जातीयेसच तर जा.. पण बरंच काही राहिलंय बघ..!!

Submitted by चेतन.. on 8 July, 2014 - 03:39

जातीयेसच तर जा.. पण बरंच काही राहिलंय बघ..
बारमाही ग्रीष्म, भारवाही श्रावण.. अन चुकचुकणारं जग..
अर्ध्यातच थांबू पाहणारी मैफिल.. अर्धवट भैरवी.. लांबलेला मल्हार..
अस्तित्वावरच कोरल्या गेलेल्या तुझ्या खुणा.. काळाचे बदलत जाणारे संदर्भ.. आणि.. सुन्न गंधार ..
उतू जाऊ पाहणारे अनावर कढ.. चंद्राचं हितगुज.. चांदण्याचा पसारा..
विस्कटलेला भूतकाळ.. ढासळणारी संध्याकाळ.. घुसमटलेला वारा..
अस्ताव्यस्त रात्र.. अस्वस्थ गात्रं.. उद्ध्वस्त स्वप्ने..
कळ्यांभोवती रेंगाळणारे, प्राक्तनाचे नं सुटलेले उखाणे..
हुळहुळलेले तळे.. तळमळलेले डोळे.. निपचित शांत रान..
खूप आतलं ऐकायला आसुसलेले कान..
अगदी ढवळून निघालेला माझ्या मनाचा तळ..
माझं दार ठोठावत बसलेलं ते वादळ..
नावंही घेत नाहीये, अजून तिथून उठायचं ..
थोडं राहिलंय बहुतेक, माझं आभाळ अजून फाटायचं..
.
.

अजून काय बरं.. अगं ते संध्यारंगात बेमालूम मिसळून आता विरक्तीचा आव आणणारे अश्रू राहिलेच कि....
आणि तिला विसरून कसं चालेल.. अगदी माझ्याही नकळत लागणारी तुझी "उचकी...."
एकदाही होऊ दिली नाही चूक.. तिनं मी तुला विसरू देण्याची...
आणि दोघांनी मिळून डोळ्याखाली कोरलेल्या लेण्याची..
आणि.. अपूर्ण राहिलेल्या बर्याच कविता.. त्यांचा तर हिशोब कसा मांडू..?
आणि त्यातून काळाला निमंत्रणे कशी धाडू..?
भूतकाळाला, भविष्यकाळाला आणि वर्तमानाच्या भानाला..
कळ्यांनी उमलून येण्यासाठी गाऊ वाटणारया गाण्याला..
ह्या असल्या ताटकळत्या प्रश्नांना मिळणारी मौनांकित उत्तरं..
आणि मग हळहळती संध्याकाळ आणि तळमळती रात्र..
.
.
अजून बरंच काही निघेल बरं अगदी काढायचंच म्हटलं तर..
पण मासांत गोंदवलेलं अक्षर नाही खोडता येत, कितीही खोडायचंच म्हटलं तर..
अवघड आहे ह्या सार्यांसोबत धरून राहणं तग...!
.
.
.
जातीयेसच तर जा... पण........ बरंच काही राहिलंय बघ..!

-चेतन..

Group content visibility: 
Public - accessible to all site users