१.. २.. ३.. ढिशक्यॅंऽऽव

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 July, 2014 - 04:46

१.. २.. ३.. ढिशक्यॅंऽऽव

वेळ प्रात:कालची होती का सुर्यास्तानंतरची काही ऊमजत नव्हते. ना काळोखी रात्र होती, ना लख्ख सुर्यप्रकाश. ना पिठूर चांदण्यांचे कवडसे! दूरवर नजर जाता काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते. जाणवत होती ती फक्त स्तंब्ध शांतता आणि नकोसा वाटणारा एकांत. दिसत होते केवळ स्वताचेच प्रतिबिंब. समोर हेलकावणार्‍या पाण्यात. अर्धवट झोपेच्या ग्लानीत. तो एक विशाल जलाशय होता इतकेच काय ते जाणवत होते. आणि मी त्याच्या मधोमध!

एकाएक तरंग उठू लागले. पाण्याच्या पृष्ठभागावरची कंपने मी झोपलेल्या प्रतलातही जाणवू लागली. अचानक अनपेक्षित हे घडल्याने अंगाचा उडालेला थरकाप, पाण्यामध्ये आलेल्या भूकंपाच्या लहरींशी स्पर्धा करू लागला. सोबतीला होती ती आपल्याला पोहता येत नसल्याची जाणीव आणि हि फक्त सुरूवात आहे याची ‘नसलेली’ कल्पना!

पडल्या जागेवरून मी कानोसा घ्यायचा प्रयत्न करू लागलो. मी कुठे आहे याचे हळूहळू आकलन होत होते. हो सागरच, अथांग सागर आणि मी एका गोलाकार पसरट नौकेत. नजरेच्या एका टप्प्यापलीकडे पुर्ण अंधार. मात्र जिथे मी होतो तिथे जणू कोणी पांढर्‍या प्रकाशाचा कवडसा टाकला होता. आणि या एवढ्याच भागात नेमकी खळबळ उडाली होती. उडवली होती. हिंस्त्र जलचरांनी!

नौका गोलाकार का होती? याचा अर्थ आता उलगडत होता. जाणूनबुझून! मला मृत्युच्या तोंडी देण्याचा हा डाव होता. नेमका कोणाचा? याचा मात्र पत्ता नव्हता. चारही बाजूंनी, नव्हे, दहाही दिशांनी जेव्हा ते हिंस्त्र जलचर नौकेवर झेपावू लागले, तेव्हा तिच्याबरोबर माझे मनही अस्थिर होऊ लागले. ना पुढे येउन त्यांचा सामना करू शकत होतो, ना मागे पाऊल टाकत हटण्याचा मार्ग होता. कारण मागील बाजूनेही तेच होते. मला आपल्यासोबत पाण्यात खेचून नेण्यासाठी त्यांची आपापसात लागलेली चढाओढ, मदतीसाठी फक्त देवाचाच धावा काय तो करू शकत होतो. त्या व्यतिरीक्त दूर अंधार्‍या, अन किती लांबवर आहे हे हि ठाऊक नसलेल्या किनार्‍याहून मला कसलीही कुमक मिळणार नव्हती याची जणू खात्री होती. सभोवताली पसरलेल्या अंधाराच्या साम्राज्यातून कोणी आलेच असते तर ते आणखी एखादे संकटच!

भय एका मर्यादेपलीकडे गेले की ते संपते. तिथून उरते ती फक्त परीणामांची प्रतीक्षा. माझ्यावर हि वेळ इतक्या लवकर येईल याची कल्पना नव्हती. ना, मी भयभीत होत होतो, ना ते जलचर माझ्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरत होते. जणू एखाद्या अद्रुश्य लक्ष्मणरेषेने त्यांना एका मर्यादेपर्यंत अडकावले होते. कुठेतरी ते थकतील आणि मागे सरकतील हा विश्वास होता. जो काही काळाच्या प्रतीक्षेनंतर डळमळीत होऊ लागला. डोळ्यासमोर दिसणारे चित्र ना बदलत होते, ना काळ पुढे सरकतोय असे भासत होते. सरतेशेवटी स्वताहून त्यांच्या समोर उडी घ्यावी आणि हा खेळ एकदाचा संपवून टाकावा या विचाराने झेप घेण्यासाठी म्हणून मी दोन पावले मागे सरसावतो न सरसावतो तोच पाठीमागून अकस्मातपणे ...
.
.

