जन्म घे देवा अता तू माणसासाठी!

Submitted by profspd on 1 July, 2014 - 07:36

जन्म घे देवा अता तू माणसासाठी!
ये महादेवा, तुझ्या या म्हाळसासाठी!!

लोचने पाणावली प्रत्येक शेताची......
फोडती टाहो नभा, ती पावसासाठी!

मी विदर्भासारखा तिष्ठत उभा आहे....
भाव काही येत नाही कापसासाठी!

जन्मभर गझला, रुबाया, मुक्तके लिहिली....
हीच माझी मालमत्ता वारसासाठी!

भात बोलाचा, कढीही फक्त बोलाची....
पाहिजे अंगी धिटाई साहसासाठी!

दावणी तोडून ते हुंडारले कोठे?
जीव तुटतो या मनाच्या पाडसासाठी!

रक्तपातानेच वावर सुन्न हे झाले....
दांडगाई वारशाच्या या उसासाठी!

गायकीची कैक वर्षे साधना केली....
तो कसा येईल तुमच्या कोरसासाठी?

साधनेचे बीज हृदयी पाहिजे अस्सल....
हे पुरे गझलेतल्या आहे रसासाठी!

चौकडी चांडाळ करुनी धन्य ते होती....
सारख्या बाजू हव्या रे चौरसासाठी!

धन्यवादानेच करतो बोळवण त्याची....
वेळ खर्चू मी कशाला फडतुसासाठी?

माझिया गझला बटाटे वाटती त्यांना...
तोतयांना कुरण झाले ते किसासाठी!

कैक खुंटे, अन् खिळे येथे उभे मध्ये....
ठाण त्यांनी मांडले निव्वळ धसासाठी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जन्म घे देवा अता तू माणसासाठी!
ये महादेवा, तुझ्या या म्हाळसासाठी!!<<< दोन ओळी स्वतंत्र आहेत.

लोचने पाणावली प्रत्येक शेताची......
फोडती टाहो नभा, ती पावसासाठी!<<< छान पण जुना खयाल

मी विदर्भासारखा तिष्ठत उभा आहे....
भाव काही येत नाही कापसासाठी!<<< कसला कापूस?

जन्मभर गझला, रुबाया, मुक्तके लिहिली....
हीच माझी मालमत्ता वारसासाठी!<<< वा

भात बोलाचा, कढीही फक्त बोलाची....
पाहिजे अंगी धिटाई साहसासाठी!<<< ठीक

दावणी तोडून ते हुंडारले कोठे?
जीव तुटतो या मनाच्या पाडसासाठी!<<< मन म्हणजेच पाडस की मनाचेही एक पाडस आहे? मन म्हणजेच पाडस असले तर 'मनाच्या पाडसासाठी'मधून एक वेगळाच्ज नको असलेला अर्थही निघत आहे.

रक्तपातानेच वावर सुन्न हे झाले....
दांडगाई वारशाच्या या उसासाठी!<<< पहिल्या ओळीत अर्धवट राहिलेला खयाल दुसर्‍या ओळीची मदत घेऊन पूर्ण करणे म्हणजे शेर नव्हे. 'उसाच्या वारश्यासाठी चाललेल्या दांडगाईत वावर रक्तपातानेच सुन्न झाले' हा सरळ साधा खयाल आहे. एक खयाल दोन ओळींत विभागला की शेर ठरत नाही.

गायकीची कैक वर्षे साधना केली....
तो कसा येईल तुमच्या कोरसासाठी?<<< फार छान शेर!

साधनेचे बीज हृदयी पाहिजे अस्सल....
हे पुरे गझलेतल्या आहे रसासाठी!<<< वृत्तासाठी दुसर्‍या ओळीत घेतलेला शब्दक्रम 'अस्सल' वाटत नाहीये. खयाल सामान्य आहे.

चौकडी चांडाळ करुनी धन्य ते होती....
सारख्या बाजू हव्या रे चौरसासाठी!<<< असंबद्ध द्विपदी! पहिल्या ओळीत 'ते चौघे म्हणजे सारख्या बाजू नाही आहेत' हे स्पष्ट होत नाही आहे.

धन्यवादानेच करतो बोळवण त्याची....
वेळ खर्चू मी कशाला फडतुसासाठी?<<< भांग पिऊन झिंगलेला शेर आहे हा! धन्यवाद कोणाला देतात? जो काही उपकार / मदत / सहाय्य करतो त्याला! अश्याची 'धन्यवाद देऊन बोळवण करणे' हे सहृदयी माणसाला शोभत नाही. पण अचानक तो माणूस फडतूस असल्याचे दुसरी ओळ बकते. मग तो फडतूस होता तर त्याला धन्यवाद तरी का दिले आणि सहाय्य तरी कसले घेतले? अवाक करणारा टुकार शेर!

माझिया गझला बटाटे वाटती त्यांना...
तोतयांना कुरण झाले ते किसासाठी!<<< मंडईतील भाजीवाल्याने रात्री देशी नरड्यात ओतून समस्त भाजीविक्रेत्यांवर घेतलेले तोंडसुख असल्यासारखे वाटत आहे. एक तर तुमच्या गझला दुसर्‍यांना बटाटे वाटतात हा अचाट कल्पनाविलास सुधरत नाही वाचकाला. आता पुढच्या ओळीत काय भयानक घडेल अश्या भीतीने वाचायला जावे तर म्हणे तोतयांना ते बटाटे 'बटाट्याचा किस' करण्यासाठी असलेले कुरण वाटत आहे. बटाट्याचा किस करायला मुळात कोणी तोतया कशाला हवा? किसाचे कुरण कसे काय वाटेल? आणि तुमच्या गझला बटाटे वाटतात हे कसे काय हा प्रश्न राहतोच. ह्या शेरात कोणता अलौकीक सौंदर्यबोध, वक्रोक्ती, नाट्यमयता, कलाटणी, कडेलोट, आहे?

कैक खुंटे, अन् खिळे येथे उभे मध्ये....
ठाण त्यांनी मांडले निव्वळ धसासाठी!<<<

धस म्हणजे काय हे माहीत नसल्याने शांत राहतो.

धन्यवाद