पाय हे श्रांतले शेवटी शेवटी!

Submitted by profspd on 28 June, 2014 - 01:03

पाय हे श्रांतले शेवटी शेवटी!
नेत्र पाणावले शेवटी शेवटी!!

त्रास देऊन देऊन ते धापले....
दु:ख कंटाळले शेवटी शेवटी!

पैलतीराकडे लागली लोचने....
प्राण आसावले शेवटी शेवटी!

बालवय राहिले दूर मागे किती....
ऊर पान्हावले शेवटी शेवटी!

पावसाच्या सरी संपल्या सर्व त्या....
पान ओथंबले शेवटी शेवटी!

गच्च भरले धरण लोचनांचे असे....
थेंब ओसंडले शेवटी शेवटी!

राहिलो लांब सा-या सुखांपासुनी....
हृदय हे भाळले शेवटी शेवटी!

खूप धरला अबोला सखीने जरी.....
मौन ते बोलले शेवटी शेवटी!

ना उसासा, न टाहो कधी फोडला....
ऊर आक्रंदले शेवटी शेवटी!

खूप समजावले जिंदगीला अरे....
श्वास हे थांबले शेवटी शेवटी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users