स्वप्न होते ते. माझे डोळे उघडले ते कोवळ्या सुर्यकिरणांत. ती काळरात्र संपली होती आणि वर निळे मोकळे आकाश दिसत होते. दूरवर नजर जात होती. कित्येक काळाने पहिल्यांदाच बघत असल्यासारखे मी ते सारे नजरेत सामावून घेत होतो. आता मी कोणत्याही नौकेवर नसून एक पांढरी चादर अंथरलेल्या पलंगावर होतो. पण अंग मात्र पाण्यावर तरंगल्यासारखेच हलके लागत होते. जणू ती शैय्या एखाद्या नौकेसारखी पाण्यावर तरंगत असावी. हा विचार मनात येताच डोळे पुर्ण उघडत सभोवताली नजर फिरवली आणि खरेच..

माझा पलंग खरेच पाण्यावर तरंगत होता. पण ते कोणतेही जलाशय नसून एक फार मोठा, गलिच्छ पाण्याचा नाला होता ज्याचा किनारा फार दूर नव्हता. थोडीफार लोकांची वर्दळ होती मात्र त्यातील कोणाचेही माझ्याकडे लक्ष नव्हते. जो तो आपल्या कामात व्यस्त. मी काल रात्री माझ्या घरी माझ्या पलंगावर झोपलेलो असताना सकाळी इथे कशी काय जाग आली याचा विचार करण्यात मला रस नव्हता. पहिली गरज होती ते इथून सुटकेचा मार्ग शोधण्याची. पट्टीच्या पोहणार्‍यालाही त्या दलदलसद्रुष्य नाल्यातून वाट कापत बाहेर निघणे अशक्य होते. काळ्यापाण्याची शिक्षाच जणू!

किनार्‍यावरील लोकांना मदतीसाठी हाक मारावी या हेतूने मी ओरडायचा प्रयत्न केला. पण हा माझ्यासाठी एक धक्काच होता. माझ्या कंठातून मोठ्याने, तिथवर पोहोचेल असा आवाज फुटत नव्हता. किंबहुना माझे बोलणे केवळ मलाच ऐकू यावे इतपतच तो होता. आता मी घाबरून ताडकन उभा राहिलो. पण माझ्या असे उभे राहण्याने तो पलंग डचमळू लागला. नव्हे एका बाजूने कलून त्या गटारगंगेत डुबक्या घेऊ लागला. आता मात्र मी घाबरलो आणि विरुद्ध दिशेने सरकू लागलो. जेणे करून संतुलन साधले जाईल. पण मी ज्या दिशेला सरकत होतो त्या त्या दिशेने पलंग आणखी आत खचत होता. मला संतुलन राखणे कमालीचे अवघड बनत चालले होते. आता काही क्षणांचाच खेळ आणि आपली दलदल समाधी निश्चित हे मी समजून चुकलो. यापेक्षा काल रात्रीचे हिंस्त्र जनावरांचे स्वप्नच चांगले होते. पण आता हे माझ्या हातात नव्हते. या अस्थिर अवस्थेने माझा तोल जाऊन मी खाली पडलो आणि वेगाने त्या कललेल्या पलंगावरून उतरणीच्या दिशेने घसरू लागलो. पुढचा कित्येक वेळ मी घसरतच होतो, पण जेव्हा अंतिम क्षणी चिखलात गटांगळ्या खायला म्हणून शिरलो नेमके तेव्हाच मला पुन्हा एकदा जाग आली. अखेरीस मी स्वताला माझ्या घरच्या पलंगावर सुरक्षित पाहिले. दु:स्वप्न संपले होते... कदाचित!

