खोटारडेपणाची येते अता शिसारी!

Submitted by profspd on 5 June, 2014 - 03:13

खोटारडेपणाची येते अता शिसारी!
ना औषधास सुद्धा उरली इमानदारी!!

मरतात लोक हल्ली मुंग्या-किड्यांप्रमाणे.....
घेतो कुणी सुपारी, देतो कुणी सुपारी!

झुळकत असेल बहुधा ती आसपास माझ्या.....
बघ चांदणेच पडले साक्षात भरदुपारी!

झालो अखेर मीही जेव्हा हुशार तेव्हा....
ना चालली कुणाची माझ्यापुढे हुशारी!

या धावत्या पिढीच्या नशिबात काय आहे?
उरली न माणसेही भवितव्य सांगणारी!

एकच जखम परंतू आजन्म राहिली ती....
केलास वार जो तू मज लागला जिव्हारी!

डोळे मिटायला मी आता तयार आहे....
झाले हिशेब चुकते, कुठलीच ना उधारी!

या काळजात माझ्या देऊळ विठ्ठलाचे....
मी एक फक्त साधा त्याचा असे पुजारी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users