हवा ही पावसाळी पण, सरींची खातरी नाही!

Submitted by profspd on 11 July, 2014 - 11:39

हवा ही पावसाळी पण, सरींची खातरी नाही!
तहानेला नसे पाणी, भुकेला भाकरी नाही!!

तुला जे वाटते आहे, मनाचे खेळ ते अवघे....
तुझी चिंता अनाठायी, तुझी भीती खरी नाही!

घराला दार ना खिडक्या, नसे छप्पर पुरे वरती.....
न वळचणही अडोशाला, पडाया ओसरी नाही!

कितीदा चालुनी आली स्वत: संधीच सोनेरी.....
तिनेही पाहिले होते करंटा मी घरी नाही!

मनापासून मी अध्यापनाचे व्रत कडक केले....
कधीही नोकरीला मी म्हणालो नोकरी नाही!

दिला जो शब्द माझ्या जिंदगीला तो खरा केला.....
कधी मी हुंदका येऊ दिला ओठांवरी नाही!

मनाने खूप उत्साही, उसळते रक्तही अजुनी....
परी तब्येत कायेची अता तितकी बरी नाही!

अताशा एकटेपण खायला उठते दुपारीही....
अता ओठांवरी या येतही आसावरी नाही!

मराठी गझलही जाते सरळ हृदयात रसिकांच्या.....
तसूभरही कमी माझी मराठी वैखरी नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची आजवरची अधिकतम आवडलेली गझल!

मात्रः

>>>तिनेही पाहिले दरवेळा करंटा मी घरी नाही!<<< ह्यात एक गुरू जास्त झाला आहे.

बहुतेक सर्व शेर आवडले.

मस्त

हवा ही पावसाळी पण, सरींची खातरी नाही!
तहानेला नसे पाणी, भुकेला भाकरी नाही!!

तुला जे वाटते आहे, मनाचे खेळ ते अवघे....
तुझी चिंता अनाठायी, तुझी भीती खरी नाही!>>>>> वाह! वाह! हे तर खुपच आवडले.

हवा ही पावसाळी पण, सरींची खातरी नाही!
तहानेला नसे पाणी, भुकेला भाकरी नाही!! >> वाह वा!! मतला मस्तच!!

गझल चांगली आहे. मध्यम दर्जाची व पोतही बरा आहे. मात्र;

मनापासून मी अध्यापनाचे व्रत कडक केले....
कधीही नोकरीला मी म्हणालो नोकरी नाही!

हा एक शेर नसता तर पचायलासुद्धा सोपी गेली असती. Happy
(या शेराविषयी यथावकाश लिहितो.)

मनापासून मी अध्यापनाचे व्रत कडक केले....
कधीही नोकरीला मी म्हणालो नोकरी नाही!

मलाही असे शेर पचायला जड जातात. हा शेर वैयक्तिक आहे.
खरेतर ही वैश्विक भावना होऊच शकत नाही.
जर एखादा अध्यापक पगार, नोकरीतील अनेक सुटी / फायदे न घेता
अध्यापन करीत असेल तर त्याला असं लिहिण्याचा हक्क आहे.

लिहिण्याची संधी मिळाली म्हणून, आणि पुढे येणारा तुमचा धन्यवाद आहे त्याबद्दल, एकत्र धन्यवाद.

समीर चव्हाण

इथल्या अनेकांच्या अनेक शेरांची वैश्विकता भोंगळपणे नव्हे तर काटकोरपणे तपासली तर किती जणांचा टिकाव लागेल हे तूच पहा!
झाकली मूठ सव्वा लाखाची!
झेपणार नाही कुणाला!
प्राचार्य सतीश देवपूरकर

खरेतर ही वैश्विक भावना होऊच शकत नाही.<<<<<<<<<<
गणिताचा प्राध्यापक ना तू?
याला काय बेस आहे रे?
काय मोजपट्टी आहे वैश्विकतेची?
वैश्विकता वस्तुनिष्ठ आहे की, व्यक्तिसापेक्ष आहे?
आणि कोणाची भावना ही खरी/खोटी हे तुझ्या कमजोर तर्कावर कशी अवलंबून असेल?
हे कुठले तुझे बाळबोध गणित?
तुला माझ्या ३७वर्षंच्या नोकरीबद्दल काय माहिती आहे की तू अशी असंबद्ध विधाने करत आहेस?

प्रोफेसरः

आपले प्रतिसाद घाईगडबडीत आलेत असे वाटते.
विचारपूर्वक लिहिले असते तर एकच प्रतिसाद पुरला असता.
असो, मी एक कवी आहे मायबोलीसाठी.
बाहेर गणिताचा शिक्षक आहे, प्राध्यापक नव्हेच नव्हे (अतिशय सुमार प्राध्यापक पाहिलेत तेव्हा ह्यात न पडलेले बरे).

मी कविता आणि त्यातील अनुभव ह्यांना धरून लिहिले.
तुमच्या दुस-या प्रतिसादावरून असे वाटते की माझ्या म्हणण्यात तथ्य असावे.
आपण पगार घेत नाहीत का ? मग कसले आले व्रत न तपस्या ?
माझा इतका साधा विचार आहे.
तसेही मत द्यायचे असते. ते असे का आहे, ह्याचा पुरावा ते दिल्यानंतर शोधणे गाढवपणाचे लक्षण आहे.
माणूस जेव्हा वैयक्तिक पातळीचे कमेंटस करतो तेव्हा त्याचा विवेक त्याला सोडून गेलेला असतो.
आपले तीन-चार प्रतिसाद हेच दर्शवितात.
जेव्हा शांत व्हाल, तेव्हा जरूर विचार कराल.
आपण वयाने मोठे आहात तेव्हा इतकेच म्हणू शकतो.

धन्यवाद.

समीर