चौवीस घरच्या आठवणी...

Submitted by लाल्या on 7 July, 2014 - 00:52

आठवणी चाळता चाळता दिसली एक चाळ.
सर्रकन समोर आला एक सुंदर भूतकाळ.

चाळीतल्या चौवीस बिर्‍हाडांची आपली आपली खोली,
त्यात राहणारी लोकं अगदीच साधी-भोळी,
त्यांच्यातही अध्ये-मध्ये भांडणे व्हायची,
क्षणात सारं विसरून पुन्हा एकोप्याने राहायची.
वन रूम किचन कधीच नव्हतं आमचं घर,
चौवीस खोल्यांच्या वाड्यामध्ये फिरू दिवसभर.
पैशांची चणचण असे प्रत्येकाच्याच घरात,
पण खाऊ देताना कधीच कोणी राखले नाहीत हात.
प्रत्येक कार्ट्याच्या होत्या चौवीस काक्या खास,
अन प्रत्येकाच्या आजीला नातवंडं पचास.
कल्ला चाले दिवसभर, सकाळ संध्याकाळ,
आठवणी चाळता चाळता दिसली एक चाळ.

आज अचानक आठवताहेत सारी बिर्‍हाडं
आज पुन्हा उघडताहेत बंद किवाडं.
शेजारचे केळूसकर, समोरचा स्वामी,
दुसर्‍या माळ्यावर गोव्याचे नाईक मामा मामी,
आंधळे हरीभाउ, आणि आप्पा देसाई,
सुर्वे, भाटिया, शेट्टी, घोडके, भाऊ-जोगल ताई.
सुंगी, मुन्नी, बबली, डांगू - पंजाब्याच्या पोरी,
प्रत्येकीची आपली आपली धमाल लव्ह-स्टोरी.
तळ मजल्यावरचे चक्रनारायण, देवकर, होनावर,
सगळ्यांमुळे चाळीत दिसे हिंदुस्तानी पावर.
वेगवेगळ्या मणींनी बनली होती माळ,
आठवणी चाळता चाळता दिसली एक चाळ.

आमच्या चाळीत सणांची होती आपलीच एक मजा,
चाळीच्या पूजेची तर वेगळीच होती नशा.
पूजेसाठी आम्ही मुलं अख्खी चाळ झाडू,
प्रत्येकाला घरामध्ये जाऊन बाहेर काढू.
प्रत्येक साली सत्यनारायणाला नवीन जोडी बसे,
देवाला पण दरवर्षी नवीन जोडपं दिसे.
बायकांसाठी हळदी-कुंकू, मुलांसाठी स्पर्धा,
आवरा-आवरीत त्याच्या पुढचा दिवस जाई अर्धा.
पाण्यासाठी रोज चाळ घालायची गार्‍हाणे,
पण होळीसाठी पाणी मिळे, कसं कोण जाणे?
पुन्हा आठवला तो चौवीस घरचा दिवाळीचा फराळ,
आठवणी चाळता चाळता दिसली एक चाळ.

शिव्यांसारखा प्रेमाचा ही होता महापूर
भांडणांच्या ठेक्यावरती ओलाव्याचे सूर.
शेजारची शेट्टीण कितीही तडतडली,
रविवारी सकाळी देई गरम गरम इडली.
दुपारपर्यंत भर उन्हात गच्चीवर नाचा,
दुपारचं जेवण घोडक्यांकडे - भाकरी आणि ठेचा.
दुपारी गॅलरीत बैठे खेळांचा धिंगाणा घालू,
साप-शीडी, नवा व्यापार, पत्ते-कॅरम चालू.
संध्याकाळी क्रिकेट, साखळी, खो-खो, लगोरी,
अंधार पडला की आभ्यासाला आपापल्या घरी.
पैशापायी मस्तीची कधीच नसे आबाळ,
आठवणी चाळता चाळता दिसली एक चाळ.

- माधव आजगांवकर.

नोंद - मला वाटतं, सत्तर च्या दशकापर्‍यंत जवळ जवळ मुंबईतली प्रत्येक चाळ कमी-अधिक प्रमाणात याच चाळीसारखी होती. ही कविता माझं लहानपण आपल्या कुशीत सांभाळणार्‍या माझ्या त्या चाळीला अर्पित आहे. यातली चाळ, यातली लोकं, अगदी नावासकट....सगळं सगळं अगदी खरं आहे....ते नेहमी माझ्या मनात जीवंत राहतील.

Raigad.jpg

रायगड को. ऑप. हा. सोसायटी, बिल्डिंग क्र. २, सरदार नगर नं. १, शीव, मुंबई - २२.

Group content visibility: 
Public - accessible to all site users