निसर्गायण - १

Submitted by सायु on 5 August, 2014 - 08:07

श्री दिलीप कुलकर्णी व सौ. पोर्णिमा कुलकर्णी यांच्या निसर्गायण मंडळा बद्द्ल बरेच जणाना जाणुन
घ्यायची इच्छा दिसली. या उपक्रमाबद्द्ल नागपुर चे श्री हेमंत मोहरीर यांनी खुपच मार्मीक शब्दात
मनोगत व्यक्त केले आहे..

निसर्गायण मंडळ – नागपूर – एक वाटचाल
जुलैच्या गतिमान संतुलनच्या अंकात पुण्याच्या बैठकी संदर्भात वाचले आणि खूप दिवसापासून नागपुरात निसर्गायण मंडळ कसे कार्यरत आहे, हे लिहावे असे मनात होते. दिलीपजींनीही तसे खुपदा सांगितले, पण काही कारणास्तव (मुख्यतः लिहिण्याचा आळस) ते झाले नाही.आत्ता पुण्यातल्या बैठकी बद्दलच्या लेखाने हुरूप आला आणि दुसरा काही विचार मनात यायच्या आत लिहायला सुरुवात केली.
३० जानेवारी ,२०११ रोजी नागपुरात दिलीपजीं आणि सौ. पौर्णिमाताई कुलकर्णी यांचे निसर्गायण शिबीर झाले आणि त्या शिबिरात ठरले कि शिबिरातील उत्साह कायम राहावा आणि पटलेले विचार आचरणात यावे या दृष्टिने एक स्वयं-सहायता गट या स्वरूपात सगळ्यांनी(शिबिरार्थी) भेटत राहावे.सांगायला अत्यंत आनंद होतोय कि मार्च २०११ पासून आत्तापर्यंत केवळ काही अपवाद वगळता आम्ही दर महिन्यात आजतागायत भेटत आहोत.
पाहिलेपासून असे ठरविले कि, कुठलीही संस्था करावयाची नाही ,कुठलेही पदाधिकारी नाही .हा गट केवळ व्यक्तिगत आणि कुटुंब या स्तरावर “निसर्गायण” विचारांचे चिंतन व आचरण या पुरता मर्यादित राहील.महिन्यातील एक रविवार,सकाळी १० ते १२ हि वेळ ठरविली. सुरुवातीला , दर स्थापन बैठकीत कुणा ना कुणा पर्यावरण विषयतज्ञाला बोलवायचो.पुष्कळ बैठकीत काही निसर्गस्नेही जीवन जगणा-या लोकांनाही आणले. पुष्कळ संस्थाही आमच्याशी जुळल्या.
सुरुवातीचे काही महिने वरीलप्रमाणे झाल्यावर हळू हळू एक काही जणांचा पक्का गट (प्रत्यक बैठकीला नियमित येणारे ) तयार झाला आणि काही कृतीपर कार्यक्रम करावा असे वाटले.मग एक शुद्धाहार योजना तयार केली आणि सेंद्रिय भाजीपाला शेतकऱ्यापासून सदस्यांना मिळेल अशी एक PILOT प्रोजेक्ट या धर्तीवर योजना आखली.पुष्कळ अडचणीतून मार्ग काढत साधारण ४-६ महिने हि योजना चालविली. पुष्कळ काही शिकलो. त्या योजनेबद्दल तपशीलवार नंतर कधीतरी , पण एक विश्वास मात्र आला कि आपल्यासारखे समविचारी लोक जर एकत्र आले तर आपण आपल्या निसर्गास्नेही जीवनशैली सम्बधी अडचणी सोडवू शकतो.भाजीप्रमाणेच नंतर दुधासाठीही प्रयत्न केला.एक ठरविले होते कि निसर्गायण मंडळ एक FACILITATOR म्हणून सुरुवातीला काम करेल आणि नंतर ज्यांना वाटेल त्यांनी व्यावसायिक तत्वावर(मर्यादित नफ्यासह) योजना चालू ठेवावी.या प्रयत्नातून आज नागपुरात दोन दुध व भाजी वितरीत करणारे व्यावसायिक तयार झालेत आणि ते त्यांच्या वतीने हा कार्यक्रम चालवतात.