काय या, उपयोग आहे, छप्पराचा?

Submitted by profspd on 4 June, 2014 - 12:18

काय या, उपयोग आहे, छप्पराचा?
फक्त सांगाडाच उरलेला घराचा!

दूध पातेल्यातले अदृश्य होते.....
येत ना पदरव कधीही मांजराचा!

याचसाठी कारणे नाही पुसत मी....
लोक हल्ली कावळा करती पराचा!

जन्मभर आर्ती तुझी करणार आहे.....
जन्म तू मजला दिलेला कापराचा!

गाय हंबरते दिशेला कोणत्या अन्.....
भिरभिरे हा जीव कोठे वासराचा!

केवढी आवड तुला आहे नभाची.....
जन्म घे तू एकदा त्या पाखराचा!

तू असे काही दिले वरदान मजला....
फायदा काहीच नाही त्या वराचा!

थांबला ऊला मिळायालाच सानी.....
शोध माझ्यातील घेतो अंबराचा!

रोषणाईच्या, अमीरीच्या जगी या....
दाबला आवाज जातो पामराचा!

माणसासम फक्त तो दिसतो परंतू.....
मांडतो उच्छाद अगदी वानराचा!

आठवे आई तुझ्या ती हातची चव.....
बायको करताच हलवा गाजराचा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बयको करताच हलवा गाजराचा <<< संभ्रमात पाडणारी ओळ हलवा बायकोसाठी असावा असा अर्थ लागतो आहे (करता हा करिता सारखा वापरल्यास )

रोषणाईच्या शेरात तिमिराचा असा शब्द सूट व्हावा पण काफियानुसारित्व दिसले त्यामुळे शेर पहिजे तसा पोचत नाही आहे

ऊला हा शब्द मी तरी आजवर उला असाच पाहिलाय (उ र्‍हस्व )

आर्ती << अजिबातच आवडली नाही ही तडजोड .आरती असा शब्द तुम्हाला वृत्तात बसवता आला असता असे वाटते

असो
उला-सानीच्या शेरावरून बेफीजींचा एक शेर आठवला
पण असो !!

जन्मभर आर्ती तुझी करणार आहे...<<<

आर्ती म्हणजे आरती का? तसे असेल तर आरतीसाठी आर्ती हाही शब्द चालतो हे कुठे लिहिले आहे ते संदर्भासहित द्याल का?

ऊला??????

उला असे मी एका ठिकाणी वापरले होते तेव्हा माझ्या उर्दू गझल लिहिणा-या सिनिअर स्नेह्याने हा शब्द ऊला असा आहे हे सांगितले म्हणून इथे मी ऊला असे लिहिले! उला लिहिणे फारसे अवघड नव्हते!

आर्त.....आर्ती.....तीव्र इच्छा

कापूर आला म्हणून आरती ओवाळणे आलेच पाहिजे हा भाबडा समज इथे दिसून येतो!

आरती शब्द माहित नसणे व तो वृत्तात न बसविता येणे केवळ अशक्य!

बायको गाजराचा हलवा करताच, आई तुझ्या हातची ती चव आठवते
कुठे चुकलेले वाटते ?

रोषणाईच्या, अमीरीच्या जगी या....
दाबला आवाज जातो पामराचा!

पामर म्हणजे तेजोहीन/क्षुल्लक/नीच/दुर्बल/क्षूद्र/ .....या अर्थांच्या छटा आहेत!

या शेरात रोषणाई, अमीरी ही प्रतिके आहेत! रोषणाई हा शब्द उत्सवाचे प्रतिक आहे, अमीरी/रोषणाई ही शब्दसंगती भपका/ आरास/डोळे दिपवणे सूचीत करतात! अशा वातावरणात गरिबांचा/क्षूद्रांचा/तेजोहीनांचा आवाज कुठे पोचणार? इथे आवाज हे देखिल प्रतिक आहे जे क्षूद्रांच्या प्रश्नांकडे निर्देश करतात! डोळे दिपतात तसा आवज दबतो.........माझ्या काळजातील प्रत्ययानुरूप व्यामिश्र कल्पनाविलास मी शेअर केला! रुचत/पटत नसल्यास
दुर्लक्ष करावे!

वरील शेरात काफियानुसारीपणाचा साक्षात्कार कुठे व कसा झाला हे केवळ अगम्य आहे!

.............प्राचार्य सतीश देवपूरकर

आवश्यकताच नाही ती!<<<<<

असली उत्तरे देणार असाल तर लक्षात घ्या की तुम्ही जिथून हे शिकला आहात त्या विद्यापीठाचा मी कुलगुरू आहे !!!!

मी बापुडा प्राध्यापक/प्राचार्य आहे बुवा

प्रोफेसर,

मी काव्य करतो (किंवा पद्य म्हणा) मात्र मी गझल लिहीत नाही कारण तिचे स्वत:चे काही शास्त्र, नियम इत्यादी आहेत ज्याचा अभ्यास मी करत आहे. गझलांचे वाचन आणि श्रवणसुद्धा करत असतो. थोडक्यात आपल्या किंवा इतरांच्या गझलींबद्दल अधिकारवाणीने मी काही बोलू शकत नाही. मात्र इथे बरेच दिवस चालू असलेला खो खो बघत आहे आणि म्हणून काही गरजेची निरीक्षणे नोंदवावी असं वाटतंय.