समोर ओळखीची भिंत दिसली. दूरदर्शन संच आणि आजोबांची तस्वीर. मला स्वप्नात स्वप्न पडले होते, की एकामागोमाग दोन स्वप्ने पडली होती, ज्यात दुसर्‍या स्वप्नात मला पहिले स्वप्न आठवत होते. पलंगावर निपचित पडून मी हा गुंता सोडवू लागलो. काहीका असेना आपण त्यातून बाहेर पडलो आहोत हे समाधान होते. पण तेवढ्यात पाठीमागे कोणाची तरी चाहूल लागली..

पटकन मागे वळायची इच्छा होती पण पाय कुठल्याश्या भितीने गारठल्यासारखे झाले होते. इतक्यात मला आठवले की मी चुकीच्या कुशीत झोपलो होतो. नेहमी मी खिडकीकडे तोंड करत उजव्या कुशीत झोपतो कारण खिडकीतून कोणीतरी येईल हि भिती पाठीशी घेऊन मला झोप येत नाही, पण आता जाग आली होती ती डाव्या कुशीत. मी त्वरेने उजव्या कुशीत फिरलो आणि तेथील द्रुष्य पाहून छातीत कळ जायची तेवढे शिल्लक होते.

रोजच झोपताना खिडकीतून दूरवर दिसणारी, बंद पडलेली पावाची बेकरी. तिच्या कट्ट्यावर बसणारी ती भिकारी स्त्री. कधीतरी एखाद्या रात्री माझ्या खिडकीत येऊन पाव मागेल हि भिती मला नेहमी छळायची. कित्येकदा या भितीने मी ऐन गरमीच्या मोसमात खिडकी बंद करून झोपलोय. पण आज कसे काय माझी कूस वळली आणि तिने नेमका डाव साधला. ती माझ्या खिडकीवर आतल्या दिशेने पाय पसरवून बसली होती. जणू कब्जा करायच्या हेतूनेच ती आज आली होती. पिंजारलेल्या केसांमधून डोकावणारा तिचा तो भेसूर चेहरा. रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांच्या उजेडात जसा दिसायचा त्यापेक्षा कैक भयानक आज चार फूटांच्या अंतरावरून भासत होता. पण, पण एक मिनिट ...

तिची ती नेहमीची पांढरी लक्तरे झालेली साडी, ती आज कुठे दिसत नव्हती. या बाईची हिरवी साडी होती, आणि लाल ठसठशीत कुंकवाचा गोल. मग हि ती नव्हती का.. मी तिच्या बाजूनेच दूर बेकरीकडे पाहिले तर ती नेहमीची भिकारी बाई तिथेच उभी होती. नेहमीपेक्षा भेसूर दिसत. कारण आज ती चक्क हसत होती. कश्यावर. माझ्या या अवस्थेवर. तिचे ते हसणे माझा आणखी थरकाप उडवत होते!

माझे दुर्दैव म्हणजे मला पुर्ण खात्री होती की हे स्वप्न नव्हते. कसे शक्य होते. आताच तर मी एका स्वप्नातून जागा झाला होतो. आता मी माझ्या घरात होतो. ती माझ्या समोर होती. स्वप्नच असते तर आणखी आणखी वाईट होत एकदाचे संपले तरी असते. पण हे स्वप्न नव्हते. हे संपणारे नव्हते. मला संपवणारे होते.

