पोरट्यांचा केवढा लडिवाळ रुसवा!

Submitted by profspd on 12 June, 2014 - 12:00

पोरट्यांचा केवढा लडिवाळ रुसवा!
लाड पुरवा, मात्र बेतानेच पुरवा!!

मागच्या जन्मात हलवाई असावा....
बोलणे इतके मधुर, साक्षात हलवा!

भोवतीचे लोक कावेबाज सारे....
तू मनाने केवढा आहेस हळवा!

भरकटावे का असे त्याच्यामुळे तू?
तू सुखांचा ओळखाया शीक चकवा!

तू नको जाऊस प्रतिमेवर तुझ्याही....
आरसाही कैकदा असतोच फसवा!

चांगलेही मार्ग रे, आहेत येथे....
मद्य घेण्यानेच जातो काय थकवा?

सूट घेणे माझिया पिंडात नाही....
होय, मी आहेच शायर एक कडवा!

लावता आलेच नाही बूच केव्हा....
बाटली असते उभी, मी मात्र अडवा!

काय तो शिंपी तरी करणार सांगा....
माप माझे बदलते..टाचा नि उसवा!

दूर जावे लागते सोडून घरटे......
ऊब घरट्याची उरी आताच मुरवा!

रोजच्या जगण्यातही आनंद असतो.....
वेचुनी तो जिंदगानीलाच खुलवा!

शिकवते प्रत्येक अपुली चूक काही.....
मात्र त्यासाठी धडे दररोज गिरवा!

ही मन:शाती कुठे मिळते विकत का ?
आपल्या ती आत असते, तीच टिकवा!

दिवस माझा सर्व आनंदात जातो....
शेर एखादाच मी लिहिताच बरवा!

या कवीसंमेलनांची गरज नाही.....
चक्क एकांतातही मैफील भरवा!

पाहिजे इच्छा शिकायाची मनाची.....
जे शिकू बघतात त्या लोकांस शिकवा!.....

आपल्या हातात असते फूल होणे.....
आपली आपण स्वत:ची बाग फुलवा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users