आषाढाच्या देवा

Submitted by भारती.. on 9 July, 2014 - 03:29

आषाढाच्या देवा

आषाढाच्या देवा | तोषलात आज | राखावी हो लाज | प्राण जाई ||
दया मायबापा | आपणच करा | त्रासली ही धरा | त्राहि त्राहि ||

अपार वर्षावे | कृष्णमेघधन | आम्ही भक्तजन | विनवतो ||
जरी अभ्यासतो | विज्ञानप्रभाव | शास्त्रार्थाची धाव | पारखतो ||

बुद्धीचा प्रकाश | मंदावतो तेथ | निरांजन ज्योत | उजळते ||
मालवे दिवस | कालवे अवस | तेव्हा तुझी आस | तीव्र होते ||

आषाढाच्या देवा | एक तुझा धावा | आम्हा असे ठावा | आजवरी ||
बहु झालो कष्टी | द्यावी पुष्टीतुष्टी | सकळा संतुष्टी | कृपा करी ||

मनामनांतून | निघते जी वारी | शोधत पंढरी | आपुलाली ||
आज तुझ्यापाशी | नाचत हर्षत | आनंदे गर्जत | पोहचली ||

- भारती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा, काय सुरेख! भारतीताई, साष्टांग.. त्या विठोबालाही अन् तुम्हालाही..

आषाढाच्या देवा | पाव माझ्या रावा | क्षुधा ही तोषवी | धरतीची ||
कृपा करी अरे | धाव ना सत्वरे | ऐक विनवणी | भारतीची ||

बुद्धीचा प्रकाश | मंदावतो तेथ | निरांजन ज्योत | उजळते ||
मालवे दिवस | कालवे अवस | तेव्हा तुझी आस | तीव्र होते ||

अप्रतिम

अप्रतिम रचना! एकदम आवडली. पुन्हा पुन्हा वाचली.

फक्त एक शंका

आषाढाच्या देवा | तोषलात आज | राखावी हो लाज | प्राण जाई || >> येथे तोषलात म्हणजे आनंद होणे याच अर्थाने अभिप्रेत आहे का?

मनामनांतून | निघते जी वारी | शोधत पंढरी | आपुलाली ||
साष्टांग नमस्कार बाये, तुला... तो त्यालाच पोचतोय ते सोड Happy

सगळ्यांचे खूप आभार _/\_ , सई, Happy

@ फारएंड , >>आषाढाच्या देवा | तोषलात आज | राखावी हो लाज | प्राण जाई || - येथे तोषलात म्हणजे आनंद होणे याच अर्थाने अभिप्रेत आहे का?>>
होय, देवाला उद्देशून येथे म्हटलेय की आज तुम्ही प्रसन्न आहात , आषाढी आहे म्हणून आणि निदान काल तरी मुंबईत धुवांधार पाऊस आल्याने आषाढी या शब्दाची लाज राखली गेली अशाही अर्थाने.
दुष्काळाच्या सावटाची पार्श्वभूमी असलेली , ती टाळण्यासाठी केलेली ही प्रार्थना, शब्दयोजना.

दाद..

बुद्धीचा प्रकाश | मंदावतो तेथ | निरांजन ज्योत | उजळते ||
मालवे दिवस | कालवे अवस | तेव्हा तुझी आस | तीव्र होते ||>>>>>> अतीशय सुरेख. पुर्ण रचना अप्रतीम आहेच. पण ही ओळ जास्त सुरेख.

धन्यवाद सर्वांचे.
कृत्रिम पावसाचे प्रयोग , वरुणयंत्र , डॉ राजा मराठे या सर्वांबद्दल (https://www.youtube.com/watch?v=z_cq8ZPEtVA ) आणि मला अज्ञात असलेल्या या विषयात काम करणाऱ्या सर्वांना प्रणिपात करून शेवटी पाऊस या विषयातली आत्यंतिक अनिश्चिती ही मला अस्तित्वाशी निगडित सगळ्यात मोठी अनिश्चिती वाटते आणि मग पावसासाठी प्रार्थनाही आपण प्रत्येकाने केलीच पाहिजे असंही वाटतं..