यात सुरुवातीची शुद्धता मात्र नाही , पण तरीही बाजारातून या गोष्टी घेण्यापेक्षा त्या निश्चितच ठीक आहेत.त्याचबरोबर आम्ही धान्य , गुळ , तेल , फळे आणि इतर मसाल्याचे पदार्थ यासाठीही प्रयत्न केले आणि या बाबतीत बऱ्यापैकी सातत्याने सेंद्रिय माल आणून वितरीत करीत असतो.आम्ही आता असे म्हणू शकतो कि आमच्या आहारातील ६० ते ७० टक्के भाग हा सेंद्रिय आणि शुद्ध आहे.
मंडळ सुरु होवून वर्ष होण्याच्या आसपास दिलीपजी/पौर्णिमाताई यांच्यासह एक “निसर्गायण-२ “ हे छोटेखानी शिबीर घेतले.त्यात “प्रणाली सिद्धांत” आणि “आंतरराष्ट्रीय स्तरावर यासारखे जीवन जगणारे लोक “ यासंबंधी माहिती दिलीपजींनी सांगितली.त्याचबरोबर एक गप्पांचाही कार्यक्रम झाला.यामुळे अजून सदस्यांचा निसर्गायण या विचाराशी परिचय झाला.
दरम्यान आमच्या प्रयत्नांची दाखल घेत एका सामाजिक संस्थेने(शिवाजीनगर नागरिक मंडळ) त्यांची जागा आम्हाला बैठक आणि इतर कार्यक्रमांसाठी दिली.आमची बैठक सहसा तेथेच होते.
मध्यंतरी काही बैठकी, रोजच्या जीवनात आपण ज्या वस्तू वापरतो त्याचा सखोल विचार करून , त्याचे पर्यावरण-पूरक पर्याय चर्चिले(पहा–आत्म-परीक्षण तक्ता-स्त्रोत दि.कु.). त्याचे स्त्रोत कुठे आहेत आणि त्या वस्तू कुठे मिळतील ,याचेही एक दस्तावैज सुरु केले.पुष्कळ पर्यायी वस्तू काही सदस्य घरी बनवितात,(जसे कि मंजन,उटणे,शाम्पू,भांडे घासण्याची पावडर,फरश्या पुसण्यासाठी गोमुत्र इत्यादी)त्या वस्तू घरी कश्या बनविल्या जावू शकतात ,ती माहिती मिळाली. केवळ शुद्ध आहारच नाही, तर शुद्ध पद्धतीने अन्न कसे तयार करावे(माती/पितळेची भांडी) यावरही चर्चा झाली.
काही बैठकीनंतर असे वाटायला लागले कि निसर्गायण या विचारावर अजून सखोल चिंतन आवश्यक आहे.त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून “निसर्गायण” पुस्तकाचे वाचन व त्यावर चर्चा असे सुरु केलेय.त्याचबरोबर पौर्णिमा ताईचे “देणे निसर्गाचे...” हे पुस्तक वाचन(ऋतूमासा प्रमाणे) व चर्चा हे हि सुरुवातीपासूनच चालू आहे . याचबरोबर समयोचित विषय , कधी तज्ञांबरोबर चर्चा हे हि चालू असतेच.
निसर्गायण मंडळाची वाटचाल संघर्षात्मक किंवा आंदोलनात्मक न व्हावी याची काळजी आम्ही नेहेमी घेत आलोय.हि मासिक बैठक हि एक उर्जास्त्रोत,विचारांना चालना देणारी ,कृतीसाठी माहिती व आचरण करणाऱ्या व्यक्तीकडून प्रेरणा देणारी या स्वरुपापुरतीच आहे. पण कुणाही सदस्यांना कुठलीही योजना स्वयम्प्रेरणेने राबवायची असेल तर तो ती करू शकण्याचे स्वातंत्र्यही आहे.जसे , समजा कुणाला आपल्या वस्तीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावयाचा असेल तर त्याला निसर्गायणच्या इतर सदस्यांना येणे बंधनकारक नाही, पण कुणी जर वेळ काढून गेला तर त्याचे स्वागतच आहे.
