अमरनाथ यात्रा - माझा अनुभव

Submitted by भागवत on 18 July, 2014 - 04:27

लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्याल अशी आशा आहे.

वर्षे २०११ पासून घरी चर्चा चालू होती की सगळे मिळून वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा करुया. पण मुहूर्त लागत नव्हता. मार्च २०१४ मध्ये अमरनाथ यात्रे बद्दल आणि टूर ऑपरेटर ची सर्व माहिती काढली आणि प्रवासाचे नक्की केले. टूर ऑपरेटर ने सांगितले की मेडीकल चेकअप करून अमरनाथ रजिस्ट्रेशन फाॅर्म भरून आणा. मी माझ्या फॅमिली ची सगळी माहिती भरून फाॅर्म दिले. पहलगाम मार्गे जाण्याचे नक्की झाले.
यात्रेला २ मार्ग आहेत. १. बालताल - १४ किलोमीटर, २.पहलगाम - ३२ किलोमीटर.
पहलगाम/बालताल मार्गे अमरनाथ जाणाया साठी ४ पर्याय उपलब्ध आहेत.
१.चालत, २.घोडा, ३.हेलिकॉप्टर, ४.पालखी.

हेलिकॉप्टर बुकींग १ माॅर्चला सुरु झाले आणि २ दिवसात बुकिंग फुल झाले. मग मित्रांनी सागितले की हेलिकॉप्टर बुकिंग पहलगामला पोहोचल्या नंतर सुद्धा करता येते. आम्ही २९ जूनला श्रीनगरला पोहाचलो. अमरनाथ बोर्डाने पहलगाम मार्ग बर्फ साचल्यामुळे २ जुलै पर्यंत बंद केला होता. विचारपूस केल्यानंतर कळले की हेलिकॉप्टर बुकिंग फुल आहे आणि ब्लँक मध्ये ४५०० चा पास ८५०० ला भेटतो. बालताल मार्गे पंचतरणी हेलीपँड गुहे पासून ६ किलोमीटर दूर आहे. परत त्या ६ किलोमीटरसाठी घोड्यावर/चालत जावे लागले असते. त्यामुळे मग वडिलांनी ठरवले की सगळ्यांनी घोडी करून प्रवास करायचा.

पहलगाम मार्ग खूप बर्फ साचल्या मुळे बंद होता. त्यामुळे टूर ऑपरेटर ने आम्हाला सोनमर्ग मार्गे बालताल बेस कॅम्प ला ३० जून ला पोहचवले. बेसकॅम्पला परत चेकिंग झाली. आमचे २ दिवसांनी दर्शन असल्यामुळे मला आणि वडिलांना पोलीस सोडत नव्हते. पण तिथे २-३ तास पोलिसांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला जाऊ दिले. एका बाजूला खळखळत वाहणारी नदी आणि दुसऱ्या बाजूला पर्वताची रांग. दोघांमध्ये टेन्ट चा सागर… लंगर ची खूप दूरवर रांग … आणि जागा सापडेल तिथे व्यावसायिक लोकानी नी आपला व्यवसाय थाटला होता. गेट नं. १ च्या आधी गाडीतळ होता. वातावरणात गारवा जास्त जाणवला. प्रथम टेन्ट आणि मग घोडे ठरविण्या साठी धावपळ केली. घोडा प्रत्येकी रु.२१५० ठरविला.

