आठवतंय??...

Submitted by झुलेलाल on 19 June, 2014 - 00:34

आठवतंय ना तुला,
त्या चंद्रभारल्या रात्री
काठावरल्या चांदणशिंपणात
चिंब ओथंबलेला
तुझा कृष्ण कुंतलभार
निळ्या तळव्यावर सावरताना,
चांदण्याची कशी सैरभैर
घालमेल सुरू होती?
... थकलेला चंद्र ढगाआड दडला
आणि अंधाऱ्या रात्रीचे
उदासवाणे उसासे झेलताना
निष्पर्ण झाडांची वठलेली खोडं
वेडीपिशी होऊन जडावली...
आठवतंय ना तुला,
त्या चांदण्या रात्री
तळ्याकाठचा कोवळा रोमांच
लेऊन तू घरी परतलीस
आणि शिणलेल्या पापण्या
जडशीळ होऊन तुझ्या
गालावर विसावू लागल्या ,
सूर्याच्या तप्तकिरणांचा
स्वप्नाळ आभास कसा
अचानक अंगांगावर
चढवून पिसे गेला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users