बासरी होतो, तिच्या ओठास होतो!

Submitted by profspd on 3 July, 2014 - 11:13

बासरी होतो, तिच्या ओठास होतो!
एक माझा अन् तिचा मग श्वास होतो!!

गंध झालो, दरवळाया लागलो मी....
मी तिचा साक्षात श्वासोच्छ्वास होतो!

झुळुक माझ्या भोवती रेंगाळते ही....
मी फुलांचा कोवळा निश्वास होतो!

मोजता आलाच नाही परिघ माझा....
मी अनंता एवढा रे, व्यास होतो!

ती स्मृतीरूपात माझ्या सोबतीला....
त्यामुळे वनवासही मधुमास होतो!

काय माझ्या वावराचा त्रास इतका?
शायरांना तो जणू वनवास होतो!

जरब माझी केवढी बसली असावी....
विजय माझा बघ, विनासायास होतो!

चेहरेपट्टी तुझी गझले, निराळी....
लोक का म्हणती भटांचा भास होतो?

काय तू माझ्यावरी केलीस जादू?
सारखा मज का तुझा आभास होतो?

लेखणी माझी तिच्यासाठीच झाली....
शारदेचा जाहलो मी दास होतो!

भुरळ डोळ्यांना प्रसिद्धी घालते पण....
रेशमी असला तरी तो फास होतो!

सोड दुनियेचे घडीभर, आपले बघ....
खुद्द माझाही मला का त्रास होतो?

पंचवीशीतच हवा डोक्यात गेली....
या भ्रमाने शेवटाला -हास होतो!

वेळचेवेळी करावी स्वच्छता रे....
अन्यथा माणूस सुद्धा डास होतो!

कैक काटेकोर गझला वाचतो मी....
तेवढा माझा तरी अभ्यास होतो!

ज्यास कामनसेन्स असतो, तोच अंती...
जिंदगानीची परीक्षा पास होतो!

पुस्तकी ज्ञानामुळे पंडीत होतो...
जीवनामध्ये परी नापास होतो!

वाजली घंटा तरी व्याख्यान चालू....
मी घड्याळाचा कधी ना तास होतो!

उंच शिखरे सहज पादाक्रान्त केली....
विठ्ठलाचा खुद्द, मी विश्वास होतो!

माझिया मागेच का येतात नजरा?
एक मी चटका जणू डोळ्यास होतो!

बोचती पायांमधे काटे तुझ्या अन्....
त्रास त्याचा माझिया हृदयास होतो!

या नको जाऊस हारांवर जगाच्या...
याच हारांचा कधी गळफास होतो!

पूर्वजन्मीचीच पुण्याई असावी....
वाडियामध्येच मी कामास होतो!

सारखे मागेच पैशांच्या किती ते....
केवढा जाचक पहा हव्यास होतो!

ओळखीच्या वाटती सा-याच वाटा....
नेहमी आभास हा पायास होतो!

पाखरे वेळेत जर नाही परतली....
तर किती बघ, त्रास त्या घरट्यास होतो!

योग्य वेळेलाच मिळते योग्य वस्तू....
अन्यथा निष्फळ असा सायास होतो!

टांगती मजलाच आता चक्क दारी....
मी जणू हुकुमी अशी आरास होतो!

रसिक गझलेभोवती फिरतात माझ्या....
मी गझलक्षेत्रातला का आस होतो?

चोचल्यांसाठी न लिहिली शायरी मी...
शायरीच्या मी भुकेचा घास होतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

टीप: commonsense शब्दातील 'का' अक्षरावरील चंद्रकोर टंकता आली नाही, क्षमस्व!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का, काही चुकले आहे का?
शेरांची संख्या ३०मात्र झाली, कारण अनावर उचंबळ! १तासातील पाझर!

सुरेश भटांची एक गझल आठवते आहे,

मी असा त्या बासरीचा सूर होतो
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो................ तुमची गजल यावर बेतलीय काय?