पुसटशी कल्पना सुद्धा नसावी त्या बिचा-याला!

Submitted by profspd on 21 June, 2014 - 00:16

पुसटशी कल्पना सुद्धा नसावी त्या बिचा-याला!
उद्या निखळायचे आहे चमकत्या ह्याच ता-याला!!

बुडालो मी परंतू हे न थोडे थोडके आहे.....
कलेवर लागले माझे सखे, तुझिया किना-याला!

अरे, ही भिंगरी पायात जन्मापासुनी आहे....
कधी ठरलाच नाही पाय हा माझा निवा-याला!

किती हे लोक अज्ञानी, अडाणी, काय बोलावे?
पहा ते दावणीला बांधती साक्षात वा-याला!

चिमुटभर राहते काही तरी गझलेत कमतरता.....
पकडता येत नाही रे, कधी चिमटीत पा-याला!

कडाका हा तुझ्या विरहातला मी सोसतो आहे....
गुलाबी सर्व मी स्मरणे तुझी, घेतो उबा-याला!

कशी त्याची सुटावी सांग, ही दारू बिचा-याची?
सकाळी, रामप्रहरी लागतो खंबा उता-याला!

कशी ती खेचते दारू, विचारा दारुड्याला त्या....
कसे हे हात शिवशिवती, विचारा त्या जुगा-याला!

म्हणालो दोस्त ज्यांना ते कधीचे सोडुनी गेले....
स्वत:ची सावली उरली अखेरीला सहा-याला!

अचानक यायची ठरलीस तू, भांबावुनी गेलो....
कसे मी सावरू मजला? कुठे ठेवू पसा-याला?

नसे पाऊसपाणी, शेत हे ओसाड पडलेले....
कळेना काय मी देऊ गुरांना आज चा-याला?

अरे, तो रोज तळहातावरी विस्तव हसत घेतो....
कधी वाटेल का भीती निखा-यांचीच झा-याला?

नभी दाटी न मेघांची, वनी ना नाच मोरांचा....
कुणाची लागली रे, दृष्ट मोराच्या पिसा-याला!

बुडाली सर्व ती चोवीस पोरे पाच मिनिटातच.....
नदीने वेळही नाही दिला कुठल्या इशा-याला!

कसा मी सांग कंटाळेन लिहिताना गझल, गाणी?
कसा येईल पूजेचाच कंटाळा पुजा-याला?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसा येईल पूजेचाच कंटाळा पुजा-याला?<<
ही आणि अश्या अनेक ओळी आवडल्या अनेक शेरही आवडले
स्मायलीही आवडले