कधीचा मीच वेड्यासारखा रे, बोलतो आहे!

Submitted by profspd on 5 July, 2014 - 10:53

कधीचा मीच वेड्यासारखा रे, बोलतो आहे!
उगा वेड्यांपुढे गीता कधीचा वाचतो आहे!!

न हा आटापिटा माझा स्वत:साठीच फिरण्याचा...
जगाला जागवायाला अहर्निश हिंडतो आहे!

कुणाला ‘धर्म’ संज्ञेचा समजला अर्थ सच्चा का?
इथे प्रत्येकजण अपुलाच झेंडा रोवतो आहे!

उपाशी जे खरे होते, बिचारे गप्प ते बसले....
न ज्याला भूक तो भरल्याच पोटी भांडतो आहे!

फुकाची ना मन:शांती अशी वाट्यास ही येते....
मनाला रोज मी माझ्या अता खंगाळतो आहे!

किती वेळा तडकतो काळजाचा आरसा माझ्या....
उभे आयुष्य मी सारे तडे ते सांधतो आहे!

महादेवा, न भीती, कोणती चिंता अता उरली....
तुझा दररोज अंगारा कपाळी लावतो आहे!

अता मी राहिलो नाही, परी माझ्याच या ठिक-या....
मला मी वेचुनी सा-या जगाला वाटतो आहे!

मला अभिमान याचा की, भटांचा शिष्य मी आहे!
भटांच्या शायरीचा मी वसा सांभाळतो आहे!!

पिढ्यांना सर्व येणा-या मिळो छाया, फळे यांची....
बियाणे शुद्ध गझलांचे मराठी पेरतो आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अता मी राहिलो नाही, परी माझ्याच या ठिक-या....
मला मी वेचुनी सा-या जगाला वाटतो आहे!<<< शेर व खयाल आवडला. Happy

मला अभिमान याचा की, भटांचा शिष्य मी आहे!
भटांच्या शायरीचा मी वसा सांभाळतो आहे!!<<<

'मी आहे' मधून 'मी एकमेव आहे' असे काहीसे वाटते, 'आहे मी' हे जरा अधिक सहज वाटले असते. वैयक्तीक आवडनिवड! कृपया गैरसमज नसावा. दोनवेळा 'भट' हा शब्द येणे कदाचित टाळता आलेही असते. कवीवर्य प्रदीप निफाडकरांनीही ह्या धर्तीवर रचलेला एक शेर आठवला. 'मी भटांचा कोण आहे काय सांगू, गझल माझी सांगते माझे घराणे'!

बाकी भटांनी असेही म्हंटले होते:

चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला यार हो Happy

पिढ्यांना सर्व येणा-या मिळो छाया, फळे यांची....
बियाणे शुद्ध गझलांचे मराठी पेरतो आहे!<<<

ह्यात 'आव आणणे' जरा अधिकच जाणवले. किंबहुना गेल्या काही गझलांमध्ये 'आज माझ्यामुळे गझल हा काव्यप्रकार टिकून आहे' अश्या स्वरुपाचे अनेक शेर आले. हे काही मनाला रुचत नाही. स्वतःवर खुष असणे, ते जाहीर करणे, हे एका मर्यादीत पातळीपर्यंत छान वाटते. Happy

एकुण ह्या गझलेत भरीची अक्षरे जाणवली. सीमलेस, गोटीबंद गझल वाटली नाही.

'आहे मी' हे जरा अधिक सहज वाटले असते<<<< इतकेच सांगायला मी आलेलो

असो

निफाडकर सरांचा शेर आवडला