महिला दिन सामाजिक उपक्रम २०१४ आढावा

Submitted by कविन on 22 July, 2014 - 07:21

महिला दिन सामाजिक उपक्रम २०१४ आढावा

नेहमीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोलीवर आवाहन व घोषणा केली. या आवाहनातून वाचकांना त्यांच्या माहितीत असलेल्या, चांगले काम करणार्‍या गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे ते कळविण्यास सांगितले. थोड्याच दिवसांत आपल्याकडे सात सेवाभावी संस्थांची माहिती व त्यांची निकड काय आहे याची एक मोठी यादीच जमा झाली. त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोलीवर एक जाहीर आवाहन केले.

यंदाच्या कार्यपद्धतीत एक महत्त्वाचा फरक केला. तो म्हणजे देणगीदाराने त्याची देणगी ही थेट त्या संस्थेकडे जमा करायची! संबंधित संस्था त्या देणगीदारास त्यानुसार पावती देणार आणि त्याने दिलेल्या देणगीतून ती ती संस्था त्यांच्या गरजेच्या ज्या वस्तू घेणार आहे किंवा ज्या कामासाठी ती देणगी घेतली आहे त्याची पूर्तता झाली आहे किंवा नाही याबद्दल आपल्याला माहिती देणार असे ठरले.

याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी देऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले. त्यामुळे त्या संस्थेकडून देणगीची पावती घेणे, ती देणगीदारांस सुपूर्द करणे व ज्या कामासाठी किंवा वस्तूसाठी देणगी दिली आहे त्या कामाची / वस्तू खरेदीच्या प्रगतीची संस्थेकडून माहिती घेणे यासंदर्भात आम्ही थोडीफार मदत करू शकलो.

सांगावयास आनंद वाटतो की या उपक्रमाची माहिती वाचून मायबोलीचे सभासद नसलेल्या, किंवा मायबोलीवर केवळ वाचनमात्र येणार्‍या काहीजणांनीही मदतीचा हात पुढे केला.

संस्थांची नावे व त्यांना मिळालेल्या देणगीतून त्यांनी केलेली कामे / घेतलेल्या वस्तूंची यादी देत आहोत :

१. अस्तित्त्व प्रतिष्ठान, पुणे : संस्थेला ठिबक सिंचन योजनेसाठी निधीची गरज होती. छत्तीस हजार रुपयांच्या देणगीची रक्कम त्यांनी या कामासाठी वापरली. सदर ठिबक सिंचन योजना सासवड़पासून वीस किमी अंतरावर वीर या गावी राबवण्यात आली आहे. एकंदरीत क्षेत्रफ़ळ दीड एकर आहे. या योजनेसाठी एकंदरीत ४८,०००/- (रूपये अठ्ठेचाळीस हजार ) इतका खर्च आला. त्यापैकी मायबोली देणगीदारांकडुन रु.३६,०००/- (रूपये छत्तीस हजार) इतकी मदत झाली. उरलेले बारा हजार त्यांनी स्वतःचे घातले आहेत. ही रक्कम पूर्णपणे ठिबक सिंचनसाठी वापरली गेली आहे. टाकीचा खर्च वेगळा आहे. तो रु.९०,०००/- (रुपये नव्वद हजार ) इतका आला. हा खर्च इतर देणगीदारांकडून मिळाला. ही ठिबक सिंचन योजना फ़ळबाग़ प्रकल्पासाठी वापरली जाईल. संस्थेने त्या जमीनीवर काही फळझाडे, उदा. डाळिंब वगैरे यांची लागवड केली आहे. या प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न संस्थेसाठी वापरले जाईल. संस्थेचा भर आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर आहे. हा प्रकल्प त्या आर्थिक स्वयंपूर्णतेचा एक भाग आहे. या प्रकल्पाद्वारे दोनेक वर्षात उत्पन्न मिळण्याची संस्थेला आशा आहे

२. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळेतील मुलामुलींना सरावासाठी सायकली हव्या होत्या. तसेच ग्रामीण भागातील परिस्थितीने गरीब व गरोदर स्त्रियांना आयर्न व कॅल्शियम गोळ्यांचा नऊ महिन्यांचा पुरवठा करता यावा यासाठी निधी हवा होता. मिळालेल्या देणगीतून सरावासाठी सायकल व गरोदर स्त्रियांना ह्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. देणगीची एकूण रक्कम रु.२२,५००/- (रुपये बावीस हजार पाचशे) होती. त्यातून गरजू शाळांना २ सायकली व गरजू गरीब परिस्थितीतील ८ गरोदर मातांना आहारपूरके देण्यात आली. (६ मातांना दिली आहेत. उर्वरीत २ मातांनाही लवकरच देण्यात येतील.)

