शायरीचा यज्ञ मी आजन्म केला!

Submitted by profspd on 26 June, 2014 - 04:28

शायरीचा यज्ञ मी आजन्म केला!
लाभले मज फक्त पागोटे नि शेला!!

तोल ढळलेलेच जास्ती पाहिले मी....
मी कधी ना सोडले पण, सभ्यतेला!

घास उतरावा घशाखाली कसा हा?
देश माझा हा कधीचा रे, भुकेला!

जाहली बेघर पहा माझ्यापरी ती....
राहिला नाही निवारा अस्मितेला!

हुंदके देतात माझे शेर आता....
ऊर दु:खांनी जगाच्या दाटलेला!

काय कामाचा सुई-दोरा तुझा हा?
मी असा हा ठिकठिकाणी फाटलेला!

कोण जाणे, कोण गेले त्या दिशेने?
हा पळाला, तो पळाला त्या दिशेला!

न्यायचे केव्हा, कसे मज ते ठरव तू.....
कैक व्याधींनी असा मी वेढलेला!

सोयरे गेले तसा मी शांत झालो......
एकटा उरलो स्मशानी पेटलेला!

थांग गझलेचा मला कळलाच नाही.....
जन्म माझा शायरी लिहिण्यात गेला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुंदके देतात माझे शेर आता....<<<< मिसरा खूप आवडला

कोण जाणे, कोण गेले त्या दिशेने?
हा पळाला, तो पळाला त्या दिशेला<<< आवडला . उत्कंठा मस्त तणली गेली मजा आली

एकुणात गझल आवडली

काय कामाचा सुई-दोरा तुझा हा?
मी असा हा ठिकठिकाणी फाटलेला!<<< वा

कोण जाणे, कोण गेले त्या दिशेने?
हा पळाला, तो पळाला त्या दिशेला!<<< वा

न्यायचे केव्हा, कसे मज ते ठरव तू.....
कैक व्याधींनी असा मी वेढलेला!<<< वा

सोयरे गेले तसा मी शांत झालो......
एकटा उरलो स्मशानी पेटलेला!<<< वा वा

थांग गझलेचा मला कळलाच नाही.....
जन्म माझा शायरी लिहिण्यात गेला!<<< सहमत!

मतल्याचा अर्थ काय?<<< मला विचारताय का
असो

शायरीचा यज्ञ मी आजन्म केला!
लाभले मज फक्त पागोटे नि शेला!!

माझ्या मते शेर सोपा वाटतो पण तसा नाही आहे .म्हणजे वरची ओळ स्पष्ट आहेच आणि ती तुमच्याबद्दलचे एक सत्य सांगते आहे ही खरे . दुसर्‍या ओळीत तुम्हाला त्याबद्दल फक्त पागोटे नि शेला मिळाला म्हणजे तुमचा साधासा एक सत्कार गझलेच्या सेवेसाठी वगैरे झाला असे कळते आहे पण गम्मत अशी आहे की तुम्हाला केवळ पागोटे आणि शेला (पागोटे व शेलात फरक काय असतो ते समजले नाही ) मिळाला नारळ मिळालाच नाही .!!!!
नारळ म्हणजे श्रीफल होय !! तुमच्या यज्ञाचे तुम्हाला कोणतेही फळ मिळणेही लोकांनी कसे शिताफीने टाळले पहा ..असा अर्थ आहे शेराचा

असो
धन्यवाद