रक्त अताशा कोठे हे साकळते आहे!

Submitted by profspd on 31 May, 2014 - 09:55

रक्त अताशा कोठे हे साकळते आहे!
तोच तुझे हे नवे दु:ख आदळते आहे!!

सांगावा का तुझा घेउनी असेल आली?
झुळूक का दारी माझ्या घुटमळते आहे?

मान घालुनी खाली गेले यौवन अवघे......
उतार वय आताशा का सळसळते आहे?

सांग कसे पचवू उरातले सल हे सारे?
पेशी अन् पेशीच किती खळखळते आहे!

मधेच येती स्मरणे काही अंधुक अंधुक.....
संदर्भास्तव मन माझे गोंधळते आहे!

तुझी फक्त एखादी फुंकर असे पुरेशी.....
युगे युगे ही जखम पहा भळभळते आहे!

प्रत्येकाच्या मागे त्याची घरघर असते.....
कळे न मजला कोण कुणाला दळते आहे?

काळ नेहमी बदलत असतो खरेच आहे.....
भाग्य अताशा माझेही फळफळते आहे!

आरपार मी बघतो दुनिये तुझे चेहरे.....
बोलत नाही परंतु सारे कळते आहे!

हलक्या हाते टाच मला, मी किती फाटलो.....
मधे मधे काळीज किती कळवळते आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हलक्या हाते टाच मला, मी किती फाटलो.....
मधे मधे काळीज किती कळवळते आहे!<<< वा वा

ह्या गझलेतील अनेक शेर आवडले.