प्रत्ययांचे अंतरी भांडार आहे!

Submitted by profspd on 13 June, 2014 - 09:33

प्रत्ययांचे अंतरी भांडार आहे!
सुख कमी, पण दु:ख भारंभार आहे!!

गोड मी मानून घेतो प्रत्ययांना.....
वाटते जगणे किती चवदार आहे!

याचसाठी गझल माझी म्यान करतो....
माझिया शब्दांस आली धार आहे!

तू जरा हाताळ बेतानेच मजला....
ढाल नाही, मी अरे, तलवार आहे!

मैफलीमध्ये न कुठल्या मावलो मी....
वाकडातिकडा म्हणे आकार आहे!

आज कळते का न मी चालत कुठेही.....
एक मी नाणे तुझे कलदार आहे!

जिंदगीशी झुंजताना प्राण गेले.....
खानदानी तो खरा झुंजार आहे!

अर्थ मुद्रेचा तुझ्या कळलाच नाही.....
मी समजलो की, तुझा होकार आहे!

जाहली चोरी, पुरावा मागती ते.....
चोरट्यांनी पाडले खिंडार आहे!

ईश्वरा आता नको देऊस काही.....
तू दिले जे आजवर ते फार आहे!

आज साधे चालताही येत नाही.....
वाटतो माझाच मज का भार आहे?

नोकरी धरली सरळ मी शेवटाला.....
कोणता जमला मला व्यापार आहे?

मुक्तहस्ताने जगाला देत गेलो.....
शायरीचे एक मी कोठार आहे!

या हयातीतच मिळू दे हे बघाया....
स्वप्न माझे जाहले साकार आहे!

आसवांशी जाहला माझा घरोबा.....
वळचणीचा एक तो शेजार आहे!

गझललेखन आजही जोमात चालू.....
हाच निवृत्तीतला आधार आहे!

गर्भश्रीमंती जरी ही शायरीची......
लौकिकार्थी मी तसा नादार आहे!

आडल्या नडल्यास ना पर्याय दुसरा....
मी कराया लागलो जोहार आहे!

राहिला माझ्या घरी पाऊस कारण.....
घर जरी छोटे तरी टुमदार आहे!

तू दिलेला घाव मजला फूल वाटे.....
वार तू केला किती अलवार आहे!

झेल माझा घ्यायला धजवे न कोणी......
मी असा चौकार अन् षट्कार आहे!

लागली साठी, सुरू वार्धक्य माझे.....
मी अता गुंडाळला विस्तार आहे!

सोडला नाही सरळ रस्ता कधी मी.....
तोच माझा एक उरला यार आहे!

जाहली लग्नास रे छत्तीस वर्षे....
चालला झोकामधे संसार आहे!

माफ केले त्यास मी मोठ्या मनाने......
तो भले गद्दार, मी दिलदार आहे!

काकडे झाले न अब्रूचे कधीही.....
भामट्यांचे सोंग अब्रूदार आहे!

अस्मिता, अब्रू कुठे उरलीच आता.....
आज जो तो जाहला लाचार आहे!

शिक्षणाचे चौकडे झाले महर्षी......
शिक्षणाचा जाहला बाजार आहे!

चोख सोने कोणते, कुठला मुलामा?
त्यास कळते, तो अरे सोनार आहे!

या उपेक्षेचे खरे कारण कळाले.....
मी भटांचा वाटतो अवतार आहे!

भरजरी जात्याच आहे गझल माझी.....
भावनांची त्यामधे जरतार आहे!

स्पंदते गझलेमधे माझ्या चराचर.....
अंतरंगी माझिया ओंकार आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू जरा हाताळ बेतानेच मजला....
ढाल नाही, मी अरे, तलवार आहे!

आवडला शेर.

मैफलीमध्ये न कुठल्या मावलो मी....
वाकडातिकडा म्हणे आकार आहे!

या शेरासाठी

घोळक्याने कत्ल होतो बातमी ही ऐकलेली
हे कसे झाले कळेना, घोळक्याने गझल केली.

घोळक्यात जाऊ नका.

शिक्षणाचे चौकडे झाले महर्षी......
शिक्षणाचा जाहला बाजार आहे!

हाच एकमेव आवडला. चांगला शेर.

(बाकी उर्वरित शेर वाचण्यात वेळ फुकट व्यर्थ खर्च झाल्याचा पश्चातापही आहे)

नोकरी धरली सरळ मी शेवटी.....<<< भटांच्या अवताराकडून वृत्तभंग अपेक्षित नाही. Happy

३२शेरांमधील एका शेरातील चूक बरोबर ओळखली....दुरुस्त केली आहे!
टीप: काल माझ्या लग्नाचा ३६वा वाढदिवस होता! १३जून १९७८रोजी वयाच्या २३व्या वर्षी विवाह झाला!

(जाहली लग्नास रे छत्तीस वर्षे....
चालला झोकामधे संसार आहे!)

मनःपूर्वक अभिनंदन प्राचार्यसाहेब. आपण व आपल्या सौभाग्यवतींच्या वैवाहिक जीवनाची पुढील छत्तीस वर्षेही अशीच सुखासमाधानात जावोत ही प्रार्थना! Happy