एक नभाचा अश्रू मेला ....

Submitted by सुशांत खुरसाले on 29 June, 2014 - 04:13

एक नभाचा अश्रू मेला रक्ताच्या ओकत गुळण्या
डोळ्यांदेखत माती आता सूर लावते मुसमुसण्या
त्या दोघांचे हसणे-रडणे बघतो हे सुचता सुचता
माती माझी, नभही माझे तटस्थ मी आहे पुरता...
काय, कुणाशी नाते आहे समजुनही समजत नाही
माझे-माझे म्हणता म्हणता विश्व कसे बघवत नाही
धिक्कारावे वाटत असता कुठेतरी करुणा दिसते
स्वीकारावे वाटत असता अर्थ उसवले..जाणवते
सीमेवरती उभा तरी मी सिमांत मग झाला केव्हा ?
मातीचा अश्रू माझ्याही डोळ्यांशी आला केव्हा ?
घोळक्यात नक्की कुठल्याशा मिसळावे ते समजेना
सुकले नाही कुठले नाते ...कुठले नाते बहरेना
गोळाबेरीज या प्रश्नांची करू लागली दंगल मग..
वणव्याच्या उन्मेषांवरती जळू लागले जंगल मग ..
एक नभाचा अश्रू आला या सगळ्यांना उत्तरण्या
मनात मातीच्या शंकेची पाल लागली चुकचुकण्या
अन् मग उत्तर देता देता काय जाहले ऐकुन घे...
एक नभाचा अश्रू मेला रक्ताच्या ओकत गुळण्या ....

--सुशांत ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
धिक्कारावे वाटत असता कुठेतरी करुणा दिसते
स्वीकारावे वाटत असता अर्थ उसवले..जाणवते
<<

Happy