हे असे जीवास नाहक जाळणे नाही बरे!

Submitted by profspd on 12 June, 2014 - 01:35

हे असे जीवास नाहक जाळणे नाही बरे!
वेदना रातंदिनी कुरवाळणे नाही बरे!!

काळ गेलेला कुठे माघार फिरतो का कधी?
भूतकाळातच असे रेंगाळणे नाही बरे!

मोह आकर्षक भलेही, मृगजळे असतात ती....
जो असे आभास, त्यावर भाळणे नाही बरे!

साधनेने लाभते सिद्धी, प्रसिद्धी गौण रे....
हे प्रसिद्धी भोवती घोटाळणे नाही बरे!

शीक ठेवायास अंतर वाजवी तू नेहमी....
टाळणे नाही बरे, कवटाळणे नाही बरे!

बघ सरळ डोळ्यांमधे, मग बोल जे बोलायचे....
नजर कोणाची असू दे, टाळणे नाही बरे!

कैक गुपिते काळजाची नोंदली असतील रे....
डायरी चोरून ऐशी चाळणे नाही बरे!

मान्य की, जुळणारही नाहीत तारा आपल्या....
पण कुणालाही असे हेटाळणे नाही बरे!

ना दुखवताही कुणा नाकारता येतेच की,
एकदम कोणासही फेटाळणे नाही बरे!

लोचनांचे हे धरण इतके भरू देऊ नये....
भार अश्रूंचा असा सांभाळणे नाही बरे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users