म्हणून म्हणतो आमच्यामधे भांडण नाही!

Submitted by profspd on 9 June, 2014 - 09:23

म्हणून म्हणतो आमच्यामधे भांडण नाही!
भांडायाला कुठले उरले कारण नाही!!

कधीच गेला निखळून अरे, तारा माझा....
माझ्यासाठी उरले हे तारांगण नाही!

चंद्र तोच, चांदणे तेच, पौर्णिमा तीच ही....
मी एकाकी कारण माझा साजण नाही!

कसे ओळखू कलेवराला नसे चेहरा....
पायांमध्ये सुद्धा दिसले पैंजण नाही!

कितीक उरले कनवटीस या श्वास कळेना....
मला कुणीही केव्हा केले औक्षण नाही!

कधी मेघ आले अन् गेले कळले नाही....
दारी माझ्या आता थांबत श्रावण नाही!

स्वभाव माझा भिडस्त आहे, काय करू मी......
गैरसोय झाली पण म्हटले अडचण नाही!

चमचमणारे खडेच बसले मखरांमध्ये.....
हिरा असा मी ज्याला कुठले कोंदण नाही

उरात माझ्या शिलालेख दु:खांचा आहे!
पुसण्याजोगे हे कुठलेही गोंदण नाही!

होते नव्हते ते सारे मी दिले जगाला....
माझ्यापाशी आता कुठले तारण नाही!

सगळे काही मंगल झाले घरात माझ्या....
कधी घराला बांधलेच मी तोरण नाही

ठिसूळ झाली हाडे, कुरबुर करते काया.....
वयास या माझ्या कुठलेही वंगण नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन दिवस प्रोफेसरांची गजल दिसली नाही तर मला वाटले की बंद केले त्यांनी मायबोली वर भडीमार करणे. पण हाय रे दैवा..... आलीच आज नविन गजल.