आधी थोडी गर्दी जमते, गर्दीचा मग जमाव होतो

Submitted by करकोचा on 1 August, 2014 - 08:12

आधी थोडी गर्दी जमते, गर्दीचा मग जमाव होतो
दंगे-धोपे होता होता एके दिवशी उठाव होतो

नारेबाजी, राडेबाजी, मारामार्‍या, अंदाधुंदी
जिथे पहावे तिथे क्रांतिचा अखेर हा स्थायिभाव होतो

लढो महात्मे शस्त्रावाचुन, लढो शस्त्रपुत क्रांतीकारी
लढ्यात दोन्ही सामान्यांचा अटळपणे रक्तस्राव होतो

आयोगांवर आयोगांचा रतीब शासन घालत बसते
सभात्याग अन्‌ घोषणांत मग दुर्लक्षाचा ठराव होतो

रोज बातम्या पाहत पाहत हळवेपणही लयास जाते
खून, दरोडे, बळजबरीचाही डोळ्यांना सराव होतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नारेबाजी, राडेबाजी, मारामार्‍या, अंदाधुंदी
जिथे पहावे तिथे क्रांतिचा अखेर हा स्थायिभाव होतो

वा. शेवटचा शेरही छान.
गझल विधानांची साखळी होऊ नये असे वाटले.

लढो महात्मे शस्त्रावाचुन, लढो शस्त्रपुत क्रांतीकारी
लढ्यात दोन्ही सामान्यांचा अटळपणे रक्तस्राव होतो

रोज बातम्या पाहत पाहत हळवेपणही लयास जाते
खून, दरोडे, बळजबरीचाही डोळ्यांना सराव होतो >>> विशेष आवडले.