आता मला फक्त लढायचे होते. सारी ताकद एकवटवून उठायचे होते. आणि मी तेच केले. तिच्याकडे न पाहताच उठून दरवाज्याकडे धाव घेतली. बेडरूमचा दरवाजा पार करून मी आता दिवाणखान्यात आलो होतो. पाठीमागे वळून न पाहता. स्वताच्या सावलीवरही आता भरवसा राहिला नव्हता. आणि इतक्यात जोराची बेल खणखणली. खणखणतच होती. जणू मोठ्याने अलार्म वाजल्यासारखा. अलार्मच तर वाजत होता. पुन्हा एकदा माझे डोळे उघडले. त्याच बिछान्यावर. शेजारचा अलार्म बंद करूनही रिंग वाजायची काही बंद होत नव्हती. डोळ्यावरची झापड काही जात नव्हती. अलार्म केव्हाचाच थांबला होता. आता मात्र हि दरवाज्याचीच बेल खणखणत होती. आज पहाटे आईबाबा गावावरून येणार होते. त्यासाठीच तर अलार्म लावला होता. त्यांना आणायला स्टेशनवर जायचे होते. कदाचित ट्रेन लवकर आली असावी. मी दरवाजा उघडायला पुन्हा बाहेरच्या खोलीत गेलो. जाताना खिडकीवर घाबरतच एक नजर टाकायला विसरलो नाही. तिथे अपेक्षेप्रमाणे कोणीही बसलेले नव्हते. बेकरीजवळही कोणी नव्हते. खिडकीपलीकडे अजूनही अंधारच होता. फारसे उजाडलेले नसावे. ट्रेन फारच लवकर आली असावी. या विचारांतच मी दरवाजा उघडला तर तिथे आईबाबा नव्हतेच. पाववाला होता. मी दोन कडक पाव घेत पैसे आणायला आत गेलो. इतक्यात काहीतरी आठवले, रोजा चालू असल्याने महिनाभर पाववाला येत नव्हता, हा चेहरा देखील नेहमीचा नव्हता. संशयास्पद वाटल्याने चौकशी करायला म्हणून मी पुन्हा मागे वळलो ते थेट समोरून ...

एक गंजलेला सुरा मोठ्या कष्टाने माझ्या छातीच्या पार झाला होता. एक जीवघेणी कळ आणि पुढच्याच क्षणाला मी रक्ताच्या थारोळ्यात कोसळलो. हळूहळू लाल रंग चोहोबाजूने पसरत होता. बघता बघता माझ्या द्रुष्टीपटलावरही तोच भरून गेला. त्याव्यतिरीक्त ना आणखी काही दिसत होते ना जाणवत होते. नजरेसमोरचा लाल रंग गडद होत काळा पडू लागला. आता मी सारे विचार थांबवून शांत झालो. यातून सुटका नाही हे उमजून निपचित पडून राहिलो. ना कसली जाणीव ना कसली संवेदना, ना कसले भय ना उलटून प्रतिकार. हे स्वप्न कधी संपतेय याची वाट पाहणे, बस्स एवढेच आता माझ्या हातात होते ..

(सत्यस्वप्नावर आधारीत)

- रिशी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मरण्यापूर्वी शेवटच्या रात्री आपल्याला एक स्वप्न पडते आणि ते स्वप्न आपल्या मरण्यानेच संपते अशी या कथेमागची कल्पना होती Happy
फक्त हे स्वप्न पडलेला माणूस त्यानंतर मरतच असल्याने आपल्याला हे स्वप्न तो कधी सांगू शकत नाही.

बाकी धागा खूपच जुना आहे. मायबोलीवर माझ्या पदार्पण झाल्यवर पहिल्याच महिन्यातील.. आज कुठे सापडला अचानक हा तुम्हाला Happy

जबरी लिहिलंय. खरंच आश्चर्य वाटतंय. ऋन्मेष यांचे आजकालचे लिखाण वाचून विश्वास बसत नाहीए, की हेसुद्धा त्यांनीच लिहिले असावे. मस्त!!!

ओह माय गॉड
कधीच्या लेखाला प्रतिसद आले
आणि ते पण चांगले Happy

अरे काय हे. मजाम मजाक मध्ये खरेच चांगले प्रतिसाद आलेत. धन्यवाद लोकहो. हे प्रोत्साहन पाहता अजून काहीतरी लिखाण करता येईल का आता विचार करायला हवा.

चांगली जमलीय Happy फक्त ढिश्क्यांव का नाव ठेवले कळले नाही. सुर्‍याच्याऐवजी गन असणार होती का आधी ?

फक्त ढिश्क्यांव का नाव ठेवले कळले नाही
>>>
हे मलाही कळले नाहीये Proud
गेले चार दिवस हा धागा वर आल्यापासून मी हाच विचार करतोय मी तेव्हा हे नाव का ठेवले असावे. . . कदाचित 1 2 3 ढिशक्यांव म्हणजे खेळ खल्लास !