३. मैत्री संस्था, पुणे : मैत्री संस्थेला मेळघाट येथील ग्रामीण, आदिवासी भागातील शाळांमधील मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोग साहित्याचा संच व तो ठेवण्यासाठी भक्कम पेटी यासाठी निधीची गरज होती. त्याप्रमाणे त्यांना रु.२०,०००/- (रुपये वीस हजार)या देणगी मिळाल्यावर आता दिवाळीनंतर ते साहित्य खरेदी करणार आहेत व त्यानुसार आपल्याला अपडेट्स देतील असेही त्यांनी सांगितले आहे. (मेळघाटात पावसाळ्यात ते साहित्य व्यवस्थित, खराब न होता राहील याची खात्री न वाटल्यामुळे पावसाळ्यानंतरच ते साहित्य खरेदी करू असे संस्थेचे म्हणणे पडले.)

४. निवासी अपंग कल्याण केंद्र, सटाणा, जि. नाशिक : ग्रामीण भागातील विकलांग व गरीब मुलांना शिक्षण, फिजियोथेरपीसारखे उपचार आणि वैद्यकीय मदत देणार्‍या या संस्थेला मिळालेल्या रु.१६,०००/- (रुपये सोळा हजार)या देणगीतून त्यांनी ८० मुलांसाठी दप्तरे खरेदी केल्याचे कळविले आहे. तसेच एक "कॅलिपर्स सेट" विकत घेतला आहे.

५. सावली सेवा ट्रस्ट, पुणे : सावली संस्थेच्या बुधवार पेठ रेड लाईट एरियामधील गरजू मुलांची शाळा - कॉलेज व वेगवेगळ्या क्लासेसची फी भरण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता असल्याचे संस्थेने कळविले होते. तसेच मुलांचे गणवेश, चपला-बूट इत्यादी खरेदी करण्यासाठीही त्यांना निधीची गरज होती. मिळालेल्या रु.८५,०००/- (रुपये पंच्याएंशी हजार)या देणगीतून त्यांनी मुलांच्या शाळा-कॉलेज-क्लासेस चे शुल्क भरणे व गणवेश - दप्तरे - चपला - बूट यांची खरेदी केली आहे व तशा पावत्याही सादर केल्या आहेत.

६. शबरी सेवा समिती, ता. कर्जत : संस्थेने जव्हार व कर्जत येथील भागातील ग्रामीण शाळांमध्ये विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी प्रयोग साहित्य हवे आहे व ते खरेदी करण्यास निधी आवश्यक आहे म्हणून कळवले होते. त्यानुसार मिळालेल्या रु.२६,०००/- (रुपये सव्वीस हजार) या देणगीतून त्यांनी सभोवतालच्या परिसरातील शाळांमध्ये दाखवण्यासाठी प्रयोग साहित्य खरेदी केले आहे. त्यांची एकूण खरेदी रुपये एकोणतीस हजार तीनशे पंच्याऐंशी या रकमेची झाली व उर्वरित पैसे संस्थेने स्वतःचे घातले.

७. सुमति बालवन, पुणे : संस्थेने त्यांना मिळालेल्या र.२०,०००/- (रुपये वीस हजार) या देणगीतून बांधकामासाठी साहित्य विकत घेतले आहे. संस्थेला नुकतीच वाचनालय व प्रयोगशाळा बांधण्याची परवानगी मिळाली व त्या बांधकामासाठी त्यांना निधीची आवश्यकता होती.

याखेरीज काही देणगीदारांनी स्नेहालय, जि. अहमदनगर या संस्थेलाही रु.१०,०००/- (रुपये दहा हजार) देणगी दिली व त्यानुसार देणगीदारांना पावत्या मिळाल्याचे त्यांनी कळविले आहे.

या उपक्रमातून वेगवेगळ्या सेवाभावी सामाजिक संस्थांना एकूण रुपये रु.२,१८, ५००/- (रुपये दोन लाख अठरा हजार पाचशे मात्र)ची मदत देणगी स्वरूपातून देण्यात आली.

सर्व संस्थांनी आपल्या स्वयंसेवकांच्या नावाने आभारपत्रे दिली आहेत व ज्यांना शक्य आहे त्यांनी साहित्य खरेदीच्या पावत्या, साहित्याचे फोटोग्राफ्स, बांधकाम / प्रकल्पाचे फोटोग्राफ्स आपल्यासाठी पाठविले आहेत. ते आपल्या वाचनासाठी येथे प्रतिसादात प्रकाशित करत आहोत.

