" संस्कार "

Submitted by अमेय२८०८०७ on 5 August, 2014 - 12:22

चार घरांचे गाव साजरे डोंगरमाथ्यापाशी
इवली वाहे नदी नांदती हिरवाईच्या राशी
प्रवासातुनी शिणून तेथे काही घटका वसलो
निवाऱ्यासवे अन्न लाभले तृप्त मनाने उठलो

पुढे चालता गर्द सभोती दिसली काळी खाई
मृतदेहांच्या अवशेषांनी खदखदणारी राई
छिन्न शरीरे भग्न जिवांची हाक दाटली कानी
आक्रोशांनी रक्त गोठले कंप उमटले रानी

नकळे कोणी घाव घातला नावनिशाणी मिटली
संहाराच्या वणव्यामध्ये वस्ती अवचित विझली
दुर्दैवाने की रोगाने प्राण हिरावुन नेले ?
अंतामधल्या अलिप्ततेचे क्रौर्य दुखावुन गेले

" तुझ्यासारखी माणसेच ही ", सांगे अंत:स्फूर्ती,
"साधे स्मारक उभारून कर अतृप्ताची पूर्ती "
खणले, जागा समतल केली अस्थी पुरल्या खाली
दगड खुणेचा फुले रानटी थोडी शोभा झाली

पाणी शिंपत विसावताना हलके ऐकू आले
चिरंतनाच्या ओंकारासम नाद स्वरांचे ओले
जणू भासले रान बोलले शल्य मोकळे होता,
"संस्कारांविण तळमळले जे त्यांना मुक्ती आता !"

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय, एकाच वाटेवरचे पण सर्वस्वी वेगळे अनुभव आपण आज कवितेतून घेतलेत. सुंदर रचना.

अंतामधल्या अलिप्ततेचे क्रौर्य दुखावुन गेले<<< अप्रतिम

जणू भासले रान बोलले शल्य मोकळे होता,
"संस्कारांविण तळमळले जे त्यांना मुक्ती आता !"<<< (माळीण दुर्घटना आठवणे अपरिहार्य). सुंदर!

भारती ह्यांच्याशी सहमत!

पाणी शिंपत विसावताना हलके ऐकू आले
चिरंतनाच्या ओंकारासम नाद स्वरांचे ओले
जणू भासले रान बोलले शल्य मोकळे होता,
"संस्कारांविण तळमळले जे त्यांना मुक्ती आता !" >>>> खरंय ...

रचना जमलीये अगदी - सुंदर म्हणवत नाहीये - उध्वस्त माळीण गाव Sad Sad

काय अभिप्राय द्यावा या रचनेला हेच कळत नाही....सुंदर म्हणावे तरी कसे याला हाही प्रश्न पडतो....किति विलक्षण आणि अद्भुत शब्दसंयोजन करता अमेयजी तुम्ही.....नाशिकला या लवकरात लवकर......पुढचे आल्यावर सांगीन

" तुझ्यासारखी माणसेच ही ", सांगे अंत:स्फूर्ती,
"साधे स्मारक उभारून कर अतृप्ताची पूर्ती "

संवेदनेच्या अभिव्यक्तिची अद्भुत कल्पना.... !
आत्ता घडलेल्या माळीण दुर्घटनेबद्दल दुरूनच ऐकलंय, पण गतवर्षीचं केदारनाथाचं तांडव पाहिलंय.... ज्या गावांमध्ये अनेक वेळा राहिलो-जेवलो होतो, जिथली शेकडो माणसं चांगली परिचयाची होती, त्या चाळीसएक गावांच्या खुणा सुद्धा उरलेल्या नसल्याचं पाहिलंय..... या रचनेनं पुन्हा त्या आठवणींना जागं करून विषण्ण केलं !

संस्कार हे शीर्षक वाचल्यानंतर काहीशी वेगळी कल्पना झाली होती.
कवितेच्या अखेरपर्यंत पोहोचल्यावर हे 'अंत्यसंस्काराबाबत' आहे हे स्पष्ट झाले.

"नकळे कोणी घाव घातला नावनिशाणी मिटली
संहाराच्या वणव्यामध्ये वस्ती अवचित विझली" >>> या ओळी सर्वात विशेष वाटल्या.