कुठलेच फूल का आता बागेत फुलारत नाही?

Submitted by profspd on 6 July, 2014 - 01:06

कुठलेच फूल का आता बागेत फुलारत नाही?
का ऋतू त्यांस कुठलाही अलिकडे खुणावत नाही?

बंगल्यापरी पत्त्यांच्या ढासळले इमले त्यांचे....
दु:खांवर कोणाच्याही सुख कधी उभारत नाही!

सूर्याची किरणे सुद्धा जातवार केली त्यांनी....
वस्तीत गोरगरिबांच्या का सूर्य प्रकाशत नाही?

ही जीभ आजही माझी तलवार तळपती आहे.....
घायाळ पहावत नाही, ती अता सळाळत नाही!

कोणाला वेळच नसतो, व्यापात आपल्या जो तो....
मी आताशा कोणाला शायरी सुनावत नाही!

मी आलो येथे त्याचा परिणाम केवढा झाला...
वासरांत गाय कुठलीही लंगडी, फुशारत नाही!

सगळेच लोक मज आता वाटती वाट चुकलेले....
मी पत्ता तुझा कुणाला अलिकडे विचारत नाही!

एकेक लाट येते अन् रुसुनी माघारी जाते.....
कोरडा किनारा आता कोणास पुकारत नाही!

तू नकोस देऊ मजला एकही श्वास कर्जाऊ....
द्यायला तुला मजपाशी कोणती अमानत नाही!

फिरलाच शेवटी नांगर त्या अवैध वस्तीवरती....
धेंडांची सुद्धा कुठल्या वाचली इमारत नाही!

आसूड वंचनांचे ते, ना दिसले कोणालाही....
वळ हृदयावरती सारे, बाहेर दुखापत नाही!

नसत्याच उलाढाली मी भरपूर आजवर केल्या....
शाहणाच झालो आता, करणार उचापत नाही!

मी वाटत सुटलो आहे धन्यवाद प्रत्येकाला....
कुठलीच कुरापत मजला अलिकडे सतावत नाही!

बसतात उरावर नंतर, उरलेली सारी कामे....
कुठलीच गोष्ट मी आता बाजूला सारत नाही!

मी एक प्राच्यविद्येच्या ग्रंथासम पडून आहे....
वाचणे दूर मज कोणी वरवरही चाळत नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एक प्राच्यविद्येच्या ग्रंथासम पडून आहे....
वाचणे दूर मज कोणी वरवरही चाळत नाही!>>>>>>>>>

व्वा !!!!
नागपुरी तडका आवडला Wink

---

मी आलो येथे त्याचा परिणाम केवढा झाला...
वासरांत गाय कुठलीही लंगडी, फुशारत नाही!

हा शेर मायबोलीवरल्याच कुणावरतरी असल्याचे मी खात्रीने सांगू शकतो तुमचे निदान हजार-एक शेर वाचण्याचा माझ्या अनुभवावरून !!!

असो बरेच शेर आवडले गझल एकंदर उत्तमच आहे

मी एक प्राच्यविद्येच्या ग्रंथासम पडून आहे....
वाचणे दूर मज कोणी वरवरही चाळत नाही!<<< वा

माझा एक शेर आठवला.

मासिकासारखा येथे जगण्याचे ठरवत आहे
वाचो ना वाचो कोणी पण पाने चा़ळत राहो