असा मी सूर्य की, ज्याला ढगांनी ग्रासले होते!

Submitted by profspd on 8 July, 2014 - 04:27

असा मी सूर्य की, ज्याला ढगांनी ग्रासले होते!
जगाला वाटले होते, ग्रहण मज लागले होते!!

तुझ्या लावण्यबहराचा फुलोरा पाहुनी सजणे....
फुलांचे ताटवे सुद्धा मनोमन लाजले होते!

घराच्या बंद दाराने तुझ्या, हाका दिल्या होत्या....
घराबाहेर ते माझे कलेवर थांबले होते!

तुझा मज थांग केव्हाही खरोखर लागला नाही....
कितीदा मी तुझ्या डोळ्यांमधे डोकावले होते!

उभे आयुष्यही पडले थिटे मज शोधण्या उत्तर...
कटाक्षानेच तू कोडे गुलाबी घातले होते!

निसटली माणसे सारी सरकत्या सावल्यांसम ती....
कुणी वाईट तर त्यांच्यात कोणी चांगले होते!

न संततधार डोळ्यांची कधीही थांबली माझी....
दिलासे लाभले पण ते दगाबाजातले होते!

घरोबा जाहला माझा नि दु:खांचा असा काही....
सुखांनी लांबुनी मजला परस्पर टाळले होते!

अणूरेणूंमधे माझ्या जिवाचे जाहले नाते....
युगांनी वज्र मज केले, असे मज दाबले होते!

उगा झालो हिरा नाही, फुकाची ना झळाळी ही....
किती टन प्रस्तरांनी त्या उभे मज गाडले होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा मी सुर्य की>>>> म्युन्सिपाल्टीच्या फूटक्या दिव्यावर चिलटं बसल्यावर त्याचाही प्रकाश संपतोय...पूढील येळ्येला योग्य रुपक खरडावे.

अरे काजव्या, तुला रे काय माहिती सूर्य वगैरे, रुपकांची भाषा करतोस ते!
ज्याची अधू नजर फक्त महानगरपालिकेच्या फुटक्यातुटक्या लाववीझ करणा-या दिव्यापर्यंत कशी बशी जाते त्याने सूर्य /रुपक अशी न शोभणारी ढगळ भाषा वापरू नये बाळा!
तुझी उडी ती केवढी , बोलतो आहेस काय?