उपक्रमासाठी काम करणारे स्वयंसेवक : सुनिधी, मो, असामी, स्वाती२, जाई., कविन, अरुंधती कुलकर्णी.
विशिष्ठ संस्थांबरोबर समन्वयाचे काम करणारे मायबोलीकर : हर्पेन, साजिरा, नीधप

या सर्व उपक्रमामध्ये प्रत्येक पावलाला मायबोलीकरांनी खूपच मोलाचे सहकार्य केले. मायबोली प्रशासनाने मायबोलीचे माध्यम वापरण्याची परवानगी दिली व आमच्या सर्व शंका - प्रश्नांची न कंटाळता उत्तरे दिली यासाठी त्यांचे खास खास आभार. सोशल नेटवर्किंगमधून काही उत्तम, विधायक व समाजोपयोगी कार्य करता येणे व त्यानिमित्ताने अगोदर कधी न भेटलेल्या मायबोलीकरांनी एकत्र येऊन काम करणे हा अनुभव आम्हां सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी होता.

काही उल्लेख नजरचुकीने राहिलेले असल्यास आपण लक्षात आणून द्यालच ह्याची खात्री आहे.

सस्नेह,

सामाजिक उपक्रम २०१४ स्वयंसेवक टीम

http://www.maayboli.com/node/50026#comment-3202513 अस्तित्त्व प्रतिष्ठान, पुणे, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, मैत्री संस्था, पुणे, सुमति बालवन, पुणे

http://www.maayboli.com/node/50026#comment-3202514 शबरी सेवा समिती, ता. कर्जत, निवासी अपंग कल्याण केंद्र, सटाणा, जि. नाशिक, सावली सेवा ट्रस्ट, पुणे,

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. अस्तित्त्व प्रतिष्ठान, पुणे

2014_astitva pics collage.jpg2014_astitva thanks letter_edited.jpg
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

२. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग :

2014_bhagirath pics collage.jpg2014_bhagirath1.JPG2014_bhagirath2.JPG

-------------------------------------------------------------------------------------------------------------

३. मैत्री संस्था, पुणे :

2014_maitri letter.JPG

--------------------------------------------------------------------------------------------------------------

४. सुमति बालवन, पुणे :

2014_sumati balwan steel purchased.JPG2014_sumati balwan thanks letter.JPG

५. शबरी सेवा समिती, ता. कर्जत :

2014_Nimish Book Depot.jpg.

2014_Receipt from Balaji Printing Press.jpg2014_receipts_purchase_from Dombivli_01.jpg2014_receipts_purchase_from Dombivli_02.jpg2014_receipts_purchase_from Dombivli_03.jpg2014_shabari pics collage.jpg2014_Thanks letter from Shabari Seva Samiti_edited.JPG2014_thanks letter_page 2.jpg

----------------------------------------------------------------------------------------------------------
६. निवासी अपंग कल्याण केंद्र, सटाणा, जि. नाशिक :

2014_Satana apang 1.jpg2014_satana pics collage.jpg2014_satana receipt school bags.jpgIMG-20140728-WA0015.jpg (कॅलिपर्स सेट)

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
७. सावली सेवा ट्रस्ट, पुणे :

2014_savali receipts.jpg2014_Savali Seva Trust 1.jpg2014_savali UNIFORM RECEIPTS 2014.jpg

इतक्या विस्ताराने सारे लिहून, शिवाय संबंधित कागदपत्रांची छायाचित्रेही इथे दिल्याने, तुमची या सामाजिक कार्यामागील धडपड तर समोर आली. तसेच सारे आर्थिक व्यवहार इतक्या चोखपणे ठेवण्याची अभिनंदनीय अशी मनोवृत्तीही यातून प्रकट झाली आहे.

अशा अहवाल सादरीकरणामुळेच देणगीदारांनाही आपल्या क्षमतेनुसार देणगी देण्यास प्रोत्साहन लाभत राहील यात संदेह नाही.

सर्व संबंधित आणि मायबोली प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन.

कविन, मनापासुन धन्यवाद. मोठे काम केलेस.

सर्व देणगीदारांचे प्रचंड आभार. आपल्या सहकार्याशिवाय हा उपक्रम तडीस जाणे शक्यच नव्हते. आपला आधार नेहमीच मिळत राहील ही प्रार्थना.

मायबोली प्रशासन, दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा उपक्रम करायची संधी दिल्याबद्दल स्वयंसेवक चमुतर्फे पुन्हा एकदा धन्यवाद.

सुरेख आढावा.. उत्तरोत्तर अशीच भरघोस मदत मायबोलीचे सदस्य करतीलच ह्याची खात्री आहे..

समिती सदस्यांचे विशेष अभिनंदन..

कपड्यांच्या संदर्भातील काही मदत हवी असल्यास मला नक्की संपर्क करा..

