'हसत खेळत स्पोकन इंग्लिश' शिकवण्यासाठी स्वयंसेवक शिक्षक हवेत! (वर्ष २०१४-१५)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 June, 2014 - 07:20

''केल्याने होत आहे रे...'' ह्या उक्तीनुसार गेल्या वर्षी आपल्या काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन पुण्याच्या बुधवार पेठ येथील रेड लाईट एरियामधील नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयात 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश'चे वर्ग घ्यायला सुरुवात केली. हे विद्यालय परिस्थितीने निम्नवर्गीय व रेड लाइट एरियातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे कार्य करते. ऑगस्ट २०१३ पासून सुरु केलेल्या 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश' ह्या उपक्रमाला मायबोलीकरांच्या माध्यमातून मिळालेले स्वयंसेवक शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

काय करतो आपण ह्या उपक्रमात?

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण देणार्‍या या शाळेतील मुलामुलींना इंग्लिशबद्दल अजिबात आत्मविश्वास नव्हता. मग त्या भाषेची गोडी वगैरे तर फार दूरची गोष्ट! मुळात या रेड लाईट एरियातील मुलांची मातृभाषा मराठी, कन्नड, तेलुगू, नेपाळी, हिंदी वगैरे... शाळेखेरीज त्यांना इतर कोठे इंग्रजी ऐकायला, लिहायला, वाचायला मिळण्याची संधीही दुर्मिळ, किंबहुना नाहीच! अनेकांना 'घर' म्हणावे असे घरही नाही किंवा घरात शिक्षणास पोषक वातावरण नाही. [या संबंधातील भेट सावली संस्थेच्या मुलांशी! हा लेख अधिक माहितीसाठी अवश्य वाचा.] अशा वेळी खेळ, गाणी, गप्पा, गोष्टी व वेगवेगळ्या युक्त्या वापरून त्यांना इंग्लिश भाषेबद्दल रुची वाटावी, त्यांना इंग्रजीचा अभ्यास करणे सोपे जावे, वाचनाबद्दल गोडी निर्माण व्हावी व इंग्लिशमधून बोलताना आत्मविश्वास वाटावा - भीती वाटू नये, ह्यासाठी आपले स्वयंसेवक शिक्षक मेहनत घेतात. मुलांना आत्मीयतेने, प्रेमाने व तळमळीने शिकवतात. एकदा का मुलांना आपल्या या शिक्षकांबद्दल विश्वास वाटू लागला की तीही ह्या मेहनतीला प्रतिसाद देऊ लागतात. अर्थातच दर पावलाला आव्हान असते आणि या मुलांची परिस्थिती दर दिवशी बदलत असते. त्यामुळे त्यांची मनस्थिती जाणून घेऊन त्यांना प्रेमाने, आपुलकीने शिकविणारे शिक्षक मिळाले की मुलेही खुलत जातात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे.

शाळासंचालक व मुख्याध्यापकांच्या खास विनंतीवरून या वर्षीही (शालेय वर्ष २०१४ - २०१५) आपण हा उपक्रम चालू ठेवण्याचे ठरविले आहे. शाळेतील मुलांना या वर्गांचा खूप फायदा होतो आहे असे तेथील शिक्षक व मुख्याध्यापक मनमोकळेपणाने सांगतात. आधीच्या वर्षी शाळेत शिकवणारे आपले काही स्वयंसेवक शिक्षक या वर्षीही असतील. पण आपल्याला हवे आहेत आणखी स्वयंसेवक, जे आपला वेळ व कौशल्य ह्या शाळेतील मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी द्यायला तयार आहेत.

दर शनिवारी (शाळेच्या सुट्ट्या वगळून) साधारण एक ते सव्वा तास या शाळेतील मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी आपल्याला आणखी स्वयंसेवक हवे आहेत.

तुम्ही जर वेळ देऊ शकत असाल तर मला किंवा मायबोलीकर साजिरा यांना आपले खरे नाव, मायबोली आयडी, मोबाईल/ दूरध्वनी क्रमांक, इमेल हे संपर्कातून कळवू शकलात तर त्यानुसार लगेच आपल्याशी संपर्क साधता येईल.

वर्ग कधीपासून, कोठे, किती वाजता?

ह्या वर्षीचे स्पोकन इंग्लिश क्लासेस दिनांक ५ जुलै (शनिवार) पासून सुरु होत आहेत.
क्लासची वेळ : दुपारी साधारण सव्वा अकरा - साडेअकरा ते साडेबारा अशी असते. (दुपारी ११:१५ ते १२:३०)
संपूर्ण शालेय वर्षासाठी दर शनिवारी हे वर्ग असतील. (शाळेच्या सुट्ट्या वगळून) ह्या खेपेसही आपले दोन स्वयंसेवक शिक्षक प्रत्येक वर्ग सांभाळतील. (इयत्ता १ली ते ७वी)
ह्याचा फायदा असा की, एखादा स्वयंसेवक शिक्षक काही कारणामुळे गैरहजर असेल तरी तिच्या/ त्याच्या अनुपस्थितीत वर्गातील शिकविणे चालू राहते. त्यात खंड पडणार नाही.