१ जुलैला खरा प्रवास सुरु झाला. पहाटे ३.३० ला उठलो.. आन्हिक उरकून ४.३० ला घोड्यावर बसलो. ५.०० वाजता पहिला चेकपोस्ट लागला. अमरनाथ पासेस, ओळख पत्र चेक केल्यानंतर परत घोड्यावर बसलो. मग सुरु झाली खरी मजा. मला ३ किलोमीटर पर्यन्त स्वत:ला तोल सावरता येत नव्हता. पहिले ४ किलोमीटर पर्यन्त रेलिंग आहे. जसे जसे पर्वत चढत होतो आणि दरी जशी जशी खोल होत होती तसे तसे पोटात गोळा येत होता. मी शेवटी दरी कडे पाहणेच सोडून दिले. साधारण ८-१० फुटाचा मातीचा रस्ता आहे. चालणारे भाविक डोंगराच्या बाजूने येत -जात असतात. रस्त्यामध्ये पालखी वाले ये-जा करतात. रस्ताच्या कडेला (दरी साईडने) १ फूट सोडून घोडे चालतात. घोडी चा मालक/चालक पुढे एका हातात छडी आणि दुसरा हातात घोड्याला बांधलेली दोरी हातात घेऊन जात असतात. घोड्याची विष्ठा आणि आदल्या दिवसी पाऊस पडल्या मुळे चिखल साचला होता. घोड्या च्या मालकाने सांगितले की चढाई करताना पुढे वाकायचे आणि उतरताना मागे झुकायचे. आमची ४ घोडी होती. पुढे मी, मध्ये बायको, आई, आणि मागे वडिल अशी वरात चालली होती. माझ्या घोडीचे नाव बुलबुल होते. मला घोडी उधळण्याची थोडी शंका आली की मी बुलबुलच्या कानात "आराम से चलो बुलबुल" पुटपुटत होतो. पर्वत चढताना दरी कडे पाहवत नव्हते. दरी खोल खोल होत होती. माझ्या मनात विचार आला की जर काही झाले तर आपले नख सुद्धा दिसणार नाही कुणाला. जीव मुठीत घेऊन चालणे हा वाक्प्रचार मी १४ किलोमीटर अनुभवला. खोल दरी, छोटा रस्ता, श्रद्धा, भीती, उत्सुकता, निसर्ग, हिमनदी आणि मनावर आलेले दडपण यांचे एक अजब वातावरण तयार झाले. पर्वतावर दिसणारा बर्फ ग्लेशीयँर, त्यातून येणारा पाण्याचा प्रवाह! खूपच सुंदर दृष्य होते. पण माझे दुर्भाग्य मला तोल सावरण्या मध्ये फोटो घेता आले नाहीत.

५००-५०० मीटर वर असलेले आर्मी जवान… त्याची सतत भिरभिरणारी नजर… त्यांचा नजरेत असलेली कर्तव्य निष्ठा… जीवाची पर्वा न करता तहान, भूक विसरून सेवा आणि सुरक्षा … जवान प्रवाश्यांना पाणी देत होते… . मार्ग दाखवत होते… मदत करत होते… माझा कडकडीत सॅलूट त्यांचा कार्यासाठी. मार्गा मध्ये ३ किलोमीटर पर्यंत खुप लंगर होती. यात्रेकरूना ते बिस्कीट, चहा, छोटी नाष्ट्याची पाकीटे वाटत होती. वेगवेगळ्या राज्यातून आलेले लंगर मन लावून सेवा करत होती. आम्ही २ मृतदेह खाली स्ट्रेचरवर घेऊन जाताना बघितली. माझा मनात विचार आला जर घोडा स्लिप झाला तर आपण रेलीग ला पकडून जिवंत राहू. नंतर विचार आला आपल्या फॅमिली चे काय होईल. पण अमरनाथ कृपेमुळे तशी काही परिस्थिती आली नाही.