धन्यवाद कविन! खूप मोठे काम केलेस! Happy

देणगीदारांच्या सहकार्यावाचून हे काम शक्य नव्हते. मायबोलीवर फक्त रोमात वाचनमात्र येणार्‍यांनीही संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला याचे विशेष कौतुक वाटले. Happy

सुनिधी +1

या उपक्रमात काम करण हा एक आनंददायी अनुभव होता. मायबोलीचे सदस्य असल्याचा अभिमान वाटला

अरे लाजवू नका उगाच.

या उपक्रमात काम करण हा एक आनंददायी अनुभव होता. मायबोलीचे सदस्य असल्याचा अभिमान वाटला>> +१

अकूने लिहीलाय हा आढावा . मी पोस्ट केलाय इथे फक्त.

लहान तोंडी मोठा घास होत नसेल तर ह्या कामांचे सूत्रबद्ध नियोजन ठेवण्याचे मह्त्वाचे काम अकु पार पाडते त्याबद्दल ती विशेष कौतुकाची धनी आहे.

ह्या उपक्रमाच्या संयोजकांचे, ह्याला हातभार लावणाऱ्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन! सर्व वृत्तांत वाचून खूप समाधान वाटले! मायबोलीची सभासद असल्याचा अभिमान वाटतोय!

उत्तम काम सुरेख आढावा.सुनिधी, मो, असामी, स्वाती२, जाई., कविन, अरुंधती कुलकर्णी.आणि संबंधित सर्वांचे अभिनंदन, कौतुक.स्वत:चे व्याप सांभाळत किती उत्तम आणि पारदर्शी काम करता येते याचा आदर्श घालून दिलात.अभीमान वाटतो तुम्हा सर्वांचा.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! हे काम करताना मिळणारे समाधान खूप मोठे आहे. Happy

हिम्सकूल, विपू करत आहे.

हा धागा मायबोली मुख्यपृष्ठावर झळकवल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आभार. Happy

या उपक्रमांतर्गत एकांची देणगी काही अपरिहार्य कारणांमुळे जमा होऊ शकली नव्हती. परंतु कालच त्यांनी देणगी जमा केल्याचे कळविले आहे. संबंधित संस्थांकडून कन्फर्मेशन आल्यावर इथे माहिती अपडेट करूच! Happy

सर्व संबंधितांना मोठी शाबासकी. इतक्या संस्थांशी समन्वय साधणं ही सोपी गोष्ट नाही.

धन्यवाद मायबोलीकर्स Happy

अजून दोन जणांनी देणगी दिली असल्याने तसे बाफवर अपडेट केले आहे. एका देणगीतून सटाणा अपंग संस्थेने कॅलिपर्स सेट खरेदी केलात्या,त्या,चा फोटो देखील संबंधीत संस्थेच्या इतर फोटोंसोबत दिला आहे.

धन्यवाद पुन्हा एकदा
-- उपक्रम टिम

एका देणगीतून सटाणा अपंग संस्थेने कॅलिपर्स सेट खरेदी केलात्या,त्या,चा फोटो देखील संबंधीत संस्थेच्या इतर फोटोंसोबत दिला आहे.>>> तो फोटो बघून काय वाटलं ते शब्दांत सांगता येणार नाही.

>>एका देणगीतून सटाणा अपंग संस्थेने कॅलिपर्स सेट खरेदी केलात्या,त्या,चा फोटो देखील संबंधीत संस्थेच्या इतर फोटोंसोबत दिला आहे.>>> तो फोटो बघून काय वाटलं ते शब्दांत सांगता येणार नाही.
+१

थँक्स गं कविन अपडेटबद्दल! स्मित
केश्विनी, अगदी तशीच अवस्था तो फोटो पाहिल्यावर झाली.... >> +१

खरंच ह्या उपक्रमात दर वर्षी सहभागी होणे हा स्वतःसाठीच खूप शिकवून जाणारा अनुभव असतो. ह्या वर्षी मायबोलीकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि ७ संस्थांना यथायोग्य देणगी देऊ शकू एवढी रक्कम जमू शकली. काही मायबोलीकर दरवर्षी न चुकता ह्या उपक्रमाला देणगीद्वारे हातभार लावतात ह्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोतच, परंतू गेल्या काही वर्षांपेक्षा ह्या वर्षी नवीन देणगीदारांची संख्याही जास्त होती ह्याचा आम्हा सर्व स्वयंसेवकांना खूप आनंद आहे. शेवटी ह्या उपक्रमाचे यश हे किती जण पुढे येऊन देणगी देतात ह्यावर अवलंबून असते. त्यामुळे सर्व देणगीदारांचे पुनश्च आभार.

अजूनही वरील संस्थांना मदत करायची असल्यास तुम्ही कोणत्याही स्वयंसेवकाशी संपर्क साधू शकता.