शाळेचा पत्ता : नूतन समर्थ प्राथमिक विद्यालय, ८९८, बुधवार पेठ, विजयानंद टॉकिज जवळ, सिटी पोस्टाचे जवळ, पुणे २. (सोन्या मारुती चौकाजवळ, चेतना लॉजचे जवळ)

नवे - जुने गडी, पण नवाच डाव!

या वर्षीची आपली स्वयंसेवक शिक्षक टीम : साजिरा, मुग्धमानसी, शकुन, समीर देशपांडे, आर्या, निकिता.

यंदा अगोदरच्या टीममधील पाच शिक्षक त्यांच्या वैयक्तिक कमिटमेन्ट्समुळे या वर्षी येऊ शकणार नाहीत.

मायबोलीकर नानबा व सायली या दोघींची या टीममध्ये नुकतीच भर पडली आहे. निकिताची मैत्रिण सई देखील सामील होणार आहे. पण तरीही या खेरीज ४ ते ५ स्वयंसेवक शिक्षक हवे आहेत.

आपल्याला इच्छा व वेळ असेल आणि या उपक्रमात सामील होण्याची तयारी असेल तर आपले इथे स्वागतच आहे. आम्हाला (मला किंवा साजिराला) नक्की संपर्क साधा व आपले नाव कळवा.

ह्या अगोदरचे या विषयावरील धागे :
http://www.maayboli.com/node/48317
http://www.maayboli.com/node/43787

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला शनिवारी सुट्टी नसते त्यामुळे माझा या ही वर्षी पास... पण उपक्रमास अनेकानेक शुभेच्छा Happy

याही वर्षी बघतो माझ्या मित्रमंडळातील कोणाला जमू शकेल काय ते!

इच्छुक मंडळींनो : काही कारणास्तव प्रत्येक महिन्यात सगळे शनिवार वेळ देउ शकत नसाल तरी हरकत नाही. प्रत्येक वर्गावर २ स्वयंसेवक असावेत असा प्लॅन आहे त्यामुळे एका आड एक शनिवार वर्ग घेता येतील.

आमच्या या शाळेत शिकवायला सुरुवात करा. इतकी मजा येते आणि समाधान मिळतं की शनिवारी सकाळी इतर काही प्लॅन करावसा वाटतच नाही. Happy

सॉरी अकुताई, यावेळेस शनिवारी वैयक्तिक कामांचे अड्थळे असल्याने स्पोकन इंग्रजीच्या वर्गासाठी शिकवायला येऊ शकत नाही.

मलाही शनिवारी ऑफिस असते Sad पण ओळखीचे कुणी उपलब्ध आहे का ते पाहून विचारून नक्की सांगते.
खुप खुप शुभेच्छा!!

मला सप्टेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जमणे अवघड आहे, पण त्यानंतर शक्य होईल.
शिकवण्याच्या बाबतीत माझे पेशन्स थोडे कमी आहेत. पण ह्या कमतरतेवर मात करण्याची जबरदस्त इच्छाही आहे.
आधी ज्यांना अनुभव आहे त्यांनी थोडे मार्गदर्शन केले तर माझी तयारी आहे.
(अर्थात, सप्टेंबर १५ तारखेनंतर चालणार असेल तर)

-चैतन्य

ह्यावर्षी नाव देणार नाही Sad गेल्या वर्षी नंतर नंतर ऑफिसमुळे खंड पडत गेला.
पण जे भाग घेतील त्यांना खूप शुभेच्छा! माझा एक मित्र सहभागी होऊ इच्छितो, त्याची माहिती तुला लवकरच इमेल करेन अकु. Happy

मी सध्या इकडे बसुन काही करु शकत नाही. फार हळहळ वाटते.
या शाळेला दिलेली भेट हा माझ्यासाठी अतिशय मोलाचा अनुभव होता.

सध्या फेसबुकावर याचना केली आहे.
मी अजून काही करु शकत असले तर नक्की कळवा कृपया.

सर्वांना धन्यवाद!

चैतन्य, १५ सप्टेंबर नंतर? हो, चालू शकेल. संपर्कातून इमेल, फोन इत्यादी कळवून ठेवशील का प्लीज?

शैलजा, ओक्के.

रैना, सुजा, थँक्स!