७ किलोमीटर झाल्यानंतर पहिला टी-ब्रेक घेतला. माझ्या आईचा घोडा डोंगराचा चढ चढत नव्हता. मग मी घोड्याच्या मालकाला सांगून नवीन घोडा मागितला. त्याने पैसे देणास सांगितले पण मी त्याला ठणकाऊन सांगितले की पैसे बालताल ला टेंट मध्येच मिळतील(आधी ठरल्या प्रमाणे). मी चारही घोडी मालकाना चहा घ्याला सागितले. पण बिल २४० झाले. नंतर लक्षात आले की घोडीवाल्यानी दोन पाव वर सुद्धा डल्ला मारला होता. आई साठी घोडा बदलून घेतला. आता रस्ता सपाट होता, बुलबुल घोडी आता आरामात चालत होती. संगम ठिकाणी आम्ही ५ मिनिटे थांबलो. वर वर चढताना रस्ता कठीण आणि अरुंद होत होता. पुढे रस्त्याचे २ फाटे फुटले. रस्ता पुढे घोडी साठी वेगळा आणि पालखी व चालणाऱ्या साठी वेगळा झाला. शेवटचं १ किलोमीटर पूर्ण बर्फाचा रस्ता होता. घोडी मालकानी आम्हाला खूप अगोदर उतरायला सागितले. तेथून आम्ही चालत गेलो. आम्हाला जवळ पास ६.३० तास लागले गुहेच्या पायथाशी पोहोचण्या साठी. गुहे समोर बर्फाचा हिमनग होता. हवेत गारवा जास्त वाढला. एका बाजूला खूपच मोठी दर्शनाची रांग लागली होती. आणि मध्ये टेन्ट व लंगरने परिसर व्यापला होता.

कहाणीमे ट्विस्ट आला. हवे मध्ये प्राणवायू चे कमी प्रमाण, पायाखाली बर्फ आणि सकाळ पासून ६.३० तास प्रवास मध्ये काही न खाल्या मुळे बायकोला चक्कर आली. पाणी, बिस्किट आणि थोडा प्राणवायू घेतल्या नंतर प्रकृती सुधारली. मग रिस्क नको म्हणून आम्ही पालखी केली. परंतु ती चेकिंगला अडवन्यात आली आणि परत चालवे लागले. खूप गर्दी होती. लाईन मध्ये लागलो. पण आगीतून फुफाट्यात पडल्या सारखे झाले. लाईन मध्ये रेटारेटी, पायाखाली बर्फ, पुढून मागे ढकलणारे आणि मागून पुढे रेटणारे लोकामुळे जीव गुदमरला होता. हिमनदी वर चालत असल्यामुळे बरेचजण पाय घसरून पडले. मुलीना आणि बायकांना कमी प्राणवायू मुळे खुप त्रास सहन करावा लागला. चेगंरा-चेंगरी ची लक्षणें दिसत होती पण आर्मी जवानांनी परत लाईनला शिस्त् लावली. जवान वयोवृद्ध लोकांना गुहे पर्यंत घेऊन जात होते… मार्गदर्शन करत होते… मेडीकॅल चेकअपं ला पाठवत होते. २.५ तासात दर्शन झाले. अमरनाथ गुहा ही १२,७५६ फूट उंची वर आहे आणि दगडाची बनलेली आहे. अमरनाथ पिंडी ला १०-१२ फूटाची नेैसंर्गिक उंची, बर्फाची पिंड बघून देह भान हरपले. मंत्रमुग्ध झालो. मनाला खुप आनंद झाला. मनात विचार आला की आता आपले दर्शन झाले आहे जाताना जे होईल ते अमरनाथ पाहून घेईल. मला जाताना १४ किलोमीटर पर्यंत एक सुद्धा पक्षी दिसला नव्हता. पण मला गुहे मध्ये एक कबुतर दिसले(सहसा २ असतात). मला कळत नव्हते, कबुतर कशी राहत असतील. काय खात असतील आणि जिथे कमी प्राणवायू मुळे माणसांना त्रास होत होता. तिथे हे कबुतर एवढ्या थंड प्रदेशां मध्ये कसे काय जिवंत राहू शकतात. हा अमरनाथ चा चमत्कार की निसर्गा चा प्रताप आहे ते कळत नव्हते. लंगर मध्ये थोडा नाश्ता केला. बर्फाचा रस्ता असल्या मुळे आम्हाला खूप कसरत करावी लागत होती. जे भक्त साधी चप्पल घालून आले होते ते घसरून पडल होते. मी सुद्धा २-३ वेळेस पडता पडता वाचलो. पाऊस पडायला सुरुवात झाली. चालत चालत आम्ही घोड्या जवळ पोहचलो.

