इभ्रतीची लक्तरे

Submitted by निशिकांत on 9 June, 2014 - 02:59

काय लपवायास उरले? वापरू का चेहरे?
चावडीवर टांगलेली इभ्रतीची लक्तरे

चेहरा डागाळलेला, आरसा पुसतो तरी
सत्त्य लपलेले प्रकटता, का भरावे कापरे?

जीत माझी ! हारल्यावर पोषणाचा दोष तो
मायबापांच्याच माथी फोडता का खापरे?

वाकली पेलून जनता यक्षप्रश्नांना शिरी
गोठल्या नजरा बघोनी मृगजळी सत्तांतरे

का अपेक्षा बाळगावी? मार्ग दावावा कुणी
निर्मितो प्रश्नास अन् मी शोधतोही उत्तरे

का उद्याच्या काळजीने "आज" गमवावा उगा?
सांजवेळी काळजीविन शांत निजती पाखरे

कायदा फसवा करोनी हक्क अन्नाचा दिला
तरतुदीतुन चोर खाती तूप, साखर, खोबरे

शोधता आदर्श विभुती, भेटला अंधार का?
पुस्ताकातिल माणसांची तळपली संवत्सरे

वेदनांशी गाढ मैत्री केवढी "निशिकांत"ची?
पाहुनी दु:खोत्सवाला, लोक म्हणती "बाप रे!"

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users