मी श्वास घेत होतो, तेही उधार होते!

Submitted by profspd on 4 June, 2014 - 08:06

मी श्वास घेत होतो, तेही उधार होते!
माझे नि जिंदगीचे काही करार होते!!

साक्षीस तेच होते मी प्राण सोडताना.....
माझे विकार सारे जीवश्च यार होते!

मी पोचलो स्मशानी सरणावरी निजाया....
खांद्यावरीच माझ्या माझे विकार होते!

मी चांगलाच बकरा होतो, म्हणायचे ते.....
संधी समोर दिसता, सगळेच स्वार होते!

करणे शिकार त्याचा तर छंद आवडीचा....
आकांत ऐकवेना ज्याची शिकार होते!

मी एकटा भुकेला प्रेमास माणसांच्या.....
मज सोयरे दिसाया तैसे चिकार होते!

एकेक धेंड होते जवळून पाहिले मी.....
ते एकजात सारे अगदी सुमार होते!

तो गोड गोड अगदी बोलायचा वरोनी....
हृदयात मात्र त्याच्या दडले विखार होते!

ना वानवा कधीही पडलीच वेदनांची.....
आयुष्य केवढे हे माझे उदार होते!

नव्हती धमक कुणाची करण्यास वार पुढुनी....
ते सर्व पाठमोरे दुबळेच वार होते!

नाही मला कळाले हे सत्य एकदाही....
मी वेंधळा म्हणोनी माझीच हार होते!

मी एक ठरवतो अन् होते दुजेच काही....
माझ्या कृतीपुढे का माझे विचार होते?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users