"रात्र नकोशी"

Submitted by अमेय२८०८०७ on 1 June, 2014 - 09:06

सावली नुरे काळोखाच्या असण्याची
आरशातल्या प्रतिमेलाही तीव्र चरे
वेळ पाशवी, मनाविरोधी सजण्याची
दिवसा लपती, आता निघती जनावरे

अंधाराच्या धाग्यांवरती लकाकती
स्पर्शत जाती हात चावरे नको तिथे
फुलत शिसारी गात्रे सारी उसासती
सूर वाहती वाऱ्यासोबत दु:ख इथे

कसले बंधन! रक्त काढते हास्य सडे
जखडत रखडत जीव चालला पदोपदी
घाव म्हणू की प्राक्तनभाळी ओरखडे
काट्यांवरती उभारलेली सप्तपदी

संथ विकारी गढूळ पाणी डचमळते
रात्र विखारी, लज्जा इवली तळमळते

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users