तुला पाहता समोर, खिळले डोळे माझे!

Submitted by profspd on 2 July, 2014 - 11:04

तुला पाहता समोर, खिळले डोळे माझे!
दिव्यत्वाला बघून दिपले डोळे माझे!!

खूप ठरवले रडायचे नाही केव्हाही....
वळण काय आले अन् भरले डोळे माझे!

शपथ मोडली नाही माझी या डोळ्यांनी....
एकांतातच अखेर रडले डोळे माझे!

न सांत्वने, ना कुणी दिलासे दिलेच मजला....
मला मनवण्या अखेर झरले डोळे माझे!

त्याच क्षणाला पडलो दोघे प्रेमामध्ये....
पहिल्या भेटीमधेच भुलले डोळे माझे!

बांधलीस ही जन्माची निरगाठ मला तू...
गालावरच्या खळीत फसले डोळे माझे!

स्वप्नांच्या धुंदीतच मी लागलो फिराया...
पडलो तेव्हा कुठे उघडले डोळे माझे!

मनकवडी तू, तुझ्यापासुनी काय दडावे?
मला पाहता तू ओळखले डोळे माझे!

समोर येऊन माझिया मज कसे टाळले...
किती लीलया पहा चुकवले डोळे माझे!

लठ्ठ पागाराचीच नोकरी चालत आली....
क्षणभर तेव्हा खरेच फिरले डोळे माझे!

कसे झाकले जावे माझे दारू प्राशन?
या दारूने लगेच चढले डोळे माझे!

गुन्हाच झाला होता माझा कबूल होते....
तिच्या समोरी जाता झुकले डोळे माझे!

तिडीक उठली डोक्यामध्ये त्यास पाहता.....
राग अनावर झाला, जळले डोळे माझे!

तुला पाहण्यासाठी होते अधीर डोळे...
तुला भेटलो तेव्हा निवले डोळे माझे!

तुझी प्रार्थना केल्यावरती बळ हे आले....
मीच अखेरी होते पुसले डोळे माझे!

स्वप्नामध्ये असा गुलाबी मृत्यू दिसला....
तुझ्या मिठीच्या उबेत मिटले डोळे माझे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users