कोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी ? (एक शेर नवीन)

Submitted by रसप on 2 July, 2014 - 01:41

कोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी ?
भोग तोही कोर माझ्या रंगल्या भाळावरी

जेव्हढी झाली उधारी फिटव आता पावसा
कर तुझ्या शेतीस माझ्या आज तू नावावरी

कोरडी तर कोरडी पण भाकरी तर दे मला
पोट भरल्यावर सुचू दे ओळ दुष्काळावरी

भोवताली फक्त विक्रय चालतो बहुधा इथे
फूल कोमेजून जावे उमलल्या देठावरी

वेळ कातर, हृदय हळवे, जीवघेणी शांतता
सांजवेळी बांध फुटतो 'खुट्ट'ही झाल्यावरी

चांदणे ओतून सगळे फिकटलेला चंद्र मी
भाळली ना शर्वरी ना लाभली आसावरी

संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?

लपवताना आसवे आईस होते पाहिले
पाहिली नाही कधी मग वाहती गोदावरी

वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी

....रसप....
२ जुलै २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/07/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसप,

नवा शेर ह्या गझलेत घेतला आहेत हे ठीक आहे, पण ओळींची अदलाबदल केली तर वेगळी जमीन तयार झाली तरीही शेर अधिकच प्रभावी होईल असे आपले वाटले.

भूषणदादा,

'गोदावरी' हा काफिया डोक्यात (मनात) आधीपासूनच होता. पण साजेसा आशय उमलून येत नव्हता. गोदावरीच्या पुराबद्दल एक लेख वाचला आणि मिसरा सुचला - 'पाहिली नाही कधी मी वाहती गोदावरी'. कारण आमच्या औरंगाबादपर्यंत पोहोचेपर्यंत गोदामाई फारच रोडावलेली असते. हा मिसराही काही दिवस तसाच रेंगाळत होता आणि ईव्हेन्च्युअली एक वेगळाच विचार सुचला व हा शेर तयार झाला.
आधीपासूनच मनात असलेला काफिया व त्यावरूनच सुचलेला मिसरा ह्यामुळे शेर बनायच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये हा शेर प्रस्तुत गझलेशीच नातं सांगत असल्याने मी तुम्ही सांगताय तसा विचार करूच शकलो नाही.

ह्यापुढे असा विचार नक्की करत जाईन.

धन्यवाद !