माझी-तिची संभाषणे..

Submitted by रसप on 15 June, 2014 - 23:55

तू बालमन आहेस अन् हातातले मी खेळणे*
मर्जीप्रमाणे खेळलो तर ठीक, अथवा तोडणे

माझी-तिची संभाषणे बस्स् भांडणाची कारणे
ती टाळल्याचे बोलता मी बोलण्याचे टाळणे

असतात काही सांडलेले शब्द माझ्याभोवती
ज्यांना कधी ओळींमधे जमलेच नाही मावणे

ह्या जीवघेण्या शांततेला तोड जाताना तरी
जपण्यास दे जखमा उरी, इतकेच आहे मागणे

ओथंबल्या डोळ्यांत पाणी अडवणे सोपे नसे
ढगही जिथे भरतो तिथे नक्कीच असते सांडणे

भडिमार वेळेचा तुझा थोडाच थांबव, जीवना
जगलो कधी जे दोन क्षण राहून गेले वेचणे

'टेरेसवाले घर हवे' शहरात आहे मागणी
गावात त्यांच्या पसरली ओसाडलेली अंगणे

....रसप....
१४ जून २०१४

(* - हा शेर/ मतला वैभव कुलकर्णी (वैवकु)च्या 'खेळणे' कवितेसाठी. Happy )
http://www.ranjeetparadkar.com/2014/06/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी-तिची संभाषणे बस्स् भांडणाची कारणे
ती टाळल्याचे बोलता मी बोलण्याचे टाळणे

असतात काही सांडलेले शब्द माझ्याभोवती
ज्यांना कधी ओळींमधे जमलेच नाही मावणे<<< शेर आवडले.

संभाषणे सांडलेले शब्द आणि ओथंबलेले डोळे हे तीन फार आवडले

नामोल्लेखासाठी विशेष आभार खेळणे ह्या शब्दवरूनच मला क्लिक झालं ते Happy

असतात काही सांडलेले शब्द माझ्याभोवती
ज्यांना कधी ओळींमधे जमलेच नाही मावणे

'टेरेसवाले घर हवे' शहरात आहे मागणी
गावात त्यांच्या पसरली ओसाडलेली अंगणे

दोन्ही शेर छान आहेत.

माझी-तिची संभाषणे बस्स् भांडणाची कारणे
ती टाळल्याचे बोलता मी बोलण्याचे टाळणे>>> व्वा...व्वा....

तू बालमन आहेस अन् हातातले मी खेळणे*
मर्जीप्रमाणे खेळलो तर ठीक, अथवा तोडणे..

नात्याचा अगदी महत्वाचा लेखाजोखा !
गझल आवडली रसप.

छानच