नावावरुन केवळ माणूस कळत नाही

Submitted by इस्रो on 7 July, 2014 - 07:41

नावावरुन केवळ माणूस कळत नाही
घेतोय श्वास म्हणजे आयुष्य जगत नाही

आहेस तूच अमुचा म्हणतात ते मला पण
माझ्याविना तयांचे काहीच अडत नाही

असते तयार कायम सोसावयास सारे
आईमधील "आई" बिलकूल थकत नाही

माणूस मी मराठी आहेच मी मराठी
मागे कधीच माझे पाऊल हटत नाही

आलो कशास येथे? करतोय काय मी हे?
कोणासही अता का हे प्रश्न पडत नाही

अपघात हो कुठे वा अपहरण हो कुणाचे
पण पोलिसात जाण्या माणूस धजत नाही

जातो गढून ' नाहिद' गझलेत एवढा की
दुसरीकडे कुठेही तो फार रमत नाही

-नाहिद नालबंद

Group content visibility: 
Public - accessible to all site users