गझल लिहिण्यासाठी जी वैचारिक बैठक लागते ती आपल्यापाशी नक्कीच आहे. आपले बरेच शेर वगैरे खरंच उत्तम म्हणावे असे सुद्धा असतात. मात्र होतंय काय कि आपण ज्या वारंवारतेने पोस्ट्स टाकता त्यामुळे समोरच्याला असं सहाजिकच वाटू लागतं कि हि प्रसिद्धीची ओढ आहे का? बरं.. या व्यासपीठावर अशीहि काही मंडळी आहेत कि जे उत्तम गझला लिहितात आणि ज्यांचा गझलांचा उत्तम अभ्यास आहे. अशी बरीच मंडळी तुमच्या गझलांमध्ये काही उणीवा दाखवतात. त्यामागचा उद्देश गझल समृद्ध करणे हाच असतो (एक दोन मंडळी अशी सुद्धा आहेत ज्यांना फक्त टिकेतच समाधान मिळतं ज्याकडे आपण दुर्लक्ष करावं). त्यावर आपण निर्मळपणे विचार करून त्या त्रुटी दूर कराव्यात आणि पुढच्या गझलेत तू चूक पुन्हा होऊ न देण्याची काळजी घ्यावी असं मला वाटतं.

मात्र असं न होता बऱ्याचदा तुमची बाजुच कशी बरोबर आहे किंवा अमुक शेरांच तुमचं व्हर्जन तुम्ही पुढे करता आणि ते वारंवार घडत असतं. गझल, इतर काव्य वा गद्य या सगळ्यांना एक थीम असतेच आणि ती थीम लहान अथवा मोठी असली तरी तिला पूर्णत्व असतं. आणि हे पूर्णत्व येण्यासाठी, त्याला उत्तम दर्जा प्राप्त होण्यासाठी बराच विचार करावा लागतो. बऱ्यापैकी मोठी अशी ती प्रक्रिया असू शकते किंबहुना ती असतेच. इथे मात्र आपण कैक गझला विद्युतवेगाने पोस्ट करता. आपण थर्ड पर्सनच्या नजरेतून जरा विचार करा कि कसं वाटत असेल.

आपण विचारपूर्वक अस्सल गझल प्रकाशित कराल तर सर्व मंडळीना उत्तम गझल वाचण्याचा आनंद मिळेल आपल्याला उत्तम प्रतिसाद आणि आणखी उत्तमोत्तम गझलांसाठी हुरूप मिळेल. त्यातही काही त्रुटी असतील तर आपल्याला दुरुस्ती करण्याची विनंती सार्वजनिकरित्या न होता विपुत केली जाईल याची मला खात्री वाटते. सध्या असं झालय कि इथे जी काही चर्चा-टीका वगैरे होते त्यावरच आपण गझल करू लागला आहात. ते निराशेच उघड प्रतिक असून त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर गझलेचा विचार करण्याच्या क्षमतेवर मर्यादा पडू लागल्या आहेत हि बाब मला तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे.

काही वर्षांपूर्वी माझा एक मित्र आधी ओर्कुटवर आणि नंतर फेसबुकवर उत्तम कविता लिहीत असे.. त्याला उदंड प्रतिसाद मिळे. त्याला त्याचे व्यसन लागले. मग त्या वर्चुअल प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तो वारंवार पोस्ट करू लागला. हळू हळू त्याच्या कवितांचा दर्जा घसरू लागला मग त्याने काही काही महिन्यांपासून चारोळ्यांचा आधार घेतलाय ज्याचा दर्जा अतिसुमार आहे. त्याच्या त्या चारोळ्या आजकाल दुर्लक्षित पडून असतात. एक कमेंट किंवा एक लाईक सुद्धा त्याला मिळत नाही. हि स्वत:हून ओढवून घेतलेली वेळ आहे.

आपण प्राध्यापक आहात आणि या जगात कुणीच परफेक्ट नाही हे आपल्याला सुद्धा मान्य असेल. मला वाटतंय आल्बर्ट आईन्स्टाईन त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी असताना म्हटले होते कि मी भौतिकशास्त्राचा विदयार्थी आहे. थोडक्यात शिक्षण हे अविरत चालूच असतं.. गझलेचं का असेना.

मी हे आपल्या विपुत लिहिण्याऐवजी इथे लिहिण्यामागे कारण एवढंच आहे कि सगळे मिळून एक चांगला प्रयत्न करूया.

माझ्या वरील नोंदीतील शेवटून दुसऱ्या परिच्छेदाचा वैवकु आणि प्रोफेसर यांच्या मधल्या शेवटच्या काही संवादाचा संदर्भ नाही. मी पोस्ट केल्यानंतर नुकताच तो संवाद वाचला.

प्रोफेसर तुम्ही गझला थांबायचे एखादे औषध का घेत नाही , कसलं जोरदार होतंय तुम्हाला , डीहायड्रेट व्हाल अशाने
नुसत्या झड झडून गझला पडतायेत हो...

अर्र ... लवकरात लवकर औशोधोफ्चार सुरु करा

धन्यवाद
<<<<<<<<<<<

धन्यवाद.

मला वाटतं आपण अर्धविराम द्यावा.
काही आठवड्यांनी किंवा गरज पडलीच तर काही महिन्यांनी एखादी नवीन, कसदार आणि अस्सल गझल प्रकाशित करा.
मला सकरात्मक चित्राची खात्री वाटते.

शुभेच्छा.

मला वाटतं आपण अर्धविराम द्यावा.<<<<+++१००००००००!!

अगदी उत्तम प्रकारे नेमकेपणे एकाच वाक्यात सगळे सांगीतले आहे
व्वा तुम्ही नक्की चांगले गझलकार होणार साळुंके !!!
शुभेच्छा