तर सहज एका प्रायोजकाकडून उपलब्ध होईल. पण तसं केलं तर ते एक व्यावसायिक ‘प्रॉडक्ट’ होईल जो मुळात या मागचा हेतू नाही. ही एक चळवळ आहे आणि त्याचं उगमस्थान जनसामान्यांतच असावं. दोन हजार लोकांनी ५०० रुपये दिले तर या ध्वनिमुद्रणाचा खर्च निघू शकेल.

यात तुमचा सहभाग असला तर मला आनंद होईल. हे काही नेहमीचं मदतीचं आवाहन नाही. हे आमंत्रण आहे – मराठीच्या चळवळीत तुम्ही सहभागी होण्याचं.

आपला,

कौशल श्रीकृष्ण इनामदार

धनादेश ‘मराठी अस्मिता’ ( Marathi Asmita) या नावाने काढून

मराठी अस्मिता, द्वारा कौशल श्रीकृष्ण इनामदार, १०२, त्रिवेणी, शुचिधाम, फिल्म सिटी मार्ग, दिंडोशी बस आगाराजवळ, गोरेगांव (पू), मुंबई—४०० ०६३, महाराष्ट्र, भारत, या पत्त्यावर पाठवावेत. कृपया धनादेशासोबत आपलं नांव, पत्ता, दूरध्वनी क्र., आणि ई-मेल ही माहिती पाठवावी.

हे गीत प्रत्येक मराठी घरात ऐकले जावे आणि प्रत्येक मराठी कार्यक्रमात गायले अथवा वाजवले जावे या उद्देशाने सहभागी होणा-या प्रत्येक व्यक्तीला एक ध्वनिमुद्रिका आणि त्यासोबत माहितीपुस्तिका विनामूल्य घरपोच केली जाईल. हा आपण सर्वांनी साकारलेला प्रकल्प असल्याने माहितीपुस्तिकेत आपलं नाव असेलच पण त्याच बरोबर मराठीबद्दल उपयुक्त माहितही असेल. ही मराठी अभिमानगीताची सीडी १ मे २००९ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रकाशित करण्याचा माझा प्रयत्न आहे.

गुलमोहर: 

शेवटची तारीख काय आहे, कारण चेक बुक जवळ नाहिये. ऑनलाइन ट्रान्सफर करायला अकाउंट नं. मिळेल का ?

प्रिय चि.कौशल,
मी रवी उपाध्ये.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी तुझे हार्दिक अभिनन्दन करतो.लौकरच धनादेश तुला मिळेल.
या व्यतिरिक्त मराठी कविता,भाव गीते व यामाध्यमातून सृजनशील प्रयोग -जे तू सातत्याने करीत आहेस त्याबद्दल्,त्या कळकळी बद्दल तू तमाम मराठी रसिकान्च्या स्तुतीस पात्र आहेस्.तुझी ही तळमळ व संगीत सृष्टी अशीच राहो ,समृद्धीस येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात

नमस्कार रवी दादा,

तुमच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद! उपक्रमाला अप्रतिम म्हणावा असा प्रतिसाद येतोय. तरी अजून प्रसारमाध्यमांकडे गेलो नाहिये. नेहमीसारखाच लोभ असावा!

कौशल

कौशलदा,

हा लेख डोळ्याखालुन निसटला होता. तुमच्या या उपक्रमाला मनापासुन शुभेच्छा.
आजच धनादेश पाठवतोय. उशीराबद्दल क्षमस्व.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

चांगला उपक्रम आहे. २००० मराठी प्रेमी तर चुटकी सरशी मिळतील (भाबडी आशा). एव्हढ्या प्रेमाने आमंत्रण दिलेच आहे, ते कसे काय अव्हेरायचे? मला वाटते आवाहन ललित >(सहज दुर्लक्ष Sad होते) मधे असल्यामुळे लपले गेले असावे

पत्त्या सोबत दुरध्वनी क्रमांक असल्यास रक्कम पाठवणे सुलभ होते (सिटी बँके च्या साईट वर तर हे आवश्यक आहे, नाही तर ते मागणी स्विकारत नाही, लाल तारांक येतो).

माझा दूरध्वनि क्रमांक ९८२०-४५४५०५. आपण ऑन्लाईन पैसे ट्रान्स्फर केल्यास एक विनंती आहे. मला ई-मेल करून आपला पत्ता, दूरध्वनि आणि ई-मेल कळवावा म्हणजे सीडी पाठवणं सोयिस्कर होईल. माझा ई-मेल आहे ksinamdar@gmail.com