आवाज एक दिनरात पुकारत आहे!

Submitted by profspd on 9 June, 2014 - 13:58

आवाज एक दिनरात पुकारत आहे!
हृदयात माझिया कोण भरारत आहे?

मी नाही कोठे, कुठे नावही माझे.....
माझ्या थडग्यावर उभी इमारत आहे!

भट गेल्यावरती काय काय बघतो मी.....
सोम्यागोम्याही किती फुशारत आहे!

गळफास घेउनी शेतकरी तो गेला.....
अद्याप मात्र ते शेत थरारत आहे!

तू आत माझिया, मला न कळले केव्हा....
मी अजून पत्ता तुझा विचारत आहे!

मी भिडस्त होतो, अता तसा मी नाही....
जे जे ना पटते, सरळ झुगारत आहे!

माझ्याच भल्यासाठी सगळे हे झाले...
हे कळते...का तू मला नकारत आहे!

शेवटी मला पाहून पानगळ गेली....
एकटा मीच आतून फुलारत आहे!

राखेमधुनी सुद्धा उठलो, नभ साक्षी....
स्वप्नांचा प्रासाद मी उभारत आहे!

थोडे ना थोडके बदलतो मी आता....
हळू हळू पण, चुका मी सुधारत आहे!

काळजात झरते अंधुक अंधुक काही....
गझलेत तेच मी आज चितारत आहे!

जोडून हात होतात सर्व कामे पण....
का जो तो येथे हात उगारत आहे?

पाहून खेळखंडोबा आयुष्याचा....
वाटते जिंदगी एक शरारत आहे!

लावण्य तुझे दवबिंदूंसम चमचमते.....
पाहून तुला मी चक्क दवारत आहे!

का शेतकरी जातात सुळावर येथे?
कृषिप्रधान नुसता म्हणती भारत आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाहून खेळखंडोबा आयुष्याचा....
वाटते जिंदगी एक शरारत आहे!<<< व्वा