पाऊस कधीचा पडतो

Submitted by रसप on 14 July, 2014 - 01:55

पानांची सळसळ दु:खे ऐकून मूक ओघळतो
ह्या निरभ्र डोळ्यांमधुनी पाऊस कधीचा पडतो

सुरकुतली ओली स्वप्ने
उरलीत उशाशी काही
बकुळांगी आठवसुमने
जपण्याची इच्छा नाही
पाउले मोजतो ज्याची तो श्वास नेहमी अडतो
मनअंगण चिंबवणारा पाऊस कधीचा पडतो

अश्रूंची ओघळओढ
रोखून थांबली नाही
शब्दांची तांडवखोड
हरवून संपली नाही
हा दाह विझवता, विझता, झुळझुळता नाद विसरतो
हुरहूर फुलवण्यासाठी पाऊस कधीचा पडतो

--------------------------------------------------------------

ओठांनी आवळलेला
आक्रोश सांडला जेथे
जमिनीने छाती फाडुन
रेखांश आखला तेथे
जडशीळ नेत्र क्षितिजाला पाहून कुणी कळवळतो
संपृक्त वेदना होउन पाऊस कधीचा पडतो

....रसप....
१३ जुलै २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/07/blog-post_14.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉबीनहूड | 14 July, 2014 - 11:27
मला वाटले ग्रेसांची पाउस कधीचा पडतो वार्‍याने हलते रान आहे काय की...

>>
'पाऊस कधीचा पडतो' आणि 'वार्‍याने हलते रान' ह्या दोन वेगळ्या कविता असाव्यात. माझ्या मते असं आहे -
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

छान Happy