या अबोल्याशी तुझ्या मज बोलणे जमलेच नाही!

Submitted by profspd on 27 June, 2014 - 08:02

या अबोल्याशी तुझ्या मज बोलणे जमलेच नाही!
गूज हृदयातील माझ्या सांगणे जमलेच नाही!!

मी उगा येथे तिथे ती टाकली सांडून सारी......
तू दिलेली आसवे सांभाळणे जमलेच नाही!

एकटेपण उंच शिखराचे मला बघते गिळाया.....
पायथ्यांमध्ये कधीही नांदणे जमलेच नाही!

आसवे पुसली जगाची, टाचले हे गगन सुद्धा....
पण, तडे माझ्यातले मज सांधणे जमलेच नाही!

तार हृदयातील माझ्या छेडली नाही कुणीही.....
का म्हणू की, मज कुणावर भाळणे जमलेच नाही!

घालतो मी दंडवतही पाहतो दिव्यत्व तेव्हा....
मज कुणालाही उगा सत्कारणे जमलेच नाही!

पोचलो साठीमधे पण, समज ही आलीच नाही.....
जिंदगी सुद्धा स्वत:ची उमजणे जमलेच नाही!

मज गुलाबाची फुले प्राणाहुनीही प्रीय सारी.....
डवरलेले फूल केव्हा तोडणे जमलेच नाही!

जीभ माझी ‘ना’ म्हणाया रेटता आलीच नाही....
टाळणे किंवा मला फेटाळणे जमलेच नाही!

राहिलो मी औक्षणाविन जिंदगीभर कोप-याला....
मज विनाकारण कुणा ओवाळणे जमलेच नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तार हृदयातील माझ्या छेडली नाही कुणीही.....
का म्हणू की, मज कुणावर भाळणे जमलेच नाही!....... क्या बात है !
घालतो मी दंडवतही पाहतो दिव्यत्व तेव्हा....
मज कुणालाही उगा सत्कारणे जमलेच नाही!....... क्या क्या बात है !!
............. असा कन्फेशन देणारा कवी जेनुइनली कवी असतो.
-----बाळ पाटील