रस्ता तुझ्या घराशी कुठलाच जात नाही

Submitted by जयदीप. on 15 June, 2014 - 04:49

पाऊस साठलेला जेव्हा पडून घेतो
कोणी लपून घेतो कोणी भिजून घेतो

माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही
जितके मिळेल तितके आता हसून घेतो

रस्ता तुझ्या घराशी कुठलाच जात नाही
रस्ता वळेल तिकडे हल्ली वळून घेतो

वादळ बनून येतो सगळ्यांसमोर आता
उसने हुरूप वारा माझ्याकडून घेतो

हल्ली तुझ्या वयाचा अंदाज येत नाही
मी आरशात बघतो तेव्हा म्हणून घेतो

साखर मला म्हणाली होतीस का कळाले
पाणावतेस डोळे, मी विरघळून घेतो!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वादळ बनून येतो सगळ्यांसमोर आता
उसने हुरूप वारा माझ्याकडून घेतो<<< वा वा

खालील ओळी, स्वतंत्रपणेही आवडल्या.

माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही<<<

रस्ता वळेल तिकडे हल्ली वळून घेतो<<<

हल्ली तुझ्या वयाचा अंदाज येत नाही<<<

सुंदर गझल..
सगळेच शेर कमी-जास्त प्रमाणात आवडलेत. पण 'वळून' आणि 'हसून' फारच खास.

वाऱ्याचा शेरही खूप मस्त. त्यात हुरुपाचं अनेकवचन का केले आहे ?

छान

>>
हल्ली तुझ्या वयाचा अंदाज येत नाही
मी आरशात बघतो तेव्हा म्हणून घेतो
<<
मस्त! Happy

वार्‍याचाही आवडला.
छान गझल.