थोडक्यात निसर्गायण मंडळ-नागपूर, बद्दल सांगावयाचे म्हणजे :
1. हा निसर्गस्नेही जीवन जगू इच्छिणारा व पर्यावरण स्नेही समग्र विकास प्रतीमानाला मानणा-या समविचारी व्यक्तींचा एक स्वयं साह्यता गट आहे.
2. पर्यावरणावर विचार आणि चिंतन करून, स्वतः मध्ये आणि कुटुंबामध्ये काही जाणीवपूर्वक बदल घडविणे त्यादृष्टीने आहार / विहार घडणे हा उद्देश आहे.
3. कार्यक्रमाचे स्वरूप रचनात्मक असून मासिक बैठकीतून सातत्याने विचार प्रबोधन व आचरणाकरिता प्रेरणा हे स्वरूप आहे.काही वार्षिक विशेष कार्यक्रमांची पेरणी उत्साह्वर्धनासाठी करण्याची योजना आहे.
4. काही पूरक कृती उपक्रम राबविण्याचा मुळ उद्देश विचारांना बळकटी देण्याचाच आहे, त्याला एक संस्थात्मक स्वरूप न येता तो एक छोट्या स्वरूपात अनौपचारिक राहावा, हि अपेक्षा आहे.
5. अश्याच प्रकारचे अनेक मंडळे वस्ती वस्तीत निर्माण व्हावीत आणि त्यांनी विकेंद्रित पद्धतीने प्रबोधनाचे काम करून हि चळवळ अशीच चालू ठेवावी हि दृष्टी आहे,आग्रह नाही.
एकंदरीत “निसर्गायण” या दिशेला समजणारे व पर्यावरणाचा समग्र विचार करणारे सुजाण नागरिक तयार व्हावेत, मग त्यांचे कार्यक्षेत्र स्वतःपासून सुरुवात होऊन कुटुंब , समाज आणि त्याहून व्यापक प्रणाली यात कुठपर्यंत विस्तारेल, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय राहील. पण कमीत कमी स्वतःमध्ये त्याने वर्तन परिवर्तन आणावे हि अपेक्षा आहे. सुरुवातीला एक छोटा प्रयत्न म्हणून चालू केलेला हा प्रवास केवळ विचारांच्या शुद्धतेमुळे आणि मुलभूत चिंतन स्वरुपामुळेच एवढा दीर्घ चालू शकलाय-शकतोय असे वाटते.
सांगण्यासारखे पुष्कळ काही आहे, पण या लेखाद्वारे नागपूरच्या कार्याचा थोडा परिचय सगळ्या ग.स. वाचकांना व्हावा हा उद्देश.यातील पुष्कळ विषयांचा विस्तार होऊ शकतो,तो पुन्हा काही लेखात करण्याचा प्रयत्न करू.
- हेमंत मोहरीर , नागपूर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अगदी बरोबर दा.. मंजु ताईं मुळे मी या गटाशी जोडल्या गेले. त्यामुळे त्यांचे आभार आणि मंजु ताईंची भेट
मायबोलीवर झाली त्यामुळे मायबोलीचे त्रीवार आभार... Happy

+++ हि मासिक बैठक हि एक उर्जास्त्रोत,विचारांना चालना देणारी ,कृतीसाठी माहिती व आचरण करणाऱ्या व्यक्तीकडून प्रेरणा देणारी या स्वरुपापुरतीच आहे.+++ श्री हेंमत मोहरीर जे सांगतायत ते १००% खर आहे
आणि हे मी स्वता अनुभवते आहे...

छानच उपक्रम आहे हा! अगदी स्थापनेपासून ह्या उपक्रमाशी जोडलेली आहे ह्याचा खूप आनंद आहे. सायली, तू हे इथे शेअर केलंस त्याबद्दल तुला शाबासकी Happy