मुलांना या वर्षी इंग्रजी शिकताना आणखी गंमत येईल असे वाटते. एका मायबोलीकरणीने वर्षभराचे 'मॅजिक पॉट' इंग्रजी बालसाप्ताहिकाचे सदस्यत्व शाळेला घेऊन दिले आहे. एका स्वयंसेवक शिक्षिकेने सुंदर सुंदर चित्रांची काही डिस्ने मासिके जमवली आहेत. बालमित्रचे अंकही जमवित आहोत. आणखी एकांनी प्राणी, फळे, विरुद्धार्थ वगैरेंची रंगीबेरंगी फ्लॅश कार्ड्स मुलांना शिकवण्यासाठी भेट दिली आहेत. आता ह्या सर्व सामग्रीनिशी मुलांना शिकवायला शिक्षकांनाही मजा येणार आहे! Happy

सगळ्या स्वयंसेवकां ना भेटून मस्त वाटलं ! त्यांचे अनुभव ऐकताना 'फ्रीडम राईटर्‍स डायरी ' ची आठवण येत होती.

एक्सायटेड टू वर्क विथ यू ऑल!

नानबा Happy

जाई., सहेली, थँक्स.

सई, त्यांच्या फोनची वाट पाहते आहे. Happy

सायली, येस्स.

दिनांक २३ जुलै ते २५ जुलै या कालावधीत बालगंधर्व कलादालनात या आपल्या स्पोकन इंग्लिश वर्गात शिकणार्‍या नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन आहे.
वेळ : सकाळी ९ ते रात्री ९.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी काल खास फोन करून सर्व मायबोलीकरांना आमंत्रण दिले आहे.
सर्वांनी अवश्य भेट द्या!! Happy

मागच्या वर्षी शाळेत शिकवताना खूप मजा आली. ह्यावर्षी काही कारणांमुळे जमणार नव्हत. पण शाळेतल्या मुलांची, तिथल्या शिक्षकांची आठवण येते. चित्रप्रदर्शनाला गेले होते, तेव्हा सगळी मुलं भेटली. फार छान वाटलं.
ह्यावर्षीचा उपक्रम चांगला चालू असेल, ह्याची खात्री आहे. पण ताजा वृत्तांत कळेल का?

अनया, कळेल, कळेल. Happy आम्हांलाही तुझी खूप आठवण येते. मुलांना तर नक्कीच येत असणार!

शाळा सध्या दिवाळीच्या सुट्टीमुळे बंद आहे. पण दिवाळीची सुट्टी लागण्याअगोदर एक दिवस शाळेत फराळ व एका संयुक्तेने दिलेल्या देणगीतून घेतलेल्या नव्या ड्रेसेसचे व संस्थेने उर्वरित मुलांना घेतलेल्या दिवाळीसाठीच्या कपड्यांचे वाटप झाल्यामुळे मुले खूपच आनंदात होती! Happy

मध्यंतरी आपल्या स्वयंसेवी शिक्षकांच्या टीममधील मुक्ता सेतु संस्थेतर्फे अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागातील मुलांना विज्ञानाचे प्रयोग दाखवण्याचे प्रशिक्षण घेऊन आली. तिने मग आपल्या नूतन समर्थ शाळेत मुलांना त्यातले बरेच प्रयोग करून दाखवले, मुलांना साधने हाताळायला दिली, विज्ञान प्रयोगातून रंजक गोष्टी कशा बनवता येतात ते सप्रात्यक्षिक दाखवले. मुले जाम खुश!! Happy
आता ती अरुणाचलवरून परत आली की जरा तपशीलवार प्रात्यक्षिके दाखवेल व मुलांना अरुणाचल प्रदेशात काम करताना मिळालेले अनुभवही ऐकवेल असे म्हणाली आहे.

बाकी दर शनिवारी आपले स्पोकन इंग्लिशचे वर्ग नेहमीप्रमाणे चालू असतात. गणेशोत्सवाच्या काळात सुट्ट्या, मुलांची अनुपस्थिती व आजूबाजूचे आवाज - गर्दी यांमुळे वर्ग घेता आले नाहीत. पण बाकीच्या वेळी स्वयंसेवक शिक्षक आपापले व्याप सांभाळून हौसेने येऊन मुलांना मोठ्या उत्साहाने शिकवतात. Happy

तू जॉईन व्हायचे काही प्लॅन्स? किंवा एखाद्या शनिवारी मुलांना भेटायला नुसतीही येऊन जा ना!

अकु, सविस्तर बातमी कळवल्याबद्दल आभार. परत सुरू करायला नक्की आवडेल, पण अजून काही दिवस दर शनिवारची जबाबदारी घ्यायला नाही जमणार. एखाद्या शनिवारी नक्की चक्कर टाकेन. प्रदर्शनाला आले होते, तेव्हा माझ्या वर्गातल्या मुलांनी ‘दिदी एकदा तरी या’ असं आमंत्रण दिलं आहेच!

मुक्ता छान काम करते आहे. कीप इट अप, मुक्ता!!