आणि परतीचा प्रवास सुरु झाला. वातावरण २ मिनिटात बदलले. काळोख पसरला. मनात भीती वाटत होती की घोडा चिखलात घसरून पडला तर आपली काही खैर नाही. चालणारे लोक घसरून पडत होती. पण तेथील स्थानिक माणसे आणि घोडी आरामात चालत होती. खरच घोड्या ला मानले पाहिजे. कितीही उतार असो वा चढ घोडा कधीच पडत नाही. घोड्या पुढे दरी असेल किंवा जागा नसेल तर घोडा तात्काळं ब्रेक मारतो. माणूस एक वेळ समजूतदारपणा सोडेल पण घोडा कधी लाईन नाही सोडणार. परतीचा प्रवास खुप्प छान झाला. वरून पाऊस..., तोच चिखलातला रस्ता… , तोच पर्वत… , तेच हिमनग… , तोच निसर्ग… , तोच घोडा… पण मनातील भीती कमी झाली होती. त्यामुळे प्रवास एन्जॉय केला. परत येतांना घोडयाच्या खुरात दगड अडकला होता. घोडेवाला दगड काढायचा प्रयन्त करत होता आणि घोडी उधळत होती. शेवटी २ मिनिटाच्या प्रयत्ना नंतर दगड निघाला आणि मी हुश्श केले. मग सभोवती निरीक्षण केले. घोडा एखाद्या आज्ञाधारक मुला सारखा लाईन मध्ये चालत होता. घोड्याची संथ लयीत चाललेली वाटचाल. घोडा पाण्याचा झरा दिसतास थांबत होता आणि पाणी स्वछ असेल तरच पाणी पीत होता. पूर्ण १४ किलोमीटर चा रस्ता आणि डोंगर ठिसूळ मातीचा होता.

प्रसन्नचित करणारा निसर्ग… भुरभूर पडणारा पाऊस…. वळणा - वळणाचा रस्ता… मध्येच हिमनदी …. मध्येच हिमनग… बर्फ विरघळून बनलेले छोटे धबधबे… पाण्याचे छोटे छोटे झरे… खळखळत वाहणारी नदी… पर्वता वर ढगाचे साम्राज्य…. मंगलमय वातावरण… शार्प वळणावर नजारा बघण्या लायक होता. झाडी जवळ पास नव्हतीच. बरेचं ठिकाणी इंडिया आर्मी CRPF बटालियन नंबर कोरून ठेवले आहे. पालखी एका ठराविक लयीत जात असल्या मुळे त्यावर बसलेल्या बऱ्याच जणांना झोप येत होती. पालखी वाहून नेणारे मात्र भिजत मार्ग काढात जात होते. मध्येच लोक बाबा बर्फानी चा पुकारा करत आणि मग दूरवर त्याचा जयजयकार पसरत जाई.

परतीच्या प्रवासाला ४ तास वेळ लागला. आम्ही सुखरूप बालताल बेसकॅपला पोहोचलो. हाथ, पाय, मांडी, मान आणि पूर्ण शरीर दुखत होते. सुखरूप परत आल्या मुळे देव पावल्या सारखे वाटले. जीवनातला अनमोल ठेवा आठवून आणि पेन किलर घेऊन झोपी गेलो. सकाळी फ्रेश होऊन पुढच्या मार्गला लागलो. खराब वातावरण मुळे २ जुलै ला दर्शन सकाळी ४-५ तास बंद होते. जर आम्ही २ जुलै ला दर्शन घेतले असते तर आम्हाला २ दिवस जास्त थांबावे लागले असते. परमेश्वर कृपे मुळेच १ दिवसात जाऊन - येऊन आणि संकटा विना आमचे दर्शन झाले होते.

प्रची १. बरारी टाँप
100_2831.jpg

प्रची २. बरारी टाँप
100_2832.jpg

प्रची ३. बरारी टाँप
100_2833.jpg

प्रची ४. बरारी टाँप
100_2834.jpg

प्रची ५. बरारी टाँप
100_2836.jpg

प्रची ६. बरारी टाँप
100_2837.jpg

प्रची ७. बरारी टाँप
100_2838.jpg

प्रची ८. बरारी टाँप
100_2840.jpg

प्रची ९. बरारी टाँप
100_2813.jpg

प्रची १०. बरारी टाँप
100_2814.jpg

प्रची ११. बरारी टाँप
100_2822.jpg

प्रची १२. बरारी टाँप
100_2825.jpg

प्रची १३. बरारी टाँप
100_2839.jpg

प्रची १४. बरारी टाँप
100_2844.jpg

प्रची १५. बालताल बेसकॅम्प
100_2858.jpg

प्रची १६. बालताल बेसकॅम्प
100_2870.jpg

प्रची १७. बालताल बेसकॅम्प
100_2871.jpg

प्रची १८. बालताल बेसकॅम्प
100_2872.jpg

प्रची १९. बालताल बेसकॅम्प - टेंटस
100_2874.jpg

प्रची २०. बालताल बेसकॅम्प - गाडीतळ
100_2875.jpg

प्रची २१. बालताल बेसकॅम्प - नदी
100_2880.jpg

प्रची २२. बालताल बेसकॅम्प - टेंटस
100_2863.jpg

प्रची २३. बालताल बेसकॅम्प - नदी
100_2810.jpg

प्रची २४. बालताल बेसकॅम्प
100_2849.jpg

प्रची २५. बालताल बेसकॅम्प - लंगर
100_2860.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलंय... Happy

ते एवढे टेंट्स कसले आहेत? पत्र्याच्या शेड्स आणि इतक्या तंबूंमुळे कसंतरीच दिसतंय. बर्फ देखिल अगदीच थोडं दिसतंय. माझी कल्पना होती की अमरनाथला सगळीकडे बर्फच असेल आणि सगळं निसर्गरम्य असेल. असो... शिवशंभोंना इथूनच मनापासून नमस्कार Happy
----
खरच घोड्या ला मानले पाहिजे. कितीही उतार असो वा चढ घोडा कधीच पडत नाही. घोड्या पुढे दरी असेल किंवा जागा नसेल तर घोडा तात्काळं ब्रेक मारतो.>>>> मी बघितलंय घोड्याला पडताना. रोहतांग पासच्या वाटेवर एका शार्प बेंटपाशी आमची बस थांबवली होती आणि पुढे चालत जा असं सांगितलं तेव्हा बाकिच्यांचं बघून मी आणि नवरा दोघेही रस्त्याचं लांबचे वळण न घेता मधूनच खडा चढ चढून वरच्या रस्त्याला पोहोचलो आणि नंतर परतताना तिथूनच डुगडुगत कसेबसे खाली उतरलो. एका वेळी एक पाऊलच कसे बसे रहात होते त्या खडबडीत दगडांमध्ये. आणि त्याच उभ्या वाटेतून घोडेही ये जा करत होते. आम्ही खाली उतरलो आणि वरुन उतरणार्‍या घोड्यांकडे आश्चर्याने पहात असतानाच एक घोडा चारही पाय वर करुन कोलमडत पडला आणि आमच्या समोरच लँड झाला. बिचारा Sad त्याच्यावरचा स्वार फेकला जाऊन डोक्याला खोक पडली. घोडेवाल्याने जसं काही झालंच नाही अश्याप्रकारे त्या पॅसेंजरला आणि घोड्याला उठवले. जखमी घोडा उठवणे तर अजूनच कठिण.

थांक्स अश्विनी के आणि उदयन,
अमरनाथ चा परिसर बर्फामुळेच १० महिने बंद असतो. बर्फ कमी झाल्यावरच यात्रा भरते.
ही टेंट्स बालताल बेसकॅम्प ची आहेत. टेंट्स कापडाची असून यात्रेकरू च्या राहण्याची व्यवस्था त्यात होते.

ही टेंट्स बालताल बेसकॅम्प ची आहेत. टेंट्स कापडाची असून यात्रेकरू च्या राहण्याची व्यवस्था त्यात होते. >>> ओह!

तुम्ही म्हटलंच आहे की घोड्यावर तोल सांभाळताना वाटेत फोटो काढता आले नाहीत. वाटेत आणि वर नक्कीच खूप सुंदर देखावा असेल Happy

धन्यवाद जिप्सी, वीप, नरेश माने.
जिप्सी - आणखी ९ फोटो टाकलेत. प्रची नावासहित अँपडेट केली आहेत.

.

श्री अमरनाथची यात्रा केल्याबद्द्ल, भागवतजी तुम्हाला सां. नमस्कार आणि लेखाबद्द्ल धन्यवाद! छान अनुभव घेतला आणि तो लेखात मांडला. पुलेशु!

सुंदर लिहीलय. वाचताना सुद्धा श्वास रोखुन धरला गेला होता. तुम्ही काय अनुभवल आहे ना ?
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

हर्पेन +१
माझ्याही आठवणी ताज्या झाल्या एकदम. गुहेचे फोटो कुठे आहेत? तुम्ही जाताना शेषनाग, पंचतरनी मार्गे गेलात का?

धन्यवाद हर्पेन, रश्मी, राजू७६, कविता१९७८, महेशकुमार, मनीमोहोर, rmd.
rmd, मी यात्रा बालताल मार्गे केली. यात्रेचा रूट बालताल -> डोमैल -> बरारी -> संगम -> अमरनाथ गुहा असा आहे. अमरनाथ गुहाचे दर्शन घेताना कॅमेरास परवानगी नसल्या मुळे कॅमेरा डेपोजीट करावा लागला. येताना पाऊस असल्या मुळे गुहे जवळ फोटो काढता आले नाहीत.

ओह्ह. हा काहीतरी नवीन नियम दिसतो आहे. मी २००३ मध्ये गेले होते. आम्हाला भरपूर फोटो काढता आले. अगदी शिवलिंगाचे देखील. आम्ही बालतालमार्गे उतरलो होतो. भलताच उतार आहे त्या पूर्ण रस्त्याला.

धन्यवाद देवकी.
rmd, या वेळेस खूप कडक चेकिंग होती. कॅमेरा, मोबईल, कंगवा, पेन, मोठी पर्स, चामड्याचा बेल्ट, चामड्याच वालेट न्यायला परवानगी नव्हती.

बापरे! मी गेले होते तेव्हा चेकिंग होतं पण या वस्तू नेऊ देत होते. कॅमेर्‍याने एक फोटो काढून दाखवावा लागायचा चेकपोस्ट वर.

मी ३-४ वर्षांपुर्वी गेलो होतो, त्यावेळीही कॅमेरा ई. वस्तू घेऊन गुहेत जाऊ देत नव्हते. पण एकवेळ हेलीकॉप्टर आणि एक वेळ चालत गेल्याने वाटेतले बरेच फोटो काढता आले होते.

धन्यवाद किशोर मुंढे, अबोल.
हर्पेन, मस्त फोटो आहेत. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही फोटो सांईज कमी करण्याकरता कोणते software/app वापरलेत.

काल अमरनाथ यात्रेवर मुस्लिमांनी हल्ला केला. Sad

कुठल्याही मुख्य वृत्तपत्राने हे वृत्त दिलं नाही.

अधिक माहिती : http://vskbharat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A...

-गा.पै.

धन्यवाद भागवत, मी मायक्रोसॉफ्ट ऑफीसचे पिक्चर मॅनेजर